कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

दिवाळी फराळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिवाळी फराळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १० एप्रिल, २०२१

फुलवडी

 फुलवडी:


गुजराती फरसाण प्रकार खूपच प्रसिद्ध आहेत. त्यातला हा एक प्रकार! 

साहित्य: 

 दोन कप बेसन, पाव कप रवा, 1 टीस्पून भरड धने, 1 टीस्पून भरड मिरी, 1टीस्पून भरड जीरं, 1 टीस्पून ओवा, 2  टीस्पून तीळ, मीठ चवीनुसार, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, 6 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून खायचा सोडा, तळणीसाठी तेल, पाणी, चाट मसाला

 कृती: बेसन, रवा एकत्र करा, त्यात सोडा आणि तेल सोडून सगळं मिक्स करा. सहा टेबलस्पून तेल गरम करा. गरम झालं की गॅस बंद करून त्यात सोडा घाला. ते तेलाचे मोहन पिठात घाला. थोडं थोडं पाणी घेऊन पीठ भिजवा, खूप घट्ट नको, चकली इतपत. 


 अर्धा तास झाकून ठेवा. हाताने लांबट वड्या वळा. तेलात मंद गॅसवर तळून घ्या. 


सगळे तळून झाल्यावर त्यावर चाट मसाला भुरभुरावा. 

 चटपटीत फुलवडी तयार आहे.


गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

चकली कृती: भाजणी सहित

 चकली:


 भाजणी:


साहित्य: 1 की तांदूळ, अर्धा की चणाडाळ, पाव की उडीद डाळ, एक वाटी पोहे, एक वाटी साबुदाणा, अर्धी वाटी जीरे, धने एक वाटी

कृती: तांदूळ धुवून सावलीत वाळवावेत. तांदूळ आणि बाकी सर्व साहित्य एकेक करून मध्यम गॅसवर भाजावे. खूप जास्त  भाजू नये. सर्व गोष्टी एकत्र करून बारीक दळावे.


चकली साठी साहित्य:  भाजणी पीठ 1 की, दोन कप पाणी, अर्धा कप तेल, 3 टेबलस्पून तिखट, 5 टीस्पून मीठ, 2 टीस्पून ओवा किंचित भरडून, 2 टीस्पून पांढरे तीळ, तळणीसाठी तेल

कृती: पाणी आणि तेल एका पातेल्यात एकत्र करावे. त्यात तिखट, मीठ, ओवा घालून उकळी काढा.  उकळी आली की गॅस बंद करून त्यात भाजणी आणि तीळ मिक्स करून झाकून ठेवा. दहा मिनिटांनी पीठ लागेल तसं पाणी घेऊन मळा, फार सैल नको. मी फूड प्रोसेसर मध्ये मळून घेते.

तयार गोळा सोऱ्यात भरून चकली जाड प्लॅस्टिक पिशवीवर पाडा. कढईत तेल गरम करून घ्या. मध्यम आचेवर चकल्या तळा. 

मस्त कुरकुरीत चकल्या तयार आहेत.

 टीप: मी हळद नाही घालत तुम्ही हवी तर घाला.

एक किलोत 60 ते 70 चकल्या होतात.

चकलीचं पीठ व्यवस्थित मळून घेतलं की चकल्या छान होतात. 

गॅस सतत लहान मोठा करत बसू नका. त्यामुळे तेलाचा ताव कमी जास्त होतो आणि चकली बिघडते.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९

फुलांचे चिरोटे

फुलांचे चिरोटे:






साहित्य: 1) चिरोट्यासाठी :एक कप पाणी, पाऊण कप पातळ तूप/ तेल, मीठ, मैदा चार कप,  2) साटा करण्यासाठी: घट्ट तूप अर्धी वाटी, अडीच टीस्पून कॉर्न फ्लोअर, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर,
3)वरून भुरभुरावण्यासाठी: पिठीसाखर पाव की, 4)तळण्यासाठी रिफाईंड तेल किंवा साजूक तूप साधारण अर्धा की
कृती: 1) एक वाटी पाणी आणि पाऊण वाटी पातळ तूप आणि चवी पुरते मीठ घालून उकळावे.
2) गार करत ठेवावे.
3) घट्ट तूप अर्धी वाटी, कॉर्न फ्लोअर अडीच टीस्पून, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर हे सर्व एकत्र करून फेटून घ्यावे. याला साटा म्हणतात.
 4)तयार पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात हळूहळू मैदा मिसळावा. नेहमीच्या पोळीच्या कणके एवढं घट्ट पीठ भिजवावं.
5) पिठाचे तीन सारखे पोळीला घेतो तसे गोळे करून घ्यावे.
6) तीन पोळ्या लाटाव्यात.
7)पहिली पोळी घेऊन त्याला साटा लावावा, खूप जास्त नाही हाताने सगळीकडे पोळीला तेल लावतो तसा लावावा. 8)त्यावर दुसरी पोळी त्याला साटा परत तिसरी पोळी त्यावर साटा लावून गुंडाळी करावी. 
9)अलगद फिरवून थोडी घट्ट करून घ्यावी. सुरीने तुकडे करावेत.


11) पुरीसारखे गोल पण अलगद लाटावेत.
10) तळणीसाठी कढईत तेल किंवा तूप तापत ठेवावे.
11) मध्यम गॅसवर बदामी रंगावर तळावेत.
12) चाळणीवर काढून तूप निथळू द्यावे.
13) दोन मिनिटांनी तयार फुलांच्या चिरोट्यावर पिठीसाखर भुरभुरावी.

14) घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

मक्याचा चिवडा

मक्याचा चिवडा:

गणपतीत रोज काहीतरी गोड खाणं झालं की चटपटीत हवं वाटायला लागतं! त्यासाठी घरीच करा कुरकुरीत मक्याचा चिवडा!
साहित्य: मक्याचे पोहे अर्धा की, पिठीसाखर अर्धा कप( कप=250 ml), मीठ एक टेबलस्पून, लाल तिखट एक टेबलस्पून, शेंगदाणे एक कप, काजूगर अर्धा कप, कढीलिंबाची पाने 25/30, तेल तळणीसाठी

कृती: कढईत तेल घ्या, त्यात तारेचे गाळणे ठेवा, गाळणे तेलात ठेवल्यावर त्यात तेल दिसेल. कढई तापत ठेवा. मक्याचे पोहे या गाळण्यात घालून झाऱ्याने हलवून तळा. हे पोहे पटकन फुलतात त्यामुळे गॅस मोठा ठेवू नका नाहीतर पोहे करपतील, पोहे तळलेत असं वाटलं तर गाळणे वर उचलून सावकाशपणे पोहे काढता येतात. असे सर्व पोहे नीट हलवून तळून घ्या. त्याच गाळण्यात अनुक्रमे शेंगदाणे, काजूगर आणि कढीलिंबाची पाने तळून या पोह्यांवर घाला. पिठीसाखर, मीठ, तिखट घालून चिवडा हलक्या हाताने नीट मिक्स करून घ्या.
गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
टीप: मी या चिवड्याला फोडणी करत नाही.
 आवडत असतील तर खोबऱ्याचे पातळ काप तळून घालू शकता.
तिखट, मीठ आणि साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदला.
✍🏻 मीनल सरदेशपांडे



रविवार, १७ मार्च, २०१९

चटपटीत शंकरपाळे:

चटपटीत शंकरपाळे:

एखादया माणसाची आपल्याला इतकी सवय होऊन जाते ना की कोणत्याही त्याच्या आवडीच्या गोष्टी करताना आठवण येतेच. आपली माणसं कितीही वर्ष असली तरी ती हवीशी असतात. तसं असलं तरी सगळ्या गोष्टी आपल्या हातात थोड्याच असतात?
23 फेब्रुवारीला माझी आई आम्हाला पोरकं करून निघून गेली. तिच्या प्रत्येक फोनवर ती कुठेतरी वाचलेली नवीन रेसीपी मला सांगायची. किती छान झालेलं हे वर्णन भरभरून करायची. मुख्यतः ज्या गोष्टी फुकट जातील त्यापासून खूप काही बनवायची ती! फेण्या, पापड, कुरडई हे तिच्या अत्यन्त आवडीचे विषय! फणसाचे पापड, रताळ्याच्या, सुरणाच्या, पोह्यांच्या फेण्या मला तर प्रकार पण माहीत नाहीत. नियमितपणे रोज एक छोटा गोळा भिजवायचाच. आत्ताही लेबल लावून नाव लिहून पॅक केलेल्या फेण्या आहेत तिच्या, शेवटपर्यंत ती स्वावलंबी होती.

तिच्या इतकं नाही तरी करीत राहीन काहीतरी असं सांगितलंय मी तिला!

आज मटार करंजी केली त्याचा रवा मैदा भिजवलेला उरला थोडा, मग त्याची पोळी लाटली. त्यावर जीरावन मसाला पसरला, घडीच्या पोळी सारखी घडी करून पोळी लाटली आणि केले शंकरपाळे! मस्त चटपटीत, कुरकुरीत झालेत! चहा आणि सोबत शंकरपाळे.. अहाहा!

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

पाडवा स्पेशल... दिव्यांची मिठाई

साहित्य:

 एक वाटी काजूगर, अर्धी वाटी साखर, दोन टीस्पून कोको पावडर, वातींसाठी अर्धी वाटी काजूगर, पाव वाटी साखर केशरी रंग, दिव्यातील तूप म्हणून व्हाईट चॉकलेट कंपाउंड, थोडं दूध, सिल्व्हर बॉल्स


कृती:
 दिव्यासाठी च्या काजूची पावडर करा. त्यात कोको पावडर मिसळून घ्या.कढईत अर्धी वाटी साखर घ्या. त्यात पाव वाटी पाणी घाला. साखर विरघळू द्या. आता त्यात तयार काजू पावडर मिसळून ढवळत रहा. घट्ट होऊ लागलं की खाली उतरून घोटत रहा. गोळा झाला की ताटात काढून मळा. छोटा गोळा घेऊन दिव्याचा आकार द्या. सगळे दिवे करून घ्या.

आता वाती साठी काजू पावडर करा. अगदी तजोड खायचा रंग किंवा केशर सिरप घ्या. कढईत पाव वाटी साखर घ्या.थोडं पाणी घाला. साखर विरघळली की त्यात तयार पावडर आणि रंग मिसळा. दोन मिनिटं ढवळून खाली उतरवा. घटून गोळा करा. वाती तयार करून घ्या. आता एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळवा. दुसऱ्या छोट्या भांड्यात व्हाईट चॉकलेट कंपाऊंडचे तुकडे घ्या. अगदी थोडं दूध घाला. उकळत्या पाण्यात भांडं धरून चॉकलेट वितळवून घ्या. डबल बॉयलर पद्धतीने! आता तयार दिव्यात पटापट चॉकलेट घाला. जरा घट्ट झालं की तयार वाती उभ्या करा.

मस्त वेगळी दिवाळी स्पेशल मिठाई तयार आहे!

मंगळवार, १५ मे, २०१८

चॉकलेट शंकरपाळे

चॉकलेट शंकरपाळे

 

 साहित्य

  • एक वाटी दूध
  • एक वाटी साखर
  • एक वाटी तूप
  • तीन टेबलस्पून कोको पावडर
  • मीठ पाव टीस्पून
  • तळणीसाठी तेल
  • साडेचार वाट्या मैदा
  •  
  • मैदा आणि कोको पावडर एकत्र करून चाळून घ्या.
  • दूध आणि साखर एकत्र करून गरम करा, साखर विरघळू द्या.
  • दूध गार करत ठेवा.
  • एका कढईत तूप तापवा.
  • चाळलेल्या मैद्यात मीठ घाला आणि तुपाचे मोहन घाला.
  • नीट मिक्स करा.
  • थोडं गार होऊ द्या.
  • गार झालेले दूध साखर मिश्रण घेऊन मैदा घट्ट मळा.
  • गरज लागली तर थोडा सुका मैदा घ्या.
  • तासभर झाकून ठेवा.
  • छोटे गोळे करून सर्व शंकर पाळे लाटून, कातून घ्या.
  •  
  • आता सोडवून एका गोळ्याचे एका ठिकाणी असे गठ्ठे करा.
  • कढईत तेल घ्या. अंदाजे पाच वाट्या लागेल.
  • तापले की एकेक गठ्ठा तेलात सोडा.

    1. आत गेल्यावर ते आपोआप मोकळे होतात.
     मध्यम आचेवर तळा.
  • कोको पावडर मुळे रंग बदललेला पटकन कळत नाही
  • गार झाले की चहा बरोबर सर्व्ह करा.

गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

रवा बेसन लाडू

साहित्य: दीड वाटी बेसन, दीड वाटी रवा, सव्वा दोन वाट्या साखर, अर्धी वाटी तूप, बेदाणे, पाणी, वेलची पावडर
कृती: रवा कोरडा भाजून घ्यावा. तूप घालून बेसन भाजावे. तांबूस होऊ लागले की रवा मिक्स करून थोडे भाजावे. बाजूला ठेवावे. पातेल्यात साखर घेऊन ती बुडेल इतके पाणी घालावे. एक तारी पेक्षा थोडा जास्त पाक करावा. पाकात भाजलेले रवाबेसन, वेलची पावडर घालून नीट मिक्स करावे. झाकून ठेवावे. अधून मधून ढवळावे. तासाभरात मिश्रण लाडू वळण्याइतपत होते. बेदाणे लावून लाडू वळावेत.

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

रवा खोबरं लाडू

साहित्य:
 रवा दोन वाट्या, साखर दीड वाटी, ओलं खोबरं एक वाटी, पाव चमचा वेलची पावडर, बेदाणे, अगदी थोडं मीठ, तूप पाव वाटी, पाणी एक वाटी
कृती:
 रवा कढईत घेऊन मंद गॅसवर थोडा भाजावा. त्यात खोबरं आणि तूप घालून परत खमंग भाजावा. त्यात वेलची पावडर घालावी. एका पातेल्यात दीड वाटी साखर, चवीपुरतं मीठ आणि एक वाटी पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. एक तारी पाक करावा. पाक तयार झाला की रव्यात मिक्स करून थोडावेळ मुरू द्यावे. वळण्या इतपत घट्ट झालं की बेदाणे लावून लाडू वळावेत.

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

चीज शंकरपाळे:


साहित्य: 200 ग्रॅम मैदा, 100 ग्रॅम चीज, दोन चमचे ओवा, दोन चमचे लाल तिखट, दोन चमचे तेल, मीठ, तळणीसाठी तेल

कृती: ओवा मिक्सरला भरड करून घ्यावा. मैद्यात ओवा पावडर, मीठ, तिखट मिक्स करावे. तेल गरम करून ते मैद्यात घालून सगळीकडे नीट चोळावे. चीज किसून घ्यावे. तयार मैद्यात चीज नीट मिसळावे. लागेल तसे पाणी घेऊन घट्ट पीठ मळावे. अर्धा तास झाकून ठेवावे. छोटी लाटी घेऊन लाटावी, शंकरपाळे कातून घ्यावे.

 तेल तापत ठेवावे. चांगले तापले की गॅस मंद ठेवून शंकरपाळे तळून घ्यावे. गार झाले की छान कुरकुरीत होतात.

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

गूळ नारळ पोहे : दिवाळी स्पेशल

कोकणात या दिवसात नविन भात तयार होते.  याभातापासून ताजे पोहे दिवाळीसाठी तयार केले जातात. भात आदल्यादिवशी भिजत घातले जाते. दुसय्रा दिवशी परडीत उसपून त्यावर आधण (गरम) पाणी ओतले जाते. मग हे भात भाजून त्यापासून पोहे कांडले जात. पूर्वी हे काम घरीच केले जाई. आता पोह्यांच्या गिरणीत होते.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी नैवेद्याला गूळ नारळ पोहे हवेतच.
साहित्यः
 एक वाटी गावठी किंवा नेहमीचे जाडे पोहे, अर्धी वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी गूळ, एक चमचा तूप, मीठ, वेलची पावडर. थोडे पाणी.

 कृती: प्रथम पोहे धुवावेत आणि चाळणीवर निथळत ठेवावेत. ओले खोबरे, गूळ आणि चवीला मीठ हे सर्व कढईत एकत्र करावे. पाव वाटी पाणी घालावे. मंद गॅसवर ठेवावे. गूळ विरघळला की धुतलेले पोहे घालून नीट मिसळावे. वेलची पावडर घालावी. चमचाभर तूप सोडावे. आणि एक वाफ येऊ द्यावी. गरमागरम चविष्ट पोहे केळीच्या पानावर घ्यावेत आणि वर तूपाची धार!!!! अहाहा!! थंडीच्या दिवसात मजा येते हे पोहे खायला. गूळ तुमच्या चवीनुसार कमी घेण्यास हरकत नाही.




बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

कडबोळी: दिवाळी स्पेशल

पूर्वी अठराधान्यांची कडबोळी करत असत. अगदी अठरा नाही पण जी घरात उपलब्ध होती ती घेऊन केलेली खमंग कडबोळी!
साहित्यः
भाजणीसाठी: तांदूळ १ कि. ( मी गावठी वापरले), चणाडाळ अर्धा कि., उडीद पाव कि., एक वाटी पोहे, एक वाटी साबूदाणा, पाव वाटी तूरडाळ, पाव वाटी मसूरडाळ, पाव वाटी नाचणी, पाव वाटी मूग, पाव वाटी ज्वारी, अर्धी वाटी धने, पाव वाटी जीरे.
कडबोळ्यांसाठी: एक कि. भाजणी, पाऊण लि. पाणी, तेल १५०मिली, ओवा पाव वाटी, तिखट, मीठ, हळद, तेल तळणीसाठी.
कृती:
तांदूळ धुवावेत आणि सावलीत वाळवावेत. धुतलेले तांदूळ आणि बाकी सर्व साहित्य भाजून घ्यावे. खूप जास्त भाजू नये. उडीद भाजताना काळजी घ्यावी. भाजलेले सर्व साहित्य एकत्र करून बारीक दळून आणावे.
kadboli
कडबोळी करायला घेताना एक कि. भाजणी मोजून घ्यावी, पाऊण लि. पाणी गरम करावे. ओवा मिक्सरला जरा फिरवून घ्यावा. पिठात ओवा, तिखट चार चमचे, हळद एक चमचा, मीठ मिसळावे. तेल चांगले गरम करून पिठावर घालावे. गरम पाणी घालावे. सर्व मिश्रण नीट एकत्र करून झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने भाजणी चांगली मळून घ्यावी. मी फूडप्रोसेसरला फिरवून घेते. तयार पिठाचा गोळा घेऊन ताटाच्या पाठच्या बाजूला लांब वळावे. मग चकलीसारखे गुंडाळावे.
kadboli
कढईत तेल चांगले तापवावे. तयार कडबोळी मध्यम गॅसवर छान कुरकुरीत तळावीत. लोण्याबरोबर फस्त करावीत. चकली तर वर्षभर असतेच. या दिवाळीला बघा कडबोळी करून!
kadboli
मी कडबोळ्याच्या भाजणीत अख्खे हरभरे घालत नाही. हरभरे वापरले तर कडबोळी खाल्ल्यावर जळजळ होते, हा माझा अनुभव पण तुम्ही वापरून पहायला हरकत नाही.

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

जाड पोह्यांचा चिवडा

साहित्यः जाड पोहे, तेल, तिखट, मीठ, पिठीसाखर, फोडणीचे साहित्य, शेंगदाणे.
कृती: जाडे पोहे चाळून पोह्यांना तेल चोळून घ्यावे. साधारणपणे पाव वाटी तेल अर्धा किलो पोह्यांना लागेल. तेल लावून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यावेत. अर्धी वाटी तेल घेऊन त्यात शेंगदाणे तळून घ्यावेत. आवडत असल्यास सुक्या खोबर्‍याचे काप तळून घ्यावेत. उरलेल्या तेलात नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात भाजलेले पोहे, शेंगदाणे, चवीनुसार तिखट, मीठ, पिठीसाखर मिसळावी. मंद गॅसवर चिवडा नीट मिक्स करावा. हा चिवडा मस्त लागतो.
.

भडंग

साहित्यः अर्धा कि. चुरमुरे, तीन चमचे मेतकुट, एक चमचा तिखट, चवीनुसार मीठ, दोन तीन चमचे पिठी साखर, शेंगदाणे, कढिलिंब, तेल, फोडणीचे साहित्य.
कृती: चुरमुरे चाळून घ्यावे. त्यात मेतकुट, तिखट, पिठीसाखर, मीठ घालावे. पाव वाटी तेल घालून हे सर्व चुरमुर्‍यांना लावून घ्यावे. कढईत तेल तापत ठेवावे. त्यात शेंगदाणे तळून बाजूला काढावे. साधारण अर्धी वाटी तेल लागेल. याच तेलात नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यावी. कढिलिंबाची पाने घालावी. ती चुरचुरीत झाली की तयार चुरमुरे घालावेत. तळलेले शेंगदाणे घालावेत. मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतावे. पिठीसाखर, तिखट याचे प्रमाण आवडीनुसार घ्यावे.