कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

कोशिंबिरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कोशिंबिरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

पपईचे भरीत

पपईचे भरीत:
साहित्य: पिकलेल्या पपईच्या फोडी एक कप, दही एक कप, मीठ, साखर एक टीस्पून, दोन मिरच्या, जिरं पाव टीस्पून, हिंग चिमूटभर, तूप एक टीस्पून
कृती: पपई  धुवून साल काढुन घ्यावी. फोडी करून घ्याव्या. छोट्या कढल्यात तूप घालावे. त्यात जिरं घालावं, ते तडतडल्यावर मिरचीचे तुकडे घालावे. हिंग घालून तयार फोडणी फोडींवर घालावी, चवीपुरते मीठ, साखर घालून मिक्स करावे. दही घालून चव बघावी. मस्त तोंडीलावणे तयार आहे!
✍🏻मीनल सरदेशपांडे

शनिवार, २४ मार्च, २०१८

आंबा डाळ:

आंबा डाळ:

चैत्र महिन्यात हमखास केला जाणारा प्रकार
साहित्य: एक वाटी चणाडाळ, अर्धी वाटी कैरी कीस, सहा ओल्या मिरच्यांची पेस्ट, पाव वाटी सनफ्लॉवर तेल, अर्धा चमचा मोहोरी, एक चमचा हिंग, एक चमचा हळद, लाल तिखट लागल्यास, साखर एक चमचा

कृती: 1) चणा डाळ चार पाच तास भिजवावी
2) चाळणीवर काढावी.
3) फूड प्रोसेसर च्या भाजी चिरायच्या पात्यावर बारीक करावी. परफेक्ट होते.
4) मिरच्यांची पेस्ट करावी.
5) लहान कढईत तेल तापवावे. मोहोरी, हिंग, हळद आणि चिमुटभर लाल तिखट घालून फोडणी करावी. दहा मिनिटं गार होऊ द्यावी.
6) कैरी धुवून साल काढून किसावी.
7)वाटलेली डाळ, कैरी कीस, मिरची पेस्ट, साखर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व एकत्र करावे.
8) फोडणी मिक्स करावी
9) चव बघून मीठ, लाल तिखट घालावे.
10) पोळीबरोबर सर्व्ह करावी.


Aamba Dal:
Ingredients: one bowl Chana dal, half bowl grated raw mango, 1/4 bowl sunflower oil, 1tsp. green chili paste, salt, sugar 1tsp, mustard seeds half tsp, asfoetida 1 tsp, turmeric powder 1 tsp, red chili powder if required, coriander leaves finely chopped 2 table spoon


How to make:
1) Soak dal 4/5 hours.
2) Drain all water.
3) Grind on food processor (vegetable cutter),
4) Make paste of green chillies
5) Heat oil in small pan. Add mustard seeds, asfoetida, turmeric powder, and a pinch of red chili powder. Keep aside for ten minutes.
6) Wash raw mango, peel and grate it.
7) Mix dal, grated mango, chili paste, finely chopped coriander , sugar and salt to taste.
8) Add tadka.
9) Add salt, red chili powder if required.
10) Serve with roti.


बुधवार, २१ मार्च, २०१८

दह्यातील उकडांबा:

आज लोणच्यासाठी बरण्या धुवून ठेवायच्या म्हणून बघायला गेले तेव्हा लक्षात आलं मिठात आंबे राहिलेत दोन अजून.. म्हटलं चला करून टाकू तोंडीलावणं!

साहित्य: मिठातले उकडांबे दोन, एक वाटी दही, दोन चमचे साखर, दोन ओल्या मिरच्या, चिमुटभर हिंग, पाव चमचा जीरं, तीन चमचे तूप, कोथिंबीर बारीक चिरलेली, मेतकूट दोन चमचे( ऐच्छिक)

कृती: मिठातला उकडांबा
उकडांबा करण्यासाठी वेगळे खास रायवळ आंबे असतात.... नाहीतर कोणतेही छोटे रायवळ तयार आंबे दहा बारा घ्या. पण हे आंबे झाडावरून उतरून काढलेले हवेत, पडलेले टिकत नाहीत. आंबे स्वच्छ धुवा. देठाकडचा चीक जाऊ द्या. पातेल्यात पाणी उकळून त्यात घालून दहा मिनिटं उकळावेत. पाण्यातून चाळणीवर काढून गार होऊ द्यावेत. आंबे पूर्ण गार व्हायला हवेत. आता देठाकडून साल थोडी सोडवून ठेवा. एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत आंबे बुडतील इतपत पाणी घ्या. पाणी खारट लागेल इतपत मीठ घाला. आता पूर्ण गार झालेले आंबे पाण्यात बुडवून झाकण लावा. हे आंबे वर्षभर टिकतात. त्यावर पांढरा साक धरतो सायीसारखा तो अधून मधून काढून टाकायचा. माझी आजी मोठी चिनीमातीची बरणी भरून करायची हे आंबे आणि त्याच्या तोंडाला स्वच्छ पांढरं कापड घट्ट बांधायची.. दादरा बांधणं म्हणतात त्याला! आणि मग कोणी आलं गेलं हे आंबे द्यायची! विशेषत: श्रावण महिन्यात तोंडीलावणं म्हणून हे आंबे काढले जायचे!

कृती: दह्यातील उकडांबा:
हा मिठातला आंबा काढून घेऊन त्याच साल सोलावं.. आतील गर काढून घ्यावा. नीट कुस्करून घ्यावा. त्यात दही साखर मेतकूट आणि कोथिंबीर घालावी. तूपाची जीरं, मिरच्या, हिंग घालून फोडणी करावी. ही फोडणी या उकडांब्याला द्यावी. छान मिक्स करावे. मीठ घालावे लागत नाही.


बुधवार, १४ मार्च, २०१८

काजूच्या बोंडांचं भरीत:

उन्हाळ्यात येणारं फळ म्हणजे काजू... काजूगर सगळेच खातात पण काजूबी च्या वर असणारं फळ मात्र आम्ही कोकणी मंडळी आवडीने खातो... नुसतं किंवा तोंडीलावणं करून! होतं काय की काजूबिया निघाल्या की त्यातल्या जून बिया सोलून वाळवून मुंबईत नातेवाईकांना पाठवायच्या आणि कोवळे गर आम्हाला आमटीत मिळायचे! सुकलेल्या बिया गोळा करण्यात दोन दोन तास जायचे... मग ही फळं खायचो आम्ही! त्यात काही फळं घशात खवखवतात तर काही मस्त असतात. उन्हात तहान पण भागायची आणि बिया गोळा व्हायच्या. एकाने झाडावर चढून झाड हलवलं की खाली सडा पडायचा! बिया गोळा करायला गेलो की आम्ही त्या झाडाला खाच मारून यायचो, म्हणजे चार दिवसांत गोंद तयार व्हायची जी पुढच्या वर्षी पुस्तकांची कव्हर चिकटवायला उपयोगी यायची! अशा या काजूच्या फळांची  रेसीपी!

काजूच्या बोंडांचं भरीत:
साहित्य:

 पाच सहा पिकलेली काजूची बोंडं/ जाम, दीड वाटी दही, दोन मिरच्या, दोन चमचे तूप, पाव चमचा जीरं, एक चमचा मेतकूट, दोन चमचे साखर, मीठ, कोथिंबीर, चिमुटभर हिंग

कृती:

 पिवळी बोंडं घेऊन स्वच्छ धुवावी. फोडी करून त्यात थोडे पाणी घालून शिजवावी. शिजलेल्या फोडी चाळणीवर काढाव्यात. तूपाची जीरं, मिरच्यांचे तुकडे, हिंग घालून फोडणी करावी. फोडी एका बाऊलमध्ये घेऊन त्यात मीठ, साखर, मेतकूट, फोडणी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भरीत सारखं करावं.पाणी काढून टाकल्याने घशात खवखव होत नाही.

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

पडवळाच्या बियांचा चटका:

पडवळाच्या बियांचा चटका:
एक वाटी पडवळाच्या कोवळ्या बिया, दोन ओल्या मिरच्या, दोन चमचे मेतकूट, मीठ, अर्धा चमचा साखर, पाव चमचा जीरं, अर्धा चमचा तूप, दीड वाटी दही, कोथिंबीर, दोन वाट्या पाणी




कृती:

 पडवळाची भाजी करताना बिया कोवळ्या असतील तर त्या टाकू नका. त्या बियांचे दोर काढून घ्या. कढईत तूप तापत ठेवा. तापलं की त्यात जीरं, मिरच्यांचे तुकडे घाला. ते परतले की बिया घाला. थोडं परता.
आता त्यात दोन वाट्या पाणी घालून झाकण ठेवा. दहा मिनिटं मध्यम आचेवर शिजू द्या. मधूनच पाणी आहे ना पहा. बिया शिजल्या की रंग बदलतो आणि चमच्याने बीचा तुकडा पडतो. आता झाकण काढून पाणी राहिले असेल तर पूर्ण आटवा. बिया एक बाऊलमध्ये काढा. कोथिंबीर धुऊन बारीक चिरा. बियांमध्ये मेतकूट, साखर, मीठ, कोथिंबीर घाला. दही मिसळा. मस्त तोंडीलावणं तयार आहे!

सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

फ्लॉवरची कोशिंबीर:


साहित्य: 
अर्धा की फ्लॉवर, दोन टॉमेटो, अर्धे लिंबू, मीठ, दोन ओल्या मिरच्या, अर्धा चमचा साखर, दोन चमचे तेल, पाव चमचा मोहोरी, अगदी थोडा हिंग, पाव चमचा हळद, कोथिंबीर.

कृती:
 फ्लॉवरचे तुरे काढून ते मीठ घातलेल्या कोमट पाण्यात दहा मिनिटं ठेवावेत. टॉमेटो बारीक चिरावा. मूठभर कोथिंबीर धुवून बारीक चिरावी. फ्लॉवर पाण्यातून काढून फूड प्रोसेसरला बारीक करावा किंवा किसणीवर किसावा. त्यात टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, साखर मिक्स करावे. कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, मिरच्या, हिंग, हळद घालून फोडणी करावी. ही फोडणी फ्लॉवरच्या मिश्रणात घालावी. लिंबू पिळावे. कोशिंबीर सारखी करावी. पोळीबरोबर मस्त लागते.

मंगळवार, ४ जुलै, २०१७

तोंडल्याचे भरीत:

साहित्य:
पाव की तोंडली, एक वाटी दही, दोन चमचे मेतकूट, थोडी कोथिंबीर, दोन ओल्या मिरच्या, मीठ, साखर, दोन चमचे तूप, चिमुटभर हिंग, जिरे
कृती:
तोंडली स्वच्छ धुवावीत. काचऱ्या करून। पाण्यात टाकाव्यात. सकाळीच एक वाटी दही लावावे. चिरलेल्या काचऱ्या कुकरला शिजवून घ्याव्यात. चाळणीवर घालून पाणी काढून टाकावे. तूपाची हिंग जिरे आणि मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी. सजलेल्या काचऱ्या बाऊलमध्ये काढाव्यात. त्यात चवीनुसार मीठ, थोडी साखर , दोन चमचे मेतकूट आणि धुवून बारीक चिरलेली कोंथिबीर घालावी. दही घालावे. वरून तयार फोडणी द्यावी. नीट मिक्स करावे. अशा प्रकारे पडवळ, दुधीचे पण भरीत छान लागते.

सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

कोबीची पचडी

साहित्यः
 एक मध्यम कोबीचा गड्डा, एक डाळींब लहान, एक लिंबू, ओल्या मिरच्या चार, कोथिंबीर, मीठ, साखर, दोन चमचे तेल, मोहोरी, हिंग, हळद.
कृती:
 कोबी धुवा आणि किसून किंवा फूडप्रोसेसरला आपल्या आवडीनुसार जाड बारीक करा. डाळींब सोलून घ्या. कोबीच्या किसावर लिंबू पिळा, एक चमचा साखर, मीठ घाला. व्यवस्थित एकत्र करा. तेल तापत ठेवा. मोहोरी पाव चमचा घाला. तडतडली की मिरच्यांचे तुकडे घाला. गॅस बंद करून हिंग हळद घाला. तयार फोडणी कोबीच्या मिश्रणावर घाला. नीट एकत्र करा. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घाला. आता डाळींब दाणे घालून हलक्या हाताने मिसळा.
आमच्याकडे थोडी आंबट आवडते पचडी, मी दाण्याचे कूट घालत नाही.




गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

चिबडाची दह्यातली कोशिंबिर


चिबडाची दह्यातली कोशिंबिर


पावसाळ्यात कोकणात ठरावीक फळभाज्या मोठ्या प्रमाणात येतात. पडवळ, दुधी, काकडी, भेंडे, भोपळा, शिराळी, पारोशी त्यापैकीच एक चिबूड! ही काही फार वेगळी पाकृ नाहीय. पण ज्यांनी चिबूड पाहिला नसेल त्यांच्यासाठी! चिबूड नुसता मीठ साखर लावून पण चांगला लागतो.
chibud
हा चिरल्यावर आतून असा दिसतो.
chibud
साहित्यः
एक मध्यम आकाराचा चिबूड, पाव लिटर दुधाचे घट्ट दही, पाच सहा ओल्या मिरच्या, मीठ, चार पाच चमचे साखर, दोन चमचे तूप, हिंग , जीरे.
chibud
कृती:
बाहेरची साल पूर्ण पिवळी झालेला चिबूड घ्यावा. बिया आणि साल काढून फोडी करून घ्याव्या. दह्यात मीठ, साखर घालून सारखे करावे. तूप गरम करून जीरे, मिरची तुकडे, हिंग घालून फोडणी करावी. जेवायला बसताना आयत्यावेळी सगळे एकत्र करावे. चिबडाच्या फोडीत मीठ, साखर घातल्यास पाणी सुटते, म्हणून आयत्यावेळी सारखी करावी.
याला एक प्रकारचा वास असतो, काहींना तो आवडत नाही. पण ज्यांना आवडतो ते वाट बघत असतात, कधी मिळतोय चिबूड याची! या कोशिंबीरीला साखरेची पुढे चव चांगली वाटते. फोडणी नको असेल तर मिरच्या वाटून घालाव्या.
chibud