कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

उपासाचे पदार्थ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उपासाचे पदार्थ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १० मार्च, २०२१

शेंगदाण्याची आमटी

 शेंगदाण्याची आमटी:


साहित्य: अर्धा कप  दाण्याचं कूट, 1 टेबलस्पून ओलं खोबरं, दोन ओल्या मिरच्या, 4 लवंगा, चार आमसुलं, एक टीस्पून गूळ, एक टीस्पून तूप, पाव टीस्पून जीरं, अर्धा इंच आलं, मीठ, पाणी

कृती: दाण्याचं कूट, खोबरं, मिरच्या, लवंग, आलं सगळं एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून मिक्सर जारमध्ये घालून बारीक पेस्ट करा. ही तयार पेस्ट एका पातेल्यात घ्या. त्यात तुम्हाला दाट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घाला. मीठ, गूळ, आमसुलं घाला. तूप जिऱ्याची फोडणी घालून आमटी उकळा. चव बघून लागेल ते वाढवा.


टीप: वरील साहित्यातील जे पदार्थ तुम्ही उपासाला खात नाही ते आपापल्या श्रद्धेनुसार वगळा.

वरीच्या भगरी सोबत ही आमटी मस्त लागते.

मीनल सरदेशपांडे

मंगळवार, ३० जून, २०२०

अळीव लाडू:

अळीव लाडू:
साहित्य: अळीव एक वाटी(150 ग्रॅम), दोन मध्यम नारळ, गूळ, तूप दोन चमचे
कृती: अळीव नारळाच्या पाण्यात दोन तास भिजत ठेवावेत, नारळाचे पाणी कमी असेल तर थोडे साधे पाणी वापरावे. नारळ खवून घ्यावे. खोबऱ्यात भिजलेला अळीव मिसळावा. हे मिश्रण जेवढं होईल त्याच्या निम्मा  बारीक चिरलेला गूळ  घ्यावा. खोबरं आणि गूळ एकत्र करावं. कढईत दोन चमचे तूप घालून त्यात मिश्रण घेऊन मध्यम गॅसवर परतत रहावे. गूळ विरघळून मिश्रण सुकत आलं की गार होऊ द्यावे.
गार झाल्यावर आवडीप्रमाणे लाडू वळावे. या मिश्रणात 25 ते 27 लाडू होतात.

✍🏻 मीनल सरदेशपांडे

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

उपासाचे काकडीचे घावन:

उपासाचे काकडीचे घावन: 
साहित्य: वरी पीठ एक कप, गूळ किंवा साखर अर्धा कप, काकडी किसून अर्धा कप, ओलं खोबरं पाव कप, मीठ चवीनुसार, तेल, पाणी
कृती: काकडी किसून घ्यावी त्यात गूळ,  खोबरं, मीठ  मिसळून झाकून ठेवावे. गूळ पूर्ण विरघळला की त्यात वरी पीठ घालावे.  थोडे पाणी घालून धिरड्याच्या पिठा इतके सरसरीत पीठ करावे. अति पातळ नको. बिडाचा तवा तापत ठेवावा. तापलं की अर्धा टीस्पून तेल पसरावे. पळीने मिश्रण तव्यावर घालून झाकण ठेवावे. दोन मिनिटांनी बाजू बदलावी. दोन्ही बाजू भाजून घ्याव्यात, तयार घावन तुपासोबत किंवा लोण्यासोबत मस्त लागतात.
✍🏻 गुळाऐवजी साखर घेतल्यास पटकन निघतात. 
गूळ जास्त झाला तर घावन तव्याला चिकटते, अशा वेळी थोडे पीठ आणि पाणी वाढवावे.
✍🏻मीनल सरदेशपांडे




उपासाचा वरी तांदुळाचा शिरा:

उपासाचा वरी तांदुळाचा शिरा:

 
साहित्य: एक वाटी वरी तांदूळ, एक वाटी साखर, अर्धी वाटी तूप, दोन वाट्या दूध, दोन वाट्या पाणी, काजूगर 10/ 12, एक केळं, बेदाणे 20/ 25, वेलची पावडर पाव टीस्पून, चिमूटभर मीठ

कृती: वरी तांदूळ थोडे भाजावे, मिक्सरला लावून थांबून थांबून सेकंदभर फिरवावे, रवा व्हायला हवा पीठ नको.  कढईत तयार रवा घ्यावा त्यात तूप घालून तांबूस होईपर्यंत भाजावे. थोडा रंग बदलला की त्यात केळं सोलून त्याचे काप घालावे. काजूगर, बेदाणे घालावे.  चिमूटभर मीठ घालावे.दूध, पाणी आणि साखर एकत्र करून उकळावे. उकळलेले मिश्रण भाजलेल्या रव्यात हळूहळू ओतावे. गॅस बारीक असावा नाहीतर मिश्रण हातावर उडू शकते. वेलची पावडर घालून नीट ढवळून  झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ येऊ द्यावी. रवा शिजलाय ना पहावं, लागली तर अजून वाफ काढावी. टीप: साध्या रव्यापेक्षा छान भाजला असेल तर याला दूध पाणी जास्त लागते, तुम्ही आधी एक भांडं वगळून नंतर लागेल तसं मिसळू शकता. शिरा खाताना कळत पण नाही की वरीचा आहे.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

उपासाचे धिरडे:

उपासाचे धिरडे:

 
नेहमी उपासाला थालिपीठ केलं जातं पण त्याच पिठाची झटपट आणि छान कुरकुरीत धिरडी पण मस्त होतात.

साहित्य: उपास भाजणी दोन वाट्या, लाल तिखट एक टीस्पून, मीठ अर्धा टीस्पून, तेल, पाणी
भाजणी प्रमाण: एक किलो साबुदाणा, एक किलो वरी तांदूळ, एक किलो राजगिरा, 100 ग्रॅम जीरं.
(सगळं निवडून वेगवेगळे भाजा, दळून ठेवा)

कृती: एका पातेल्यात तयार भाजणी पीठ घ्या. त्यात मीठ, तिखट, एक टीस्पून तेल आणि पाणी घालून नेहमीच्या धिरड्या सारखं भिजवा. खूप पातळ नको. दहा मिनिटं झाकून ठेवा, चव बघून लागेल ते वाढवा. तव्याला तेल लावून पळीने मिश्रण घाला. शक्यतो परत पसरायला लागू नये नाहीतर साबुदाण्यामुळे पळीला पीठ चिकटू शकते. झाकण ठेवून एक बाजू करावी. बाजू उलटून दुसरी बाजू पण भाजावी. लोणी, चटणी किंवा दह्यासोबत आस्वाद घ्यावा.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

रताळ्याचे गोड काप

रताळ्याचे गोड काप:
साहित्य: चार मध्यम रताळी( दीड कप काप), अर्धा कप ओलं खोबरं, चिमूटभर मीठ,  1/3 कप गूळ , दोन टीस्पून तूप
कृती: रताळी स्वच्छ धुवा, सगळी माती जाऊ द्या. नाहीच गेली तर तेवढा भाग सोलून काढून टाका, पूर्ण साल काढू नका. पातळ काचऱ्या करून घ्या.
कढईत तूप तापवा, सगळ्या कढईला नीट लावून घ्या. त्यात काप घालून परता. झाकण ठेवून दहा मिनिटं किंवा शिजेपर्यंत अधूनमधून ढवळत वाफ काढा.
काचऱ्या शिजल्या की त्यात बारीक चिरून गूळ, खोबरं, मीठ घालून ढवळा. अगदी चमचाभर पाणी घाला, झाकण ठेवू नका. मंद गॅसवर गूळ विरघळला की खमंग गोड काप तयार!
✍🏻 मीनल सरदेशपांडे

रविवार, २४ मार्च, २०१९

साबुदाणा खिचडी:

साबुदाणा खिचडी:



  • साहित्य:
  •  एक कप साबुदाणा,
  •  तूप एक टेबलस्पून,
  •  दाण्याचं कूट 1टेबलस्पून,
  • ओलं खोबरं 1 टेबलस्पून, 
  • मीठ 1 टीस्पून, 
  • साखर एक टीस्पून, 
  • आलं पेस्ट टीस्पून,
  •  एक उकडलेला बटाटा,
  •  चार पाच ओल्या मिरच्या, 
  • एक टीस्पून लिंबू रस, 
  • जीरं अर्धा टीस्पून
  • कृती:
  • साबुदाणा धुवून थोडं पाणी घालून रात्रभर भिजत घालावा. 
  • सकाळी बटाटा शिजवून घ्यावा. 
  • साबुदाणा मोकळा करून घ्यावा.
  •  त्यात दाण्याचं कूट, खोबरं, मीठ, साखर, आलं पेस्ट एकत्र करावी.
  •  नीट मिक्स करून घ्यावे. 
  • बटाटा सोलून चिरून घ्यावा. 
  • कढईत तूप तापत ठेवावे. 
  • त्यात जीरं घालावं.
  •  ते तडतडल्यावर मिरचीचे तुकडे घालून परतावे. 
  • बटाटा फोडी घालून परतावे.
  •  थोडं मीठ फोडींवर भुरभुरावे.
  •  तयार मिश्रण घालून नीट ढवळावी.
  • पाच मिनिटं झाकण ठेवावी.
  • साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत शिजवावी.
  • खायला देताना कोथिंबीर, दहयासोबत द्यावी.
  • ✍🏻मिनल सरदेशपांडे

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

उपासाची खांडवी:

उपासाची खांडवी:
साहित्य: वरी तांदूळ एक वाटी, ओलं खोबरं अर्धी वाटी, गूळ एक वाटी, पाणी तीन वाट्या, केशर सिरप एक चमचा, वेलची पावडर पाव चमचा, तूप तीन चमचे, आलं किसून एक चमचा, मीठ
कृती: वरी तांदूळ मिक्सरमध्ये थोडे फिरवून रवा करून घ्या. कढईत दोन चमचे तूप घ्या. त्यात वरीचा रवा तांबूस भाजून घ्या. एका पातेलीत गूळ, पाणी, मीठ