कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

कारळ्याची चटणी

 कारळ्याची चटणी:


 याला आमच्याकडे तीळकुट म्हणतात. अगदी कमी साहित्यात होणारी आणि या सिझनला हवीच अशी चटणी! कारळे तीळ हे थोडे लांबट असतात. रत्नागिरीत माम्या वाटे घेऊन बसतात या तिळाचे, छान असतात त्यांच्याकडे...काकानू घेतांव काय दोन वाटं.. वयनी तीलकुट करील..असं गोड आवाजात सांगितलं की बाबा आणायचेच!

साहित्य: 

कारळे तीळ अर्धा कप, अर्धा कप सुकं खोबरं, पाच सहा सुक्या मिरच्या, 1 टीस्पून गूळ, एक चिंचेचं बोटुक म्हणजे 1 इंचाचा तुकडा, मीठ 1 टीस्पून, लसूण पाकळ्या दहा बारा, पाव टीस्पून तेल, लाल तिखट 1 टीस्पून


कृती: तीळ नीट चाळून निवडून घ्या. खोबरं भाजून घ्या. तेलावर सुक्या मिरच्या आणि चिंच किंचित परतून घ्या. निवडलेले तीळ भाजून घ्या, पण खूप जास्त वेळ भाजायचे नाहीत फक्त  मंद गॅसवर गरम करायचे आहेत नाहीतर चटणी कडवट लागेल. आधी मिरच्या, लसूण आणि चिंच मिक्सर जारमध्ये बारीक करा, मग हळूहळू तीळ, खोबरं बारीक करा. सगळ्या मिश्रणात मीठ, तिखट, गूळ मिक्स करून परत सगळं बारीक करून घ्या. चव बघून लागेल ते वाढवा.

 मस्त टेस्टी चटणी तयार आहे!


टीप: लसूण ऐच्छिक आहे. चिंच गुळाने मस्त येते चव पण तुम्हाला नको असेल तर साखर आणि आमचूर पावडर पण घालू शकता.

तिखट मिठाचं प्रमाण चव बघून कमी जास्त करा.

माहितीसाठी तिळाचा फोटो देतेय.


✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा