कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

आंबा स्पेशल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आंबा स्पेशल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २५ एप्रिल, २०२१

पॉट आईस्क्रीम

 पॉट आईस्क्रीम: आमच्या मोठया एकत्र कुटुंबाच्या प्रमाणात आहे.


साहित्य: पाच लीटर दूध, दोन लीटर हापूस आमरस, अर्धा किलो साखर, चवीला मीठ(ऐच्छिक)

कृती: दूध, साखर, आमरस सगळं एकत्र ज्युसर जारमध्ये नीट मिक्स करून घ्या. आईस्क्रीम पॉटमध्ये तयार मिश्रण ओतून त्याचं ब्लेड लावा. झाकण लावून बाजूने  खडेमीठ आणि बर्फ घट्ट थर लावा. अर्धा तास फिरवून घुसळून मग दिवसभर बाजूने सतत मीठ आणि बर्फ घालत रहा! आईस्क्रीम तयार!

आईस्क्रीम पॉट:



मँगो रसमलई

 मँगो रसमलई:


साहित्य: दूध एक लीटर, आंबे चार, साखर तीन टेबलस्पून, बदाम काप, रसगुल्ले

कृती: दूध पसरट कढईत आटवत ठेवा.  बाजूची साय काढून दुधात मिक्स करत रहा पाऊण लीटर झालं की साखर घालून परत आटवत रहा. तुम्हाला हवी तेवढी दाट झाली की गॅस बंद करून गार करत ठेवा. गार झाली की फ्रीजमध्ये ठेवा. आंब्याचा रस काढून मिक्सरमध्ये फिरवून वाटून घ्या. पूर्ण गार झालेल्या बासुंदीत तयार रस मिक्स करा, तयार रसगुल्ले पाक पिळून मग बासुंदीत सोडा.  बदाम कापानी सजवा, गारेगार सर्व्ह करा.


टीप: आटवलेलं दूध पूर्ण गार झाल्याशिवाय आमरस मिक्स करू नका नाहीतर दूध फाटू शकते.

रसगुल्ले कृती माझ्या ब्लॉगवर आहे. अर्धा लीटर दुधाचे 15 ते 16 रसगुल्ले होतात.


शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

आमरस भात

आजचा नैवेद्य: आमरस भात
साहित्य: एक वाटी तांदूळ, एक वाटी आमरस( मी टीन मधला वापरला), पाऊण वाटी साखर, पाव चमचा वेलची पावडर, काजूगर , बेदाणे, पाणी , मीठ, अर्धं लिंबू, लवंगा पाच सहा, तूप  चार चमचे, केशर सिरप एक चमचा
कृती: 1) तांदूळ धुवून चाळणीवर निथळत ठेवावेत.
2) कढईत तीन चमचे तूप तापत ठेवावे.
3) तूप तापलं की मंद गॅसवर लवंगा टाकाव्यात.
4) त्यावर तांदूळ घालून छान परतावेत.
5) परतलेल्या तांदळात दोन वाट्या पाणी, चवीला मीठ आणि एक चमचा केशर सिरप घालून भात शिजवून घ्यावा.
6) शिजलेला भात परातीत मोकळा करून ठेवावा.
7) पाणी गरम करून त्यात काजूगर भिजत घालावेत.
8) कढईत साखर, रस एकत्र करून  मंद गॅसवर ढवळत रहावे.
9) साखर विरघळली की तयार भात, बेदाणे, काजूगर, वेलची पावडर, लिंबूरस हे सर्व मिक्स करावे.
10) मंद गॅसवर पाच मिनिटं झाकण ठेवून वाफ काढावी.
11) वाफ आली की उरलेलं एक चमचा तूप बाजूने सोडावे आणि पाच मिनिटं ठेवावे.
12) भात मोकळा दिसू लागला की गॅस बंद करावा.
13) भाताला आंब्याचा स्वाद आणि रंग मस्त येतो.
बघा करून!

बुधवार, १३ जून, २०१८

आमरसाची पाकातली पुरी

साहित्य: तीन कप बारीक रवा, चार टेबलस्पून तूप किंवा तेल, पाऊण कप आमरस,  पाव कप आंबट दही, तीन कप साखर, तीन टेबलस्पून लिंबू रस, पाव टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून वेलची पावडर, एक टीस्पून केशर सिरप, दीड कप पाणी, तळणीसाठी तेल, सजावटीसाठी केशर काड्या आणि बदाम काप

कृती:
1) रवा चाळून घ्यावा.
2) मीठ घालून मिक्स करावे.
3) दोन आंब्यांचा रस काढून मिक्सरला फिरवून घ्यावा.
4) चार टेबलस्पून तुपाचे मोहन रव्यात घालावे.
5) काढलेल्या आमरसात आणि दह्यात रवा  घट्ट भिजवून दोन तास झाकून ठेवावे
6)एका पातेल्यात साखर घ्यावी.
7) साखरेत दीड कप पाणी घालावे.
8) दोन तारी पाक करावा.
9) लिंबाचा रस मिसळावा. वेलची पावडर केशर सिरप घालावे.

10)कढईत तेल तापत ठेवावे.
11) एक मोठी पोळी लाटून वाटीने पुऱ्यांचा आकार पाडावा. किंवा गोळ्या करून एक एक पुरी लाटावी.

12) तळलेल्या पुऱ्या निथळून पाकात घालाव्यात.
13) दुसऱ्या तळेपर्यंत पहिल्या पाकात ठेवाव्या.
14) मग त्या पाकातून काढून ताटात मांडाव्यात.
15) बदामाचे काप आणि केशर काड्यांनी सजवाव्यात.

रविवार, १० जून, २०१८

आटवलेला आमरस

आटवलेला आमरस:
       आमच्याकडे माझ्या माहेरी आंब्याचा रस आटवणे हा एक सोहळा असे. मे महिन्याच्या शेवटी जेव्हा आंब्याच्या साटांना लागणारे ऊन कमी व्हायला लागते तेव्हा रस आटवायची लगबग सुरू होते. तोपर्यंत सगळ्या नातेवाइकांच्या पेट्या पाठवून झालेल्या असतात. घरात सगळ्यांचे आंबे मनसोक्त खाऊन झालेले असतात. तयार आंबे स्वच्छ धुवायचे आणि डोळस माणसाने रस काढायला बसायचं! हे शेवट शेवटचे आंबे डोळस पणे बघावे लागतात. तोपर्यंत बाबा मागच्या अंगणातल्या थाळी(पाणी तापवायची चूल) लाकडं आणून ठेवायचे. वर्षभर कौलाच्या खाली अडकवलेला लाकडी लांब दांड्याचा उलथा खाली काढून स्वच्छ करायचा. भल्या मोठ्या पराती राखेने चकचकीत करून त्याला खालच्या बाजूने माती आणि राखेचे लेवण घ्यायचे. परातीत घातलेला रस लागू नये आणि परात नीट घासली जावी म्हणून तिच्या तळाला माती आणि राख ओलसर करून लावायची.
आता तयार परातीत रस ओतून ती चुलीवर ठेवायची. लांब दांडा असल्याने ढवळताना रस अंगावर उडत नाही आणि लाकडी असल्याने तापत नाही. 

      आमची जेवणं होईपर्यंत माणसं बदलून बदलून रस आटवत असायची. रस घट्ट व्हायला लागला की त्यात अंदाजे साखर घालायची. परत तो रस आटवायचा. रस घट्ट व्हायला लागला की घरभर मस्त वास पसरतो. मग आम्ही मुलं फणसाची पानं काढून आणायचो आणि तो गरम गरम रस फणसाच्या पानावर घेऊन फुंकर मारत खायचो! अहाहा!! तो असा रस काय भारी लागायचा ... आता इकडे जरी त्या पराती, उलथें नसले तरी मी रस आटवतेच......डोळ्यासमोर ते चित्र आणून... चुलीवर आटवलेल्या रसाची चव नसली येत तरी त्या आठवणीत हा रसाचा गोळा सहज विरघळतो...... जिभेवर परत ती चव रेंगाळते!!😊
साहित्य: 20 हापूस आंबे, 200 ग्रॅम साखर
कृती: आंबे स्वच्छ धुऊन घ्या. सोलून त्याचा रस काढून घ्या. एका मोठया उंच कढईत रस घ्या. मंद आचेवर ठेवा. लांब दांड्याच्या लाकडी उलथ्यानेसतत ढवळत रहा.
गॅस मोठा केलात तर गरम रस अंगावर उडतो म्हणूनच उलथा लांब दांड्याचा हवा. रस आटत आला आणि उडायचा कमी झाला की त्यात साखर मिसळून ढवळत रहा. बाहेर उडत नाहीय याचा अंदाज घेऊन गॅस मोठा करा. दोन अडीच तास तरी लागतात, पूर्ण आटवायला!
हा रस तुम्ही नुसता खाऊ शकता, याच्या मोदक, वड्या, पोळ्या छान होतात.

