कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, १३ डिसेंबर, २०२०

गरम मसाला आमटी

 गरम मसाला आमटी: 


कोकणात  कोणताही उत्सव, लग्न कार्य याची समाप्ती गरम मसाला आमटी आणि भात याने होते. झणझणीत गरम मसाला आमटी खाताना नाका डोळ्यातून पाणी येते. 

साहित्य: अर्धा कप मसूर डाळ किंवा तूरडाळ, सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी, कांदे 4, लसूण दहा पाकळ्या, मिरी 6, लवंग 6, दालचिनी एक इंच,  1 तमालपत्र, अर्धा टीस्पून बडीशेप, अर्धा टीस्पून धने, तीन वेलदोडे, बटाटा 1, कोथिंबीर, पाणी, तेल दीड टेबलस्पून, मोहोरी पाव टीस्पून, जीरं पाव टीस्पून, हळद पाव टीस्पून, लाल तिखट 1 टीस्पून, चिंचेचा कोळ अर्धा टीस्पून, मीठ.

कृती: डाळ स्वच्छ धुवून त्यात दुप्पट पाणी आणि थोडी हळद घालून शिजवून घ्यावी. 2 कांदे सोलून बारीक चिरून घ्यावे.  बटाटा सोलून फोडी करून घ्या. 2 कांदे गॅसवर जाळी ठेवून भाजून घ्यावे. खोबरं पण गॅसवर भाजून घ्यावे.  छोट्या कढल्यात अर्धा टेबलस्पून तेल गरम करावे. गॅस बारीक करून त्यात लवंग, दालचिनी, मिरी, धने, लसूण, बडीशेप, वेलदोडे  सर्व परतावे. गार करत ठेवावे. खोबऱ्याचे तुकडे करून घ्यावे. भाजलेले कांदे सोलून कापून घ्यावे. सर्व मसाला, कांदा, खोबरं मिक्सरमध्ये वाटून घ्या. लागेल तसं पाणी घालून वाटा.


कढईत एक टेबलस्पून तेल तापत ठेवा.  तेल तापलं की त्यात मोहोरी, जीरं घाला ते तडतडल्यावर त्यात तमालपत्र तुकडे चिरलेला कांदा, बटाटा घालून परता. बटाटा शिजला की हळद, तिखट घालून परता. आता त्यात तयार वाटप घालून परता. डाळ घोटून घ्या, त्यात पाणी घालून कढईत मिक्स करा.  मीठ घाला, अर्धा टीस्पून चिंचेचा कोळ घाला. तुम्हाला पातळ हवी असेल त्या प्रमाणात पाणी घाला. उकळी येऊ द्या. कोथिंबीर घालून  गरमागरम भाताबरोबर किंवा  ब्रेड बरोबर फस्त करा.

टीप: आमच्याकडे यात बटाटा आवडत नाही.

माझ्या मैत्रिणीने सांगितल्या प्रमाणे मी आज वेलदोडे घातले ती चव छान वाटली.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा