कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, १० जून, २०१८

आटवलेला आमरस

आटवलेला आमरस:
       आमच्याकडे माझ्या माहेरी आंब्याचा रस आटवणे हा एक सोहळा असे. मे महिन्याच्या शेवटी जेव्हा आंब्याच्या साटांना लागणारे ऊन कमी व्हायला लागते तेव्हा रस आटवायची लगबग सुरू होते. तोपर्यंत सगळ्या नातेवाइकांच्या पेट्या पाठवून झालेल्या असतात. घरात सगळ्यांचे आंबे मनसोक्त खाऊन झालेले असतात. तयार आंबे स्वच्छ धुवायचे आणि डोळस माणसाने रस काढायला बसायचं! हे शेवट शेवटचे आंबे डोळस पणे बघावे लागतात. तोपर्यंत बाबा मागच्या अंगणातल्या थाळी(पाणी तापवायची चूल) लाकडं आणून ठेवायचे. वर्षभर कौलाच्या खाली अडकवलेला लाकडी लांब दांड्याचा उलथा खाली काढून स्वच्छ करायचा. भल्या मोठ्या पराती राखेने चकचकीत करून त्याला खालच्या बाजूने माती आणि राखेचे लेवण घ्यायचे. परातीत घातलेला रस लागू नये आणि परात नीट घासली जावी म्हणून तिच्या तळाला माती आणि राख ओलसर करून लावायची.
आता तयार परातीत रस ओतून ती चुलीवर ठेवायची. लांब दांडा असल्याने ढवळताना रस अंगावर उडत नाही आणि लाकडी असल्याने तापत नाही. 

      आमची जेवणं होईपर्यंत माणसं बदलून बदलून रस आटवत असायची. रस घट्ट व्हायला लागला की त्यात अंदाजे साखर घालायची. परत तो रस आटवायचा. रस घट्ट व्हायला लागला की घरभर मस्त वास पसरतो. मग आम्ही मुलं फणसाची पानं काढून आणायचो आणि तो गरम गरम रस फणसाच्या पानावर घेऊन फुंकर मारत खायचो! अहाहा!! तो असा रस काय भारी लागायचा ... आता इकडे जरी त्या पराती, उलथें नसले तरी मी रस आटवतेच......डोळ्यासमोर ते चित्र आणून... चुलीवर आटवलेल्या रसाची चव नसली येत तरी त्या आठवणीत हा रसाचा गोळा सहज विरघळतो...... जिभेवर परत ती चव रेंगाळते!!😊
साहित्य: 20 हापूस आंबे, 200 ग्रॅम साखर
कृती: आंबे स्वच्छ धुऊन घ्या. सोलून त्याचा रस काढून घ्या. एका मोठया उंच कढईत रस घ्या. मंद आचेवर ठेवा. लांब दांड्याच्या लाकडी उलथ्यानेसतत ढवळत रहा.
गॅस मोठा केलात तर गरम रस अंगावर उडतो म्हणूनच उलथा लांब दांड्याचा हवा. रस आटत आला आणि उडायचा कमी झाला की त्यात साखर मिसळून ढवळत रहा. बाहेर उडत नाहीय याचा अंदाज घेऊन गॅस मोठा करा. दोन अडीच तास तरी लागतात, पूर्ण आटवायला!
हा रस तुम्ही नुसता खाऊ शकता, याच्या मोदक, वड्या, पोळ्या छान होतात.

२ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. साखर थोडीच असल्याने फ्रीजमध्ये ठेवावा लागतो, बाहेर ठेवायचा असेल तर पिठीसाखर मिक्स करून ठेवतात.

      हटवा