रविवार, ३ जून, २०१८

कैरीचं टक्कू किंवा तक्कू

साहित्य: दोन वाटया कैरीचा कीस, दोन वाट्या गूळ, दोन टीस्पून लाल तिखट, एक टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून मेथी दाणे, पाव टीस्पून मोहोरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद
कृती:
1) कैरी धुवून सोलून किसून घ्या.
2) काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात कीस मोजून घ्या.
3) किसात गूळ, मीठ, तिखट मिक्स करा.
4) कढईत तेल तापत ठेवा.
5) मोहोरी, मेथी, हिंग, हळद आणि थोडं तिखट घालून फोडणी करा. गार होऊ द्या.
6) पूर्ण गार झाल्यावर फोडणी तयार मिश्रणात मिसळा.
7) कैरी आंबट असेल तर गूळ जास्त लागू शकतो.
8) तिखटपणा कमी हवा असेल तर तिखट कमी घ्या.
9) मस्त टेस्टी झटपट लोणचं तयार आहे.

मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

Aamrakhand( आम्रखंड):

Aamrakhand( आम्रखंड):

साहित्य: 1 ली दही, दोन कप साखर, तीन कप आमरस, आंब्याच्या फोडी सजावटीला, वेलची पावडर, मीठ चवीला
कृती: दही 8 तास कापडात बांधून टांगून ठेवावे. सगळे पाणी जाऊ द्यावे. चक्का बाऊलमध्ये घ्यावा. साखर आणि आमरस घालून ढवळावे. पुरण यंत्रातून काढावे. मीठ चवीला आणि वेलची पावडर मिसळावी. आंब्याच्या फोडींनी सजवून पुरी बरोबर सर्व्ह करावे.
Ingredients:
 1li. curd, 2 cup sugar, 3 cup mango pulp , mango pics. for garnishing, cardamom powder, salt to taste

Procedure:
Hang curd for 8 hours in a cloth. Keep till all the water content drips out. Take chakka in a bowl. Add sugar and mango pulp salt to taste. Mix well. Churn through puran jali or machine. Add cardamom powder, and some mango pics. Garnish with mango pics. Serve chilled Aamrakhand with puri.

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

आंबा लोणचे

साहित्य:तीन कैऱ्या, मसाल्यासाठी लाल मोहोरी अर्धी वाटी, एक चमचा मेथी, चार चमचे लाल तिखट, मीठ. फोडणीला पाव वाटी तेल, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट.
कृती:  मोहोरी पावडर करा. मेथी तळून घेऊन पावडर करून घ्या. कैऱ्या स्वच्छ धुवून फोडी करून तिखट, मीठ, मोहोरी मेथी पावडर आणि गार करून फोडणी घाला. फोडणीत लाल तिखट घातले की रंग छान येतो!

मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

आंबा मोदक

Modak is Lord Ganesha's most favorite food. One more konkani sweet dish with mango.. Mango Modak:
Ingredients: 2 bowls rice flour, 2 1/2 bowls mango pulp, half bowl sugar, 11/2 bowl water, half tsp salt, 1tsp cardamom powder, 2 bowls grated coconut, 2 tsp unsalted butter
Procedure: For stuffing: 1)Take 2 bowls grated coconut, 2 bowls mango pulp, half bowl sugar in a large pan.
2) Put it on a low flame.
3) Stir it continuously till the mixture becomes thick, add cardamom powder.
4)Turn off the flame.
5) Allow it to cool.

6)To Make the outer covering boil 1 1/2 bowls water and half bowl mango pulp.
 7)Add 2 tsp unsalted butter and half tsp salt to taste.
8)Once the water starts boiling add rice flour, Stir well.
9) Keep it covered for five minutes on low flame.
10) Knead the dough when its warm.
11) Use little oil and cool water if necessary to make a soft dough.
12)Keep the dough covered.
13)Make a small ball of the dough.
14)Spread it evenly with hands and make a bowl. Hold it in your left hand, add two tsps stuffing.

15) pleat the edges of the dough and gather them together. Pinch to seal at the top.
16) Heat sufficient water in the steamer.
17) place banana leaves in a plate.
18) Place modak over banana leaves, cover properly
19) Steam for 15 minutes.
20) Serve with desi ghee.

गणपती बाप्पाचा एकदम आवडता पदार्थ मोदक! घेऊन आलेय आंबा मोदक स्पेशल कोकणी डीश:

