कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

चटणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चटणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३१ मार्च, २०२१

दुधीच्या सालींची चटणी

 दुधीच्या सालींची चटणी:


साहित्य: दुधीच्या साली एक कप, अर्धा कप ओलं खोबरं,  दोन टेबलस्पून भाजलेले तीळ, अर्धं लिंबू, एक टीस्पून साखर, एक टीस्पून मीठ, ओल्या मिरच्या पाच, जिरं पावडर किंवा जिरं अर्धा टीस्पून, लसूण चार पाकळ्या(ऐच्छिक), तेल एक टीस्पून

कृती: भाजीसाठी आणलेला दुधी सोलून साली एकत्र करा.  तेलावर  मिरच्यांचे तुकडे आणि सालींचे तुकडे परतत ठेवा, दहा मिनिटं परतून गॅस बंद करा. 


दुधीच्या सालीत ओलं खोबरं, मीठ, साखर ,  भाजलेले तीळ, जिरं पावडर एकत्र करा, लिंबू पिळा. आता थोडे थोडे मिक्सरला लागेल तेवढेच पाणी घालून वाटा. चवीनुसार लागेल ते वाढवा.

मस्त पौष्टिक आणि चविष्ट चटणी तयार आहे!

टीप: लसूण घालणार असाल तर चटणी वाटताना घाला.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

बुधवार, २४ मार्च, २०२१

चिंच गुळाची बाजारी चटणी

 चिंचगुळाची चटणी:  ही चटणी बाहेरून आणलेल्या सामोसा कचोरी सोबत मिळते.

साहित्य:


१) एक कप (250ml) गूळ,

२) पाव कप साखर

३)२ टेबलस्पून चिंचेचा घट्ट कोळ

४)अर्धा टीस्पून शेंदेलोण

५)अर्धा टीस्पून पादेलोण

६) दोन टीस्पून काश्मिरी लाल तिखट

७) अर्धा टीस्पून नेहमीचं लाल तिखट

८) अर्धा टीस्पून धने

९) अर्धा टीस्पून बडीशेप

१०) पाव टीस्पून जीरं

११) अर्धा कप पाणी

कृती:

१) गूळ, साखर आणि पाणी एकत्र करून उकळत ठेवा. 

२) धने, जीरं, बडीशेप गरम करून घ्या, गार करून भरड वाटा.

३) गूळ साखर विरघळली आणि एक तारी पाक झाला की गॅस बंद करून त्यात दोन्ही प्रकारचं मीठ, तिखट, चिंच कोळ आणि मसाला घालून ढवळा.

परत एक कढ काढा.

४) गार करत ठेवा, गार झाल्यावर बरणीत भरून ठेवा.

५) गार झाल्यावर ही चटणी घट्ट होईल.


सोमवार, १ फेब्रुवारी, २०२१

चिंच खजूर गुळाची चटणी

 चिंच  खजूर गुळाची चटणी: 


साहित्य: अर्धा कप चिंच बिया काढलेली, दीड कप गूळ, पाव कप बेदाणे, खजुर 8, जीरं पावडर 1 टीस्पून, धने पावडर 1 टीस्पून, लाल तिखट 1 टीस्पून, काळं मीठ 1 टीस्पून, सैंधव 1 टीस्पून, साधं मीठ पाव टीस्पून, पाणी 3 कप, सुंठ पावडर अर्धा टीस्पून

कृती: चिंच, बेदाणे, खजुर बिया काढून तुकडे हे सर्व एका पातेल्यात घ्या. गूळ चिरून तो घाला. आता त्यात 3 कप पाणी घालून उकळायला ठेवा. उकळत असताना, काळं मीठ, सैंधव, साधं मीठ, धने जीरे पावडर, सुंठ पावडर, लाल तिखट सगळं एकेक करून घालावे. मंद गॅसवर अर्धा तास उकळत ठेवावे.  गार करत ठेवावे. गार झाल्यावर मिक्सर जारमध्ये घालून वाटून घ्यावे.   एक टीस्पून तेल कढल्यात गरम करावे. त्यात चिमूटभर जीरं, धने आणि बडीशेप घालावे.  तडतडल्यावर गॅस बंद करावा. ही फोडणी तयार चटणीला द्यावी. 

टीप: ही चटणी सहा महिने सुध्दा फ्रीजमध्ये चांगली राहते.


चिंचेच्या आंबटपणावर गुळाचे प्रमाण कमी जास्त करावे.

सोमवार, २५ जानेवारी, २०२१

डोश्याची लाल चटणी

 डोश्याची लाल चटणी: 


साहित्य: दोन मध्यम कांदे, दहा बारा लसूण पाकळ्या, एक टीस्पून  तीळ, 1 टीस्पून डाळं, अर्धा टीस्पून उडीद डाळ, बारा सुक्या मिरच्या, 1 टीस्पून जीरं, अर्धा टीस्पून मेथी, मीठ, अर्धा टीस्पून काश्मिरी लाल तिखट, 1 टीस्पून तेल, पाणी, चिंच 1 तुकडा

कृती: गरम पाण्यात सुक्या मिरच्या भिजत घाला. कांदा सोलून चिरून घ्या, लसूण सोलून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. त्यात जीरं, मेथी, उडीद डाळ, तीळ एक घालून परता. आता कांदा, लसूण घालून कच्चटपणा जाईपर्यंत परता. गार होऊ द्या. मिक्सर जार मध्ये भिजवलेल्या सुक्या मिरच्या, डाळं, चिंच, मीठ आणि परतलेले जिन्नस घालून बारीक वाटून घ्या. छान गुळगुळीत होण्यासाठी थोडं पाणी घाला. काश्मिरी लाल तिखट घालून एकदा फिरवा. मस्त चविष्ट लाल चटणी तयार आहे!☺️


✍🏻मीनल सरदेशपांडे

गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

कारळ्याची चटणी

 कारळ्याची चटणी:


 याला आमच्याकडे तीळकुट म्हणतात. अगदी कमी साहित्यात होणारी आणि या सिझनला हवीच अशी चटणी! कारळे तीळ हे थोडे लांबट असतात. रत्नागिरीत माम्या वाटे घेऊन बसतात या तिळाचे, छान असतात त्यांच्याकडे...काकानू घेतांव काय दोन वाटं.. वयनी तीलकुट करील..असं गोड आवाजात सांगितलं की बाबा आणायचेच!

साहित्य: 

कारळे तीळ अर्धा कप, अर्धा कप सुकं खोबरं, पाच सहा सुक्या मिरच्या, 1 टीस्पून गूळ, एक चिंचेचं बोटुक म्हणजे 1 इंचाचा तुकडा, मीठ 1 टीस्पून, लसूण पाकळ्या दहा बारा, पाव टीस्पून तेल, लाल तिखट 1 टीस्पून


कृती: तीळ नीट चाळून निवडून घ्या. खोबरं भाजून घ्या. तेलावर सुक्या मिरच्या आणि चिंच किंचित परतून घ्या. निवडलेले तीळ भाजून घ्या, पण खूप जास्त वेळ भाजायचे नाहीत फक्त  मंद गॅसवर गरम करायचे आहेत नाहीतर चटणी कडवट लागेल. आधी मिरच्या, लसूण आणि चिंच मिक्सर जारमध्ये बारीक करा, मग हळूहळू तीळ, खोबरं बारीक करा. सगळ्या मिश्रणात मीठ, तिखट, गूळ मिक्स करून परत सगळं बारीक करून घ्या. चव बघून लागेल ते वाढवा.

 मस्त टेस्टी चटणी तयार आहे!


टीप: लसूण ऐच्छिक आहे. चिंच गुळाने मस्त येते चव पण तुम्हाला नको असेल तर साखर आणि आमचूर पावडर पण घालू शकता.

तिखट मिठाचं प्रमाण चव बघून कमी जास्त करा.

माहितीसाठी तिळाचा फोटो देतेय.


✍🏻 मीनल सरदेशपांडे

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

मुगडाळीचा चटका

 मुगडाळीचा चटका:


साहित्य: मूगडाळ पाव कप, दही एक कप, तीन ओल्या मिरच्या, कोथिंबीर मूठभर, तूप एक टीस्पून, जीरं पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, मीठ, साखर एक टीस्पून

कृती: मूगडाळ धुवून गरम पाण्यात भिजत घाला. दोन तास भिजू द्या. भिजल्यावर पाणी काढून वाटून घ्या. मिरच्या वाटून घ्या. तुपाची हिंग, जीरं घालून फोडणी करा. वाटलेल्या डाळीत, मीठ, साखर, दही, फोडणी, चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. चवीनुसार लागेल ते वाढवा. मस्त डावी बाजू तयार आहे!

टीप: हा चटका मिक्स डाळींचा पण छान लागतो, थोडा सणसणीत हवा.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

बुधवार, २४ जुलै, २०१९

दोडक्याच्या सालींची चटणी

दोडक्याच्या सालींची चटणी:





साहित्य: 
दोडक्याच्या साली एक कप, अर्धा कप ओलं खोबरं, अर्धं लिंबू, एक टीस्पून साखर, एक टीस्पून मीठ, ओल्या मिरच्या पाच, जिरं पावडर किंवा जिरं अर्धा टीस्पून, लसूण चार पाकळ्या(ऐच्छिक), तेल एक टीस्पून
कृती: 
भाजीसाठी आणलेले दोडके सोलून साली एकत्र करा. बारीक तुकडे करा. तेलावर सालींचे तुकडे परतत ठेवा, पाच मिनिटं परतून गॅस बंद करा.  दोडक्याच्या सालीत ओलं खोबरं, मीठ, साखर , जिरं पावडर, मिरच्यांचे तुकडे एकत्र करा, लिंबू पिळा. आता थोडे थोडे मिक्सरला लागेल तेवढेच पाणी घालून वाटा. चवीनुसार लागेल ते वाढवा.
मस्त पौष्टिक आणि चविष्ट चटणी तयार आहे!
टीप: लसूण घालणार असाल तर चटणी वाटताना घाला.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

मंगळवार, ७ मे, २०१९

कैरी शहाळ्याची चटणी:

कैरी शहाळ्याची चटणी: 




साहित्य:
एक कप(250ml) जाडसर शहाळ्याचे तुकडे, चार सुक्या मिरच्या, कैरी किसून 2 टेबलस्पून, मीठ 1/2 टीस्पून, साखर 1/2 टीस्पून, लसूण पाकळ्या 6

कृती: शहाळ्याचे तुकडे करून घ्या. सुक्या मिरच्या गरम पाण्यात दहा मिनिटं भिजवा. लसूण सोलून घ्या. शहाळ्याचे तुकडे, भिजवलेल्या मिरच्या, लसूण, कैरी कीस, मीठ साखर सर्व एकत्र करून मिक्सरला फिरवून घ्या. फिरवताना लागलेच तर थोडे पाणी घाला.
भाकरी बरोबर चटणी मस्त लागते.
सुक्या मिरचीचा तिखटपणा आला नाही तर लाल तिखट घाला.
चवीनुसार मीठ घाला. साखर नको असेल तर नाही घातली तरी चालेल.       
                                        
✍🏻मिनल सरदेशपांडे

बुधवार, १७ एप्रिल, २०१९

कढीलिंबाची चटणी:

कढीलिंबाची चटणी:
बागेत काम करायला कामगार आले आणि भरपूर कढीलिंब फांद्या कापल्या. एवढा कढीलिंब पाहिल्यावर चटणी करायचा मोह आवरेना!
  • साहित्य:
  • 2 कप(250ml) पूर्ण भरून कढीलिंब पाने,
  •  1/4 कप तीळ,
  •  1/2 कप सुकं खोबरं,
  •  2 टेबलस्पून तेल, 
  • लाल तिखट 1 टेबलस्पून, 
  • 1/3 कप डाळं, 
  • 1 टीस्पून साखर, 
  • 1 टीस्पून मीठ, 
  • 1टीस्पून चिंच
  • कृती: 
  • कढीलिंबाची पाने स्वच्छ धुवून कापडावर पसरून कोरडी करा.
  •  खोबरं किसून भाजून घ्या.
  •  तीळ भाजून घ्या. 
  • कढईत मंद गॅसवर तेलात पाने परतत रहा.
  •  कुरकुरीत होऊ द्या. 
  • एकेक वस्तू मिक्सरला बारीक करा.
  •  चिंच वेगळी मिक्सरला फिरवून घ्या.
  •  बारीक केलेलं साहित्य, मीठ, साखर, तिखट, चिंच एकत्र करून परत एकदा मिक्सरला फिरवा.
  •  चवीप्रमाणे हवं ते वाढवा.
  • मस्त चटणी तयार आहे.


✍🏻मिनल सरदेशपांडे

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

कच्च्या टॉमेटोची चटणी:

कच्च्या टॉमेटोची चटणी:

साहित्य:
 कच्चे टॉमेटो अर्धा की, एक टेबलस्पून तेल, दोन टेबलस्पून दाण्याचं कूट, एक टेबलस्पून ओलं खोबरं, गूळ एक टेबलस्पून, मीठ, तिखट अर्धा टीस्पून, हळद पाव टीस्पून, मोहोरी पाव टीस्पून.

कृती: 
टॉमेटो धुवून बारीक चिरावेत. कढईत तेल तापवावे. त्यात मोहोरी घालावी, ती तडतडली की हळद, तिखट घालावं. टॉमेटो घालून परतावं. झाकण ठेवून दहा मिनिटं वाफ येऊ द्यावी. झाकण काढून मीठ, गूळ घालून मंद गॅसवर परतत रहावं. फोडी मऊ झाल्या की दाण्याचं कूट, खोबरं घालून परतत रहावं. तेल सुटलं की गॅस बंद करावा. पोळी सोबत आस्वाद घ्यावा. 

मंगळवार, १० जुलै, २०१८

कांदा कैरीची चटणी

ह्ळूहळू सुट्टया सुरू झाल्या आणि पाहुणेमंडळी येऊ लागली. त्यानिमित्ताने कोकणातील वेगवेगळे पदार्थ घरी होऊ लागले. त्यातील काही निवडक पदार्थ आपल्यासाठी देत आहे. या आधीचा फणस पुलाव जसा हटके तशीच ही चटणीही!!

साहित्यः
 चार मोठे कांदे, एक मध्यम कैरी, सुक्या मिरच्या दहा-बारा, एक वाटी ओले खोबरे, एक वाटी गूळ, मीठ चवीनुसार, पाव वाटी तेल, फोडणीचे साहित्य.

क्रुती:
 सुक्या मिरच्या गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. कांदा, कैरीची साले काढून किसून घ्या. ओले खोबरे, सुक्या मिरच्या मिक्सरला बारिक करून किसलेल्या कांदा कैरीत मिसळा. गुळात खडे असल्यास तेही मिक्सरला बारिक करून गूळ वरील मिश्रणात मिसळा. चवीनुसार मीठ घाला. पाव वाटी तेल तापत ठेवा. मोहोरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करा. तयार फोडणी चटणीला द्या. मिरच्या भिजवून घातल्यामुळे चटणीला सुंदर रंग येतो. मिरच्यांचा तिखटपणा पुरेसा न वाटल्यास लाल तिखट घालावे. गूळाचे प्रमाणही आपल्या चवीनुसार कमी जास्त करावे.
तांदुळाची गरमागरम भाकरी आणि कांदा कैरीची चटणी... अहाहा!!!!!!!!!!!!
chatni

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

पंचामृत: कोकणातील पारंपरिक तोंडीलावणं

साहित्य:
 पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, पाव वाटी शेंगदाणे, सात आठ ओल्या मिरच्या, अर्धी वाटी तिळाचं कूट, पाव वाटी शेंगदाण्याचे कूट, पाव वाटी चिंचेचा कोळ, अर्धी वाटी गूळ, मीठ, दोन चमचे तेल, पाव चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, दोन चमचे गोडा मसाला लागल्यास लाल तिखट, दोन वाट्या पाणी

कृती:
खोबऱ्याचे चिवड्याला करतो तसे काप करावेत. शेंगदाणे भाजून सालं काढून घ्यावेत. कढईत तीळ घेऊन मंद गॅसवर फक्त गरम करावेत. आमच्याकडे काळे तीळ वापरले जातात, पण तुम्ही पांढरेही वापरू शकता. काळ्या तिळाचं जास्त खमंग लागतं पंचामृत! तिळाचं कूट करून घ्यावे. चिंच भिजत घालून कोळ काढावा. मिरच्या धुऊन तुकडे करावेत. कढईत तेल घ्यावे. मंद गॅसवर ठेवावी. तेल तापलं की मोहोरी घालावी. ती तडतडली की मिरच्यांचे तुकडे घालून परतावे. खोबऱ्याचे काप घालावे. दोन मिनिटं परतावे. शेंगदाणे घालावे. हिंग, हळद घालून छान परतून घ्यावे. आता त्यात चिंचेचा कोळ घालावा. दोन वाट्या पाणी घालावं. तिळाचं कूट, दाण्याचं कूट, मीठ, गूळ आणि गोडा मसाला घालून उकळी आणावी. लागल्यास अजून पाणी घालून, चव बघून काही हवं असेल तर वाढवावं. मला लाल तिखट घालावं लागलं. आंबटगोड अप्रतिम तोंडीलावणं तयार आहे!

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

मेतकूट:

: हाही पारंपरिक चविष्ट प्रकार आहे. अनेक पदार्थांची लज्जत वाढवण्यासाठी मेतकूट उपयोगी आहे. सकाळच्या मऊभातापासून भरीत, भडंग,किंवा दह्यात नुसते कालवूनही मेतकूट छान लागते. ही माझ्या आज्जेसासूबाईंची रेसिपी आहे.

साहित्य:

 चणाडाळ पाव की, उडीदडाळ पाव की, वाटाणा हिरवा पाव की, तांदूळ 100 ग्रॅम, गहू 100 ग्रॅम, धने अर्धी वाटी, जीरे अर्धी वाटी, सुंठ पावडर दीड चमचा, हिंग एक चमचा, मोहोरी दीड चमचा, मेथी दीड चमचा, तिखट एक चमचा, हळद एक चमचा

कृती: चणाडाळ, उडीदडाळ, गहू, तांदूळ, हिरवा वाटाणा सगळं वेगवेगळं छान खमंग भाजून घ्यावे. जीरं, धने, मेथी ही तसेच वेगवेगळे भाजावे. मोहोरी गरम कढईत गॅस बंद करून गरम करावी. सर्व एकत्र करून बारीक दळून आणावे. दळून आणल्यावर त्यात हिंग पावडर, हळद पावडर, तिखट, सुंठ पावडर हे सर्व नीट मिसळावे. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावे.


शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

आमसुलाची चटणी

खरंतर आमसुलाची चटणी अतिशय चविष्ट असते, ती इतरवेळी का करत नाहीत कोण जाणे. कदाचित सारखे खीर वडे खाणाय्रा मंडळीना त्रास होऊ नये म्हणून आमसुलाची चटणी याचवेळी केली जात असावी .ज्याच्याशिवाय श्राध्द पक्ष पूर्ण होत नाही अशी ही आमसुलाची चटणी!
साहित्यः
अर्धी वाटी आमसुले, पाव वाटी गूळ, पाच सहा ओल्यामिरच्या, पाव वाटी ओले खोबरे, एक चमचा जीरे, मीठ.
कृती:
आदल्यादिवशी रात्री आमसुले पाण्यात भिजत घालावीत. विसरल्यास सकाळी गरम पाण्यात घालावीत. मिरच्या धुवून तुकडे करावेत. आमसुले (पाण्याशिवाय), मिरच्यांचे तुकडे, ओले खोबरे, गूळ, जीरे आणि चवीनुसार मीठ एकत्र करून छान बारीक वाटावे. गरज वाटल्यास आमसुलाचे पाणी वाटताना घालावे. आमसुले व्यवस्थित आंबट असतील तर गूळ जास्त लागू शकतो.
ही चटणी एकदम मस्त लागते. उरलेले आमसुले भिजवलेले पाणी आमटीत वापरावे.

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

रायआवळ्याचा चटका

उन्हाळ्यात अनेक प्रकारची फळे येतात कोकणात!! या प्रत्येक फळाला वेगळी चव असते. हे रायआवळ्याचे झाड पहा कसे बहरलेय!!
aavla
या रायआवळ्याचा चट्का फार रुचकर होतो.
साहित्यः चाळीस आवळे, पाच सहा हिरव्या मिरच्या, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार, फोड्णीचे साहित्य.
sahitya
कृती: रायआवळे धुऊन बीच्या बाजूचा भाग चिरून घ्यावा. मिरच्या धुऊन मिरच्या व चिरलेल्या आवळ्याच्या फोडी मिक्सरवर फिरवून घ्यावे. आवळ्यांच्या प्रमाणात तुम्हाला पाच सहा मिरच्या कमी वाट्तील पण मी गावठी मिरच्या वापरल्या आहेत त्या खूप तिखट असतात. नेहमीच्या लांबड्या मिरच्या कदाचित जास्त लागतील. वाटलेल्या मिश्रणात साखर आणि चवीनुसार मीठ घालावे. वाट्ताना साखर किंवा मीठ घालू नये. आवळ्याला पाणी सुटून चट्का पातळ होतो. एक चमचा तेलाची मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. गार झाल्यावर चटक्याला द्यावी. आंबट, गोड, तिखट असा जिभेला चव आणणारा चट्का तयार!!
हा चटका फ्रिजमध्ये दोन तीन दिवस टिकतो. याशिवाय या आवळ्याचे सरबत छान होते. नेहमीच्या खोबय्राच्या चटणीत आंबटपणासाठी हा आवळा वापरला तर ती चवही वेगळी लागते.
याशिवाय रायआवळ्याचे आणखी काही प्रकार होत असतील तर जरूर शेअर करा. आमच्या बागेत खूप आवळे लागलेत. वर फोटो पाहिलात ना!
chatka