कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

उपाहार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उपाहार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

घोसाळ्याची (पारोश्यांची) भजी

या मोसमात मुबलक प्रमाणात ही भाजी बाजारात दिसते. याची चिंचगुळाची भाजी, दह्यातले भरीत होतेच, पण भजी म्हणजे अहाहा!!!!
bhaji
साहित्यः
दोन पारोशी, तीन वाट्या बेसन, अर्धी वाटी रवा, अर्धा चमचा ओवा, दोन चमचे तिखट, मीठ, तेल तळणीसाठी.
bhaji
कृती:
पारोशी धुवून त्याच्या गोल चकत्या करून घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ घाला. मीठाची चव आली पाहिजे पाण्याला. आता या पाण्यात चकत्या बुडवून ठेवा. एका खोलगट भांड्यात बेसन, रवा, तिखट, मीठ एकत्र करा. ओवा अगदी थोडा भरड करून घ्या. पिठात मिसळा.पाणी घाला. पिठाची चव बघून लागेल तसे तिखट, मीठ वाढवा. आता चकत्या चाळणीवर काढा. पाणी निघून जाऊ द्या. कढईत तेल तापत ठेवा. चकत्या पिठात बुडवून तळून घ्या. रव्यामुळे कुरकुरीत होतात भजी, सोडा किंवा तेल घालायची गरज नाही.
bhaji
मस्त कुरकुरीत भजी तयार आहेत!!
bhaji
आता वाट का पाहताय? करा सुरूवात!! पण जरा जपून, नाहीतर कांदाभजीसारखी खायला जाल आणि तोंड भाजेल!!
ही काही नविन पाकृ नव्हे....फक्त आठवण...केली नसाल तर लगेच करा!!


सोमवार, ४ जुलै, २०१६

कोबीची भजी

पाऊस जोरदार हजेरी लावतोय त्यामुळे गरमागरम भजी हवीतच!
साहित्यः
कोबी अर्धा कि., दोन कांदे, अर्धा कि. बेसन, अर्धी वाटी बारीक रवा, एक चमचा लसूण पेस्ट, एक चमचा आलं पेस्ट, लाल तिखट दोन चमचे, ओवा एक चमचा, मीठ चवीनुसार, तेल तळणीसाठी, अगदी थोडी हळद.
कृती:खेकडा भजीसाठी कांदा चिरतो तसाच लांब उभा कांदा चिरून घ्या, कोबीही कांद्यासारखाच चिरा. आता कांदा कोबी एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट मिसळा, ओवा, हळद मिसळा. दहा पंधरा मिनिटे झाकून ठेवा. कोबीला पाणी सुटले की त्यात रवा मिसळा. आता थोडे थोडे बेसन मिसळा. खेकडा भजीसारखेच भिजवायचे आहे, त्यामुळे बेसन लागेल तेवढेच वापरा. चवीनुसार लागल्यास तिखटमीठ वाढवा. तेल गरम करा. भजी तळून गरमागरम सर्व्ह करा.
मी यासोबत दह्यात कांदा लसूण मसाला, मीठ, साखर घालून दिले होते. ओव्याची पानेही बारीक चिरून घातली होती.
bhaji

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

मुळ्याचे मुठीया

साहित्य: दोन वाट्या मुळ्याचा पाला
बारीक चिरून
दीड वाटी कणिक
एक वाटी रवा
एक वाटी बेसन
एक टीस्पून धने पूड
एक टीस्पून जीरे पूड
एक टेस्पून आलेलसूण पेस्ट
अर्धा टीस्पून मिरची पेस्ट ( तिखट्पणानुसार कमी जास्त)
एक टीस्पून आमचूर
पाव टी स्पून खायचा सोडा
मीठ चवीनुसार
अर्धा टीस्पून मोहरी, एक टीस्पून पांढरे तीळ, चिमुट्भर हिंग अर्धी वाटी तेल
बारीक चेरलेली कोथिंबीर, ओले खोबरे (ऐच्छीक)
कृती: एक चमचाभर तेल कढईत घेऊन मुळ्याचा बारीक चिरलेला पाला परतून घ्यावा. एक वाफ आली की गार करण्यास ठेवावा. मुळ्याचा पाला, गव्हाचे पीठ, रवा, बेसन, आले लसूण मिरची पेस्ट, धने-जीरे पूड, मीठ, आमचूर पावडर, सोडा हे सर्व जिन्नस एकत्र करावे. गरज लागल्यास थोडे पाणी घालून पीठ भिजवावे. हाताला तेल घेऊन मुठिया करून घ्या. चाळणीत केळीचे पान ठेवून किंवा चाळणीला तेलाचा हात लावून त्यात तयार मुठिया ठेवा. पाणी घातलेल्या पातेल्यात चाळण ठेवून १५ मिनीटे वाफवा.


गार झाल्यावर गोल चकत्या करून घ्याव्या. मोहरी, तीळ, हिंगाची अर्धी वाटी तेलाची फोडणी करून त्यात मुठिया परतून घ्याव्या. ओले खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह कराव्या.

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

मुगडाळीचे डोसे


साहित्यः मुगडाळ तीन वाट्या, उडीदडाळ एक वाटी, १०-१२ लसूण
 पाकळ्या, एक इंच आल्याचा तुकडा, मीठ, ७-८ ओल्या मिरच्या.

कृती: मुगडाळ आणि उडीदडाळ स्वच्छ धुऊन ४/५ तास भिजवावी.
 मिक्सरला बारीक वाटून रात्रभर पीठ झाकून ठेवावे.
 स़काळी त्यात आले लसूण मिरची वाटून घालावी. 
चवीनुसार मीठ घालावे.
 आवडीप्रमाणे डोसे घालून नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.
 हे डोसे अतिशय हलके होतात.