साहित्य: २ वाट्या तांदूळ पिठी, दीड वाटी पाणी, दोन चमचे लोणी, अर्धा चमचा मीठ, अडीच वाट्या आमरस, दोन वाट्या खवलेला नारळ, अर्धी वाटी साखर, एक टीस्पून वेलची पावडर
कृती: सारणासाठी: 1)दोन वाट्या ओलं खोबरं, दोन वाट्या आमरस, अर्धी वाटी साखर एका कढईत एकत्र करा.
2)मंद गॅसवर ठेवा.
3) गोळा होईपर्यंत सतत ढवळत रहा.
4) गॅस बंद करा.
5) सारण गार होऊ द्या.
6)मोदकाच्या बाहेरच्या आवरणासाठी एक पातेल्यात दीड वाट्या पाणी, अर्धी वाटी आमरस एकत्र करून उकळत ठेवा.
7) त्यात मीठ आणि लोणी मिक्स करा.
8)पाणी उकळू लागले की तांदूळ पिठी मिक्स करून नीट ढवळा.
9)पाच मिनिटं मंद गॅसवर वाफ येऊ द्या.
10) गरम असतानाच उकड मळायला घ्या.
11)गरजेनुसार थोडं तेल आणि गार पाणी वापरा.
12)मळलेली उकड झाकून ठेवा.
13)उकडीचा एक लहान गोळा घ्या.
14)हाताने वळत गोळ्याला छान वाटीचा आकार द्या.
15)वाटीत दोन चमचे सारण भरा. कडेला छान चुण्या पाडा. एकत्र करून मोदक वळून घ्या.
16) मोदक पात्रात पाणी गरम करत ठेवा.
17) चाळणीत केळीची पानं ठेवा.
18)त्यावर मोदक ठेवून झाकण लावा.
19) 15 मिनीटं वाफवा.
20)तयार मोदक साजूक तुपाबरोबर वाढा.

 

शनिवार, २४ मार्च, २०१८

आंबा डाळ:

आंबा डाळ:

चैत्र महिन्यात हमखास केला जाणारा प्रकार
साहित्य: एक वाटी चणाडाळ, अर्धी वाटी कैरी कीस, सहा ओल्या मिरच्यांची पेस्ट, पाव वाटी सनफ्लॉवर तेल, अर्धा चमचा मोहोरी, एक चमचा हिंग, एक चमचा हळद, लाल तिखट लागल्यास, साखर एक चमचा

कृती: 1) चणा डाळ चार पाच तास भिजवावी
2) चाळणीवर काढावी.
3) फूड प्रोसेसर च्या भाजी चिरायच्या पात्यावर बारीक करावी. परफेक्ट होते.
4) मिरच्यांची पेस्ट करावी.
5) लहान कढईत तेल तापवावे. मोहोरी, हिंग, हळद आणि चिमुटभर लाल तिखट घालून फोडणी करावी. दहा मिनिटं गार होऊ द्यावी.
6) कैरी धुवून साल काढून किसावी.
7)वाटलेली डाळ, कैरी कीस, मिरची पेस्ट, साखर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व एकत्र करावे.
8) फोडणी मिक्स करावी
9) चव बघून मीठ, लाल तिखट घालावे.
10) पोळीबरोबर सर्व्ह करावी.


Aamba Dal:
Ingredients: one bowl Chana dal, half bowl grated raw mango, 1/4 bowl sunflower oil, 1tsp. green chili paste, salt, sugar 1tsp, mustard seeds half tsp, asfoetida 1 tsp, turmeric powder 1 tsp, red chili powder if required, coriander leaves finely chopped 2 table spoon


How to make:
1) Soak dal 4/5 hours.
2) Drain all water.
3) Grind on food processor (vegetable cutter),
4) Make paste of green chillies
5) Heat oil in small pan. Add mustard seeds, asfoetida, turmeric powder, and a pinch of red chili powder. Keep aside for ten minutes.
6) Wash raw mango, peel and grate it.
7) Mix dal, grated mango, chili paste, finely chopped coriander , sugar and salt to taste.
8) Add tadka.
9) Add salt, red chili powder if required.
10) Serve with roti.


शुक्रवार, २३ मार्च, २०१८

कैरी मिरची ठेचा:

आता आंबे सुरू झाले म्हणजे जे करायचं ते आंब्याचं!
 आज केलाय झणझणीत कैरी मिरची ठेचा:

साहित्य: 250 ग्रॅम ओल्या मिरच्या, 50 ग्रॅम मोहोरी, दोन वाट्या कैरीचा कीस, एक चमचा मेथी, तेल पाव वाटी, एक चमचा हळद, अर्धा चमचा हिंग पावडर, अर्धा चमचा मोहोरी( फोडणीसाठी), मीठ

कृती: मिरच्यांची देठं काढून स्वच्छ धुवा, कोरड्या करा. मिरच्यांचे तुकडे करा. कैरी धुवा, साल काढून किसून घ्या. तेलात मेथी तळून घ्या. उरलेल्या तेलाची मोहोरी, हिंग हळद घालून फोडणी करा. फोडणी गार करत ठेवा.
मेथीची पावडर करून घ्या. 50 ग्रॅम मोहोरीची पावडर करून घ्या. मिरच्या मिक्सरला फिरवून घ्या. त्यात कैरीचा कीस, मोहोरी पावडर, मेथी पावडर, मीठ एकत्र करा. गार झालेली फोडणी मिक्स करा. मस्त झणझणीत ठेचा तयार आहे! पण जरा जपून...

बुधवार, २१ मार्च, २०१८

दह्यातील उकडांबा:

आज लोणच्यासाठी बरण्या धुवून ठेवायच्या म्हणून बघायला गेले तेव्हा लक्षात आलं मिठात आंबे राहिलेत दोन अजून.. म्हटलं चला करून टाकू तोंडीलावणं!

साहित्य: मिठातले उकडांबे दोन, एक वाटी दही, दोन चमचे साखर, दोन ओल्या मिरच्या, चिमुटभर हिंग, पाव चमचा जीरं, तीन चमचे तूप, कोथिंबीर बारीक चिरलेली, मेतकूट दोन चमचे( ऐच्छिक)

कृती: मिठातला उकडांबा
उकडांबा करण्यासाठी वेगळे खास रायवळ आंबे असतात.... नाहीतर कोणतेही छोटे रायवळ तयार आंबे दहा बारा घ्या. पण हे आंबे झाडावरून उतरून काढलेले हवेत, पडलेले टिकत नाहीत. आंबे स्वच्छ धुवा. देठाकडचा चीक जाऊ द्या. पातेल्यात पाणी उकळून त्यात घालून दहा मिनिटं उकळावेत. पाण्यातून चाळणीवर काढून गार होऊ द्यावेत. आंबे पूर्ण गार व्हायला हवेत. आता देठाकडून साल थोडी सोडवून ठेवा. एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत आंबे बुडतील इतपत पाणी घ्या. पाणी खारट लागेल इतपत मीठ घाला. आता पूर्ण गार झालेले आंबे पाण्यात बुडवून झाकण लावा. हे आंबे वर्षभर टिकतात. त्यावर पांढरा साक धरतो सायीसारखा तो अधून मधून काढून टाकायचा. माझी आजी मोठी चिनीमातीची बरणी भरून करायची हे आंबे आणि त्याच्या तोंडाला स्वच्छ पांढरं कापड घट्ट बांधायची.. दादरा बांधणं म्हणतात त्याला! आणि मग कोणी आलं गेलं हे आंबे द्यायची! विशेषत: श्रावण महिन्यात तोंडीलावणं म्हणून हे आंबे काढले जायचे!

कृती: दह्यातील उकडांबा:
हा मिठातला आंबा काढून घेऊन त्याच साल सोलावं.. आतील गर काढून घ्यावा. नीट कुस्करून घ्यावा. त्यात दही साखर मेतकूट आणि कोथिंबीर घालावी. तूपाची जीरं, मिरच्या, हिंग घालून फोडणी करावी. ही फोडणी या उकडांब्याला द्यावी. छान मिक्स करावे. मीठ घालावे लागत नाही.


बुधवार, ७ मार्च, २०१८

आंब्याचे रायते: शिजवून

आंब्याचे रायते:
 साहित्य: दोन मोठया कैऱ्या, दोन वाट्या गूळ, लाल तिखट दोन चमचे, मीठ, तेल तीन चमचे, मोहोरी अर्धा चमचा, मेथी पाव चमचा, हळद पाव चमचा
कृती: कैऱ्या स्वच्छ धुवाव्यात. देठ काढून चीक जाऊ द्यावा. पातेल्यात कैऱ्या बुडतील इतपत पाणी घेऊन दहा मिनिटं झाकण ठेवून कैऱ्या वाफवाव्यात. पाण्यातून काढून गार होऊ द्याव्यात. सोलून गर काढावा. जेवढा गर असेल तेवढा गूळ गरात मिक्स करावा. मीठ, तिखट मिक्स करून तासभर ठेवावे. एक कढईत तेल तापत ठेवावे. त्यात मोहोरी, मेथी, हिंग हळद घालून फोडणी करावी. कैरीचा गर फोडणीत घालावा. परतून थोडावेळ आटवावे. सॉस इतपत झाला की गॅस बंद करावा. गार झाल्यावर आणखी घट्ट होतो. काचेच्या बाटलीत भरून ठेवावे. पंधरा दिवस सहज टिकते.
टीप: कैऱ्या आंबट असतील तर गूळ जास्त लागू शकतो, टेस्ट अप्रतिम!!

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

आंबा पुराण:

आंबा पुराण: आला आंब्याचा सिझन आला!! आंब्याचा सिझन सुरू झाला की आम्हा कोकणातील लोकांची तोंडीलावण्याची चिंता मिटते. आंबा तिखट आणि गोड दोन्ही चवींशी अगदी प्रेमाने मिसळून जातो... अगदी कोकणी माणसासारखा! कैऱ्या यायला लागल्या की लोणचं, कांदा कैरीची चटणी, टक्कु, रायते, कोयाडे, मुरांबा, आंबे डाळ, उकडांबा: .... https://minalmangesh.blogspot.in/2017/11/blog-post_93.html (कोयाडे)
काय करू आणि काय नाही असं होऊन जातं अगदी!
https://minalmangesh.blogspot.in/2017/11/blog-post_41.html (उकडांबा) उन्हाळ्यात येणाऱ्या पाहुण्यांना स्वागतासाठी पन्ह तयार होऊ लागते, तोवर हळूहळू आंबा केशरी रंग धारण करायला लागतो. मग तर रोज शाही थाट अर्थात आमरस पोळी! पायरी आंब्याचा रस म्हणजे अहाहा! हापूस आंबा तर राजाच, गार दुधात थोड्या फोडी आणि रस मिसळला की वेगळं पक्वान्न झालं! https://minalmangesh.blogspot.in/2017/04/blog-post_30.html आईस्क्रीम चा तर प्रोग्रॅम असती आमच्याकडे, आईस्क्रीम पॉट वर घरच्याघरी प्रत्येकाने फिरवून फिरवून, बाजूला खडे मीठ आणि बर्फ टाकून तयार झालेलं आईस्क्रीम जीभ जड होईपर्यंत खायचं, अगदी डिश मोजत मोजत! आणि आंब्याला पुडिंग, केक याचंही वावडं नाही... उगाच म्हणाल हा गावठी आंबा याला काय कळतंय यातलं? पण इथेही कोकणी माणसासारखा कुठेही चपखल बसतो आंबा! https://minalmangesh.blogspot.in/2017/05/blog-post_19.html आम्हा सुगरणींना तर पर्वणीच असते या दिवसात! आंब्याचे साट, आटवलेला रस, आंबोशी, आमचूर अशी साठवणीची कामं ही सुरू असतात. तरी कोणी पाहुणे आले तर की सांदण, आंब्याची कढी, आंब्याचा शिरा, केला जातोच! अगदी परसातील नारळ काढले तरी चटणी जरा कैरी टाक गं.. हे सहज होतं!
जाती तरी किती.. हापुस, पायरी, भोपळी, आंबी, तोतापुरी, मालगीस, रायवळ, पावशी... नुसत्या रायवळचे किती प्रकार... एखादा विचित्र वासाचा रायवळ बाजारात सहज खपतो... पण आमच्याकडची गुरं सुद्धा त्याला तोंड नाही लावत!
बाकी कैरीचं लोणचं कितीही करा पण बेगमीच्या लोणच्याला उतरवून काढलेला हापुसच हवा!... किती बोलू पण आता वेळ नाहीय... पन्ह्या साठी कैऱ्या शिजवल्यात

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

कोयाडं:

कोयाडं:
तसा थोड्या फार फरकाने सारख्याच गोष्टी वापरून केलेला पण लगेच खाण्याचा पारंपरिक प्रकार, हे नाव बहुदा कोई सह वापरल्याने पडलं असावं.
साहित्य: रायवळचे छोटे पिकलेले आंबे 10, पाव वाटी गूळ, दोन चमचे लाल तिखट, फोडणीचे साहित्य, मीठ.
कृती: रायवळचे पिकलेले आंबे स्वच्छ धुवा, त्याची फक्त साल काढा. कोयी रसासह तशाच ठेवा. कढईत तीन चमचे तेल गरम करा, तापले की मोहोरी, हिंग, हळद आणि थोडे लाल तिखट घाला. आता मगाशी साल सोलून ठेवलेल्या कोयी या फोडणीत घाला. मंद आचेवर ठेवा. सालींचा जो रस असेल तो काढून यात घाला. तिखट, मीठ, गूळ घाला. नीट मिक्स करा. चवीनुसार जे लागेल ते वाढवा. रसाला ताटात घेता येईल एवढा घट्टपणा आला की गॅस बंद करा. गार झाल्यावर डब्यात भरा, चार दिवस फ्रीजमधे टिकते. चव अप्रतिम!!! फक्त आंब्याच्या आंबटपणावर गुळाचे प्रमाण कमीजास्त करा.

भाजलेल्या कैरीचे रायते

साहित्यः
२/३ कच्चे रायवळ आंबे (ही आंब्याची जात विशेषतः कोकणात दिसते. त्या ऐवजी कोणत्याही कैय्रा घ्या.), ३ चमचे तेल, मीठ, गूळ, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, २ चमचे लाल तिखट


कृती: कैय्रा धुवा, पुसून कोरड्या करा. निखाय्रात किंवा मध्यम आचेवर कैय्रा भाजून घ्या. गार होऊ द्या. साल सोलून गर काढून घ्या. गर हातानेच कुस्करून घ्या. जेवढा गर असेल त्याच्या दुप्पट गूळ घेऊन दोन्ही एकत्र करून घ्या. कढईत तेल तापवा. मोहोरी, हिंग आणि लाल तेखट घाला. गॅस मंद ठेवा. आता त्यात गर आणि गूळाचे मिश्रण घाला. ढवळा. मंद आचेवर गूळ विरघळू द्या. चवीनुसार मीठ घाला. साधारण सॉस इतपत झाले की गॅस बंद करा. गार झाल्यावर अजून थोडे घट्ट होते. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवा. कैरीच्या आंबटपणावर गूळ जास्त लागू शकतो.
चव अप्रतिम लागते.

उकडांबा:

उकडांबा: ही पारंपरिक रेसिपी आहे, माझी आजी, आजेसासूबाई करायच्या. पूर्वी कोकणात पावसात फार भाज्या मिळत नसत. तेव्हा या बेगमीच्या पदार्थांचा उपयोग व्हायचा. हे करायला ठराविक झाडाचे रायवळ आंबे वापरले जायचे. फक्त आंबे उतरून काढायचे, पडलेले नको.

साहित्य:
दहा रायवळ आंबे थोडे पिकलेले, एक वाटी मोहोरी, 300ग्रॅम गूळ, दोन चमचे मीठ, दोन चमचे मेथी पावडर, दोन चमचे हिंग, चार चमचे लाल तिखट, अर्धी वाटी तेल, थोडी हळद


कृती:
थोडे पिकायला लागलेले आंबे स्वच्छ धुवावेत. पाण्यात घालून दहा मिनिटे उकडावेत. पाण्यातून काढून गार करायला ठेवावेत. 300ग्रॅम गूळ एका पातेल्यात घ्यावा, त्यात पाऊण ली पाणी घालून पाक करावा. एक वाटी मोहोरी बारीक करून घ्यावी. अर्धी वाटी तेलाची मोहोरी, हिंग, हळद, थोडे तिखट घालून फोडणी करावी, गार करायला ठेवावी. गुळाचा पाक गार करावा. त्यात मेथी पावडर, मोहोरी पावडर, मीठ, तिखट नीट मिसळून घ्यावे. गर झालेली फोडणी मिसळावी. आंब्याची साल देठाकडून सोडवून घ्यावी. काचेच्या बरणीत कैऱ्या ठेवाव्यात, त्यावर तयार मिश्रण घालावे. हे लोणचं छान मुरलं की खायला घेताना आंबा सोलून खारात कुस्करून खायला घ्यावा. मुरलेला आंबा छान लागतो.

मंगळवार, ४ जुलै, २०१७

आंबा वडी:

साहित्य: 
आटवलेला आंब्याचा रस एक वाटी, साखर दीड वाटी, वेलची पावडर चिमुटभर

कृती: 
कोकणात उन्हाळ्यात खूप आंबे होतात. तेव्हा मोठया परातीत आंब्याचा रस घेऊन लांब दांड्याच्या लाकडी उलथ्याने ढवळून आटवला जातो. घट्ट होत आला त्यात थोडी साखर घातली जाते. गार झाल्यावर या रसाचे गोळे हवाबंद डब्यात ठेवतात. वर्षभरात केव्हाही वापरता येतात. 
एक कढईत साखर घ्यावी. त्यात वाटीभर पाणी घालून पाक करायला गॅसवर ठेवावे. गोळीबंद पाक करावा. एक वाटीत पाणी घ्यावे. त्यात पाक एक दोन थेंब घालावा. पाकाची गोळी होते का पहावी. पाकाची गोळी झाली की गॅस बंद करावा. त्यात एक वाटी आटवलेला रस घालून घोटावे. हवी असल्यास वेलची पावडर घालावी. कारण वड्याना आंब्याचा सुंदर स्वाद येतो. ताटाला तुपाचा हात लावावा. घोटून गोळा झाला की ताटात थापावे, आणि आवडीप्रमाणे वड्या कापाव्यात.

शुक्रवार, १९ मे, २०१७

मँगो पुडींग

aamba
साध्या सरळ शांत स्वभावाच्या नवय्राने एकोणिस वर्ष मला सहन केलं, मी करत असलेल्या प्रायोगिक रेसिपी नावं ठेवता खाल्ल्या म्हणून आज त्याच्यासाठी ही स्पेशल डीश! आंब्याचा सीझन आहे हे काही विसरून चालणार नाही!!
साहित्यः
केकसाठी: मैदा १५० ग्रॅम, तूप १०० ग्रॅम्, मिल्कमेड२०० ग्रॅम, १ चमचा बेकींग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, ५/६ चमचे साखर , दूध अर्धा कप, तूप, व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा. (केक बाहेरून आणता येईल.)
पुडींगसाठी: अर्धा कि. प्लेन केक, चार हापूस आंबे,दोन रायवळ किंवा रसाचे आंबे, चार चमचे आंबा ज्यूस, अर्धा लि. दूध, दोन चमचे कस्टर्ड पावडर , साखर,आमरस पाव लि., चेरी सजावटीसाठी.
aamba
कृती:
केक: मैदा, बेकींग पावडर, खायचा सोडा, चाळणीने तीन वेळा चाळून घ्यावे. यामुळे सोडा, बेकींग पावडर नीट मिक्स होईल. ओव्हन १८० डिग्रीवर प्रीहीट करावा. केकच्या भांड्याला तूप लावावे. तयार मिल्कमेड आणि तूप परातीत घेऊन फेसावे. फेसताना अर्धा कप दूध मिश्रणात घालावे.व्हॅनिला इसेन्स घालावा. आता चाळलेला मैदा मिश्रणात मिसळावा. मिश्रण एकजीव करावे. ५/६ चमचे साखर मिसळावी. केकच्या भांड्यात मिश्रण घालून ओव्हनला २०० डीग्रीवर ३० मिनिटे ठेवावे. सुरीचे टोक घालून केक तयार झाला का ते पहावे. झाला असेल तर जाळीवर काढून गार करावा. स्लाईस करून घ्याव्या.


पुडींगः १)आंब्याच्या दोन्ही बाजूचे काप काढून चौकोनी फोडी करून घ्याव्या. फोडींमध्ये चार चमचे साखर घालावी. कढईत घेऊन पाच मिनिटे गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की उतरून गार करावे.
२) अर्धा लि. दुधातील अर्धी वाटी बाजूला ठेवून बाकीचे गरम करावे. चार चमचे साखर घालावी. अर्धी वाटी गार दुधात दोन चमचे कस्टर्ड पावडर मिसळून घ्यावी. गरम करायला ठेवलेल्या दुधात पावडरचे दूध मिसळावे. सतत ढवळत रहावे. मिश्रण दाट झाले की गार कारावे. लागल्यास साखर वाढवावी.
३) आंब्याच्या कोयींचा रस काढून त्यात चार चमचे साखर घालून मिक्सरला फिरवावा.
४) रायवळ आंब्याचा रस काढून त्यात दोन चमचे साखर, पाव वाटी पाणी घालून ज्यूस करावा. तयार ज्यूस वापरू शकता.
५) काचेचा गोल बाऊल घ्या. तळाला केकचा थर द्या. त्यावर दोन तीन चमचे ज्यूस शिंपडा. त्यावर आंब्याच्या फोडी पसरा. तयार कस्टर्ड मध्ये ३ नं स्टेपला काढलेला रस मिसळून घ्या. आता हे कस्टर्ड आंब्याच्या फोडींवर पसरा. फ्रीजरला गारेगार करा, आणि खा.
aamba

मंगळवार, १६ मे, २०१७

सोप्पा रवा मँगो केक

आता तुम्ही म्हणाल किती सारखं आंबा आंबा, पण काय करू आंब्याचं पीक यावर्षी एवढं आलय की जे करायचं त्यात आंबा हवाच! सकाळी मिल्कशेक, दुपारी पायरीचा रस पोळी, जोडीला रायतं घ्या, लोणचं घ्या जे आवडेल ते, अधे मधे खायला आंबा नुसता कापून आणि रात्री आंबा शिकरण!! मग काय आज केक केला.

साहित्यः एक वाटी हापूस आंब्याचा रस, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी दही, मीठ, अर्धा चामचा खाण्याचा सोडा, एक वाटी रवा, दोन चमचे साजूक तूप.

कृती: आंब्याचा रस काढून घ्या. तो मिक्सरला फिरवू नका. मधेच एखादा तुकडा छान वाटतो. दही, साखर, तूप आणि आमरस एकत्र करून फेटून घ्या. त्यात रवा मिसळा , आणि दोन तास तसेच ठेवा. दोन तासांनी फ्रायपॅनला तूप लावा. तयार मिश्रणात अर्धा चमचा सोडा, चवीपुरते मीठ घालून नीट ढवळून घ्या. फ्रायपॅनमध्ये मिश्रण ओता. आणि सारखे करून २० मिनिटे मंद गॅसवर झाकणासहित ठेवा. वीस मिनिटांनी सुरीचे टोक घालून बघा, मिश्रण चिकटत नसेल तर केक झाला. गॅस बन्द करा. केक थोडा गार झाला की उलटा टाका ताटात! आवडीप्रमाणे कापा, मनसोक्त खा. आंब्याचा स्वाद काय भारी येतो, आणि रंग तुम्हीच सांगा!!