कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

गुजराती मिठाई: हलवासन

गुजरातच्या खंबातची प्रसिद्ध मिठाई म्हणजे हलवासन. माझ्या सासूबाईंचे माहेर बडोद्याला असल्याने तिकडे गेल्यावर हलवासन हमखास आणले जाई. जेव्हा मला जायची संधी मिळाली तेव्हा खंबातला जाऊन हलवासनची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून मिळालेली ही पाकृ मी दोन तीन वेळा प्रयोग करून सुयोग्य प्रमाणात करू लागले.
साहित्यः एक लिटर दूध, चार टेबलस्पून दही, चार टेबलस्पून डींक, चार टेबलस्पून साजूक तूप, ५० ग्रॅम जाडसर दळलेली कणिक, १५० ग्रॅम साखर, एक टेबलस्पून किसलेले आले, अर्धा टीस्पून वेलची पावडर, अर्धा टीस्पून जायफळ पावडर, १/८ चमचा केशर, १५ बदाम.

कृती: दोन टेबलस्पून तुपावर कणिक मंद गॅसवर बदामी रंगावर भाजून घ्यावी. डींक जाडसर कुटून घ्यावा. दोन टेबलस्पून तुपावर परतून मंदगॅसवर फुलवून घ्यावा. सगळा डींक फुलला की बाजूला काढून ठेवावा. दुसय्रा कढईत दूध उकळायला ठेवावे. उकळी आली की सगळे दही घालावे, यामुळे दूध फाटेल. दूध तसेच उकळत ठेवावे. तळलेला डींक चुरून दुधात मिसळावा. दूध ढवळत रहावे. भाजलेली कणिक दुधात मिसळावी. ७५ ग्रॅम साखर दुधात मिसळावी. ढवळत रहावे. उरलेली ७५ ग्रॅम साखर पॅनमध्ये घेऊन मंद गॅसवर हलवत रहावी. विरघळून तपकिरी रंग आला की हा पाकही दुधात मिसळावा. पाक असा दिसतो.
halvasan
दुधात किसलेले आले घालावे, शिजवत राहावे. दूध घट्ट होत आल्यावर त्यात जायफळ पावडर, वेलची पावडर, केशर मिसळावे. मिश्रणाचा गोळा झाय्राला चिकटेनासा झाला की गॅस बंद करावा. बदामाचे काप करून घ्यावे. गोळा गार होईपर्यंत मिश्रण हलवत रहावे. गोळ्यात अर्धे बदामाचे काप मिसळावे. पॅटीससारखे गोळे करून बदाम काप लावून सजवावे.

या मोसमात खंबातला अजून एक गोष्ट पहायला मिळाली ती म्हणजे पतंगोत्सवाची तयारी! गुजरातची मिठाई आणि या मोसमातली, म्हणजे पतंग हवाच!
halvasan

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

मुळ्याचे मुठीया

साहित्य: दोन वाट्या मुळ्याचा पाला
बारीक चिरून
दीड वाटी कणिक
एक वाटी रवा
एक वाटी बेसन
एक टीस्पून धने पूड
एक टीस्पून जीरे पूड
एक टेस्पून आलेलसूण पेस्ट
अर्धा टीस्पून मिरची पेस्ट ( तिखट्पणानुसार कमी जास्त)
एक टीस्पून आमचूर
पाव टी स्पून खायचा सोडा
मीठ चवीनुसार
अर्धा टीस्पून मोहरी, एक टीस्पून पांढरे तीळ, चिमुट्भर हिंग अर्धी वाटी तेल
बारीक चेरलेली कोथिंबीर, ओले खोबरे (ऐच्छीक)
कृती: एक चमचाभर तेल कढईत घेऊन मुळ्याचा बारीक चिरलेला पाला परतून घ्यावा. एक वाफ आली की गार करण्यास ठेवावा. मुळ्याचा पाला, गव्हाचे पीठ, रवा, बेसन, आले लसूण मिरची पेस्ट, धने-जीरे पूड, मीठ, आमचूर पावडर, सोडा हे सर्व जिन्नस एकत्र करावे. गरज लागल्यास थोडे पाणी घालून पीठ भिजवावे. हाताला तेल घेऊन मुठिया करून घ्या. चाळणीत केळीचे पान ठेवून किंवा चाळणीला तेलाचा हात लावून त्यात तयार मुठिया ठेवा. पाणी घातलेल्या पातेल्यात चाळण ठेवून १५ मिनीटे वाफवा.


गार झाल्यावर गोल चकत्या करून घ्याव्या. मोहरी, तीळ, हिंगाची अर्धी वाटी तेलाची फोडणी करून त्यात मुठिया परतून घ्याव्या. ओले खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह कराव्या.