कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

तिखट वड्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
तिखट वड्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १० एप्रिल, २०२१

फुलवडी

 फुलवडी:


गुजराती फरसाण प्रकार खूपच प्रसिद्ध आहेत. त्यातला हा एक प्रकार! 

साहित्य: 

 दोन कप बेसन, पाव कप रवा, 1 टीस्पून भरड धने, 1 टीस्पून भरड मिरी, 1टीस्पून भरड जीरं, 1 टीस्पून ओवा, 2  टीस्पून तीळ, मीठ चवीनुसार, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, 6 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून खायचा सोडा, तळणीसाठी तेल, पाणी, चाट मसाला

 कृती: बेसन, रवा एकत्र करा, त्यात सोडा आणि तेल सोडून सगळं मिक्स करा. सहा टेबलस्पून तेल गरम करा. गरम झालं की गॅस बंद करून त्यात सोडा घाला. ते तेलाचे मोहन पिठात घाला. थोडं थोडं पाणी घेऊन पीठ भिजवा, खूप घट्ट नको, चकली इतपत. 


 अर्धा तास झाकून ठेवा. हाताने लांबट वड्या वळा. तेलात मंद गॅसवर तळून घ्या. 


सगळे तळून झाल्यावर त्यावर चाट मसाला भुरभुरावा. 

 चटपटीत फुलवडी तयार आहे.


मंगळवार, २२ जानेवारी, २०१९

कोबीची वडी

कोबीची वडी:
साहित्य: कोबी बारीक करून दोन वाट्या, बेसन दोन वाट्या, रवा दोन चमचे, लाल तिखट एक टीस्पून, आलं लसूण पेस्ट एक टीस्पून, ओवा एक टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, तेल दोन टीस्पून, खायचा सोडा अर्धा टीस्पून, मीठ
फोडणीसाठी: तेल दोन टेबलस्पून, मोहोरी अर्धा टीस्पून, पांढरे तीळ दोन टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, खोबरं, कोथिंबीर
कृती: कोबी बारीक चिरा. एका पातेल्यात कोबी, बेसन, रवा, तिखट, मीठ, हळद, ओवा, आलं लसूण पेस्ट एकत्र करा. दोन टीस्पून तेल घाला.
कुकरमध्ये जाळी ठेवून, जाळी बुडेल एवढे पाणी घाला, गॅस लावून पाणी गरम होऊ द्या. तोपर्यंत तयार मिश्रणात पाणी घालून ढोकळ्या च्या पिठाएवढे सैल करा. थोडी कोथिंबीर चिरून घाला. एका डब्याला तेल लावून घ्या. मिश्रणात सोडा घालून ढवळा, तेल लावलेल्या डब्यात मिश्रण ओता आणि कुकरमध्ये डबा ठेवून शिट्टी न लावता  झाकण लावा. 15 मिनिटं वाफ येऊ द्या. सुरीचे टोक घालून चिकटत नाही ना ते पहा. गार होऊ द्या.
कढईत तेल तापवा. तीळ, मोहोरी, हळद घालून फोडणी करा. वड्या करून फोडणीत परता किंवा वड्यांवर वरून फोडणी द्या. खोबरं, कोथिंबीर घालून सजवा.
✍🏻 मिनल सरदेशपांडे

रविवार, २० जानेवारी, २०१९

मासवडी

मासवडी:
साहित्य: सारण: पाऊण वाटी खोबऱ्याचा किस, पाऊण वाटी तीळ, पाव वाटी खसखस, दोन कांदे, पाव वाटी लसूण, कोथिंबीर चिरून अर्धी वाटी, तिखट एक चमचा, गरम मसाला एक चमचा, मीठ
बाहेरचं आवरण: एक वाटी बेसन पीठ, एक चमचा मैदा, दीड वाटी पाणी, अर्धा चमचा तिखट, मीठ, पाव चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा ओवा, पाव चमचा हळद, दोन चमचे तेल, जाड प्लास्टिक पिशवी
कृती: खोबरं, तीळ, खसखस वेगवेगळे भाजून घ्या. कांदा बारीक चिरा. लसूण सोलून घ्या. कोथिंबीर धुवून बारीक चिरा. कढईत एक चमचा तेल घालून त्यात कांदा आणि लसूण सोनेरी रंगावर परतून घ्या. खोबरं,  तीळ, खसखस मिक्सरला भरडसर वाटून घ्या. कांदा, लसूण मिक्सरला फिरवा. तीळ, खोबरं, खसखस आणि कांदा, लसूण वाटप एकत्र करा, त्यात थोडी कोथिंबीर, मीठ, तिखट, गरम मसाला सगळं घालून नीट मिक्स करा. याची चव सणसणीत हवी. हे सारण दोन वाटी बेसनाला पुरते.
आता एका भांड्यात एक वाटी बेसन, मैदा चमचाभर, तिखट,मीठ आणि दीड वाटी पाणी एकत्र करा. बेसनाची गुठळी मोडून घ्या. कढईत तेल तापवा. मोहोरी, ओवा, हिंग, हळद घालून फोडणी करा. त्यात तयार पीठ घालून मंद गॅसवर ढवळत रहा. झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ काढा. तेवढ्यात पिशवीच्या दोन बाजू कापून घ्या. एका बाजूवर कोथिंबीर पसरा. बेसनाला वाफ आली, घट्ट गोळा झाला की गॅस बंद करा. बेसन थोडं गार होऊ द्या. आता कोथिंबीर लावलेल्या भागावर तो गोळा ठेवा. पिशवीचा दुसरा भाग त्यावर ठेवून लाटण्याने पटापट लाटून घ्या.
पिशवीचा वरचा भाग बाजूला करा. लाटलेल्या बेसनावर सारण पसरा.
एका बाजूने पिशवी सोडवत गुंडाळून रोल करा.
सुरीने वड्या कापा.

मस्त साईड डिश तयार आहे! चव एकदम चमचमीत!
✍🏻 मिनल सरदेशपांडे

सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

सुरळीच्या वड्या

सुरळीच्या वड्या:
कधी कधी खूप सारे पदार्थ करताना एखादा राहून जातो. सुरळीच्या वड्या माझी जाऊ रोहिणी छान करते त्यामुळे मी आपली हाताखाली लुडबुड.. पुर्णपणे एकटीने आज पहिल्यांदा केल्या.
साहित्य: एक वाटी बेसन(चणाडाळीचं पीठ), दोन वाट्या पाणी, एक वाटी ताक, मीठ, दोन ओल्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ओलंखोबरं, दोन चमचे तेल, अर्धा चमचा मोहोरी, हिंग
कृती: खोबरं खवून घ्यावं. कोथिंबीर धुवून बारीक चिरावी. मिरच्या वाटून घ्याव्या. खोबरं कोथिंबीर, मिरचीचं वाटप आणि मीठ एकत्र करावं. दोन वाट्या पाणी आणि ताक नॉनस्टीक पॅनमध्ये एकत्र करावं. चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, हिंग घालावं. आता बेसन घालून नीट मिसळावं. गोळी होता कामा नये.
आता मंद गॅसवर मिश्रण सतत ढवळत राहावं. दोन ताटाना तेलाचा हात लावून घ्यावा. मिश्रण शिजत आलं की घट्ट होत जातं. पिठाचा रंग बदलतो.
आता उलथ्याच्या सहाय्याने भराभर ताटावर पसरावे. त्यावर खोबरं कोथिंबीर घालावी.
आता उभ्या रेषा मारून घ्याव्या. अर्ध्यापर्यंत गुंडाळावे.
अश्या पध्दतीने सर्व वड्या गुंडाळून घ्याव्या. मस्त डीश तयार आहे.
वरून तेलाची मोहोरी हिंगाची फोडणी द्यावी.

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

कोथिंबीर वडी:

कोथिंबीर वडी:


कोथिंबीर जुड्या तीन, दोन वाट्या बेसन, अर्धी वाटी तांदूळ पीठ, एक चमचा ओवा, एक चमचा धने पावडर, एक चमचा जीरे पावडर, दोन चमचे लाल तिखट, एक चमचा हळद, दोन चमचे तेल, मीठ

कृती:

 कोथिंबीर निवडून धुवा, चाळणीवर निथळत ठेवा. बारीक चिरा. वाटीने मोजून घ्या. माझी अगदी चेपून भरून चार वाट्या कोथिंबीर झाली. कढईत दोन चमचे तेल तापवा. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून परता आणि दोन मिनिट झाकण ठेवा. एका पातेल्यात दोन वाट्या बेसन, अर्धी वाटी तांदूळ पीठ, तिखट, मीठ, धने, जीरे पावडर, ओवा, हळद सगळं एकत्र करा. त्यात भज्यांच्या पिठाइतपत होईल असे पाणी घाला. गुठळी राहू देऊ नका. आता परतलेल्या कोथिंबिरीत हे तयार पीठ घालून ढवळा. मंद गॅसवर वाफ येऊ द्या. थाळ्याला तेलाचा हात लावा. मिश्रण मधेच ढवळा. दहा मिनिटात मिश्रण घट्ट होईल आणि हाताला चिकटणार नाही. आता ते मिश्रण थाळ्यात थापा.

 वड्या पाडा. गार झाल्यावर तळा किंवा तव्यावर लावा.

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

अळवाचा पळवा: अळूवडी

कोकण स्पेशल अळूवडीचा प्रकार! भाजणी घालून केलेली अळूवडी मस्त परतून तोंडीलावणं म्हणून घ्या किंवा खोबरं, कोथिंबीर घालून नुसती खा.

साहित्य:
पाच अळूची पाने, पाव वाटी चिंच, पाव वाटी गूळ, दीड चमचा लाल तिखट, मीठ, पाव चमचा हळद, तीन वाट्या पाणी, दोन वाट्या थालिपीठ भाजणी, अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी ओलं खोबरं.


कृती:
अळूची पानं स्वच्छ करून पुसून घ्यावीत. त्याच्या मधल्या शिरा काढून घ्याव्या. चिंच पाण्यात भिजवून कोळ काढावा. गूळ बारीक चिरून घ्यावा. तीन वाट्या पाणी घ्यावं. त्यात गूळ, मीठ, चिंचेचा कोळ, तिखट, हळद घालावं. चव बघावी. आता भाजणी मिसळावी. पीठ पानावर पसरून लावता येईल इतपतच सैल करावे. लागल्यास पाणी घालावे. अळूचे पान उलट करावे. त्यावर पीठ लावावे. त्यावर दुसरे पान ठेवावे. समोरची बाजू आणि कडा आत दुमडून परत पीठ लावावे. आता वडी घट्ट गुंडाळून घ्यावी. त्याला दोरा गुंडाळावा.

 मोदकाप्रमाणे 20 मिनीटं वाफ काढावी. गार झाल्यावर दोरा काढून गोल कापून तळावे किंवा तव्यावर लावावे.
     पण आमच्याकडे तळण्यापेक्षा फोडणीत परतून जास्त आवडतात. उंडे छोट्या चौकोनी फोडी करून चिरावे. कढईत तेल तापत ठेवावे. मोहोरी, हिंग, हळद आणि थोडे तिखट घालून त्यात चिरलेल्या अळूवड्या घालाव्यात. ओलं खोबरं घालावं. छान परतावं. तयार आहे अळवाचा पळवा! चला आता पळवा पटापट!


सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

उपासाच्या सुरळीच्या वड्या

नवरात्र चालू आहे. नऊ दिवस उपास करणाय्रांसाठी थोडी वेगळी पण चविष्ट पाककृती घेऊन आलेय. उपास नसला तरी करून आस्वाद घ्यायला हरकत नाहीच!

साहित्यः
पाऊण वाटी शिंगाडा पीठ, पाव वाटी साबुदाणा पीठ, दोन वाट्या पाणी, एक वाटी ताक, मीठ, दोन ओल्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ओलंखोबरं, दोन चमचे साजूक तूप, अर्धा चमचा जिरं.


कृती:
खोबरं खवून घ्यावं. कोथिंबीर धुवून बारीक चिरावी. मिरच्या वाटून घ्याव्या. खोबरं कोथिंबीर, मिरचीचं वाटप आणि मीठ एकत्र करावं. दोन वाट्या पाणी आणि ताक नॉनस्टीक पॅनमध्ये एकत्र करावं. चवीनुसार मीठ, लाल तिखट घालावं. आता त्यात शिंगाडापीठ आणि साबुदाणा पीठ घालून नीट मिसळावं. गोळी होता कामा नये.

आता मंद गॅसवर मिश्रण सतत ढवळत राहावं.





 दोन ताटाना तूपाचा हात लावून घ्यावा. मिश्रण शिजत आलं की घट्ट होत जातं. पिठाचा रंग बदलतो. आता मिश्रण उलथ्याच्या सहाय्याने भराभर ताटावर पसरावे. त्यावर खोबरं कोथिंबीर घालावी. तूप जिय्राची फोडणी करावी. या मिश्राणावर पसरावी. हा फोटो फोडणी घालण्या पूर्वीचा आहे.


आता उभ्या रेषा मारून घ्याव्या. अर्ध्यापर्यंत गुंडाळावे.


अश्या पध्दतीने सर्व वड्या गुंडाळून घ्याव्या. मस्त डीश तयार आहे. आता मनसोक्त उपास करा!!!