#कचराकंद: सत्व करण्याची पध्द्त:
कचरा कंद हा आरारूट च्या वर्गातील कंद आहे.
कचरा कंदाचे सत्व काढतात ते उष्णतेच्या विकारांत अत्यंत लाभदायी आहे. याची ताकातली किंवा दुधातली लापशी करून घेतल्याने फायदा होतो. ही लापशी किंवा खीर उपासाला चालते.
कचरा कंद हे दिसायला आलं, हळद या सारखे पण पांढऱ्या रंगाचे असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला हे कंद लावतात. भुसभुशीत जमीन करून त्यात हळदीसारखे वाफे करून हे कंद लावावेत. याची पानं पण हळदी सारखी दिसतात.
चार पाच महिन्यात हे पूर्ण तयार होतात.
मुळं मोकळी करून माती स्वच्छ धुवून घेतात.
यातील लागवडी योग्य कंद बाजूला करून उरलेल्या कंदाच्या काचऱ्या करतो तसे कापून घेतात.
मिक्सर जारमध्ये पाणी घालून या काचऱ्या गुळगुळीत वाटतात.
मोठ्या पातेल्यावर पंचा किंवा कोणतेही पातळ कापड ठेवून पंचाच्या सहाय्याने हे वाटलेलं मिश्रण गाळून घेतात.
परत एकदा दोनदा हा चोथा पाणी घालून वाटून परत गाळून घेतात. आता पातेल्यात जमा झालेल्या मिश्रणात भरपूर पाणी घालून ते पातेलं 24 तास न हलवता ठेवतात.
24 तासांनी वर आलेलं नितळ पाणी काढून टाकतात. खाली पातेल्याच्या तळाशी सत्व जमा होते. हे सत्व मोठ्या थाळ्यात ठेवून उन्हात मोकळी पावडर होईपर्यंत वाळवतात.
अशा प्रकारे तयार सत्व बरणीत भरून ठेवतात. हे सत्व वर्षानुवर्षे टिकते.
पूर्वी जेव्हा मिक्सर नव्हते तेव्हा हे कंद धुवून झाल्यावर मोठ्या जात्याच्या दगडावर (घिरटावर) घासत असत. मग तयार झालेलं मिश्रण याच पध्द्तीने गाळून सत्व केलं जात असे.
टीप: मी चार कंद लावले होते त्यापासून अडीच किलो कंद तयार झाले. कंद जेवढे जून म्हणजे तयार असतील तेवढं सत्व चांगलं पडतं.
सत्वाची लापशी किंवा खीर:
साहित्य: एक कप दूध, एक टीस्पून कचरा सत्व, दोन टीस्पुन साखर, चिमूटभर वेलची पावडर
कृती:गार दुधात सत्व नीट मिक्स करून घ्यावे. त्यात साखर, वेलची पावडर घालून गॅसवर ठेवावे. सतत ढवळत रहावे. दूध दाट झालं की खीर तयार! गरम किंवा गार कशीही प्या.
याच पध्दतीने फक्त ताकात मिक्स करून त्यात जिरे पूड, मीठ घालून ताकातली पण करता येते.
माहिती सोबत सर्व प्रक्रिया फोटोसह देत आहे.
याच पद्धतीने आरारूट सत्व केलं जातं.
✍🏻 मीनल सरदेशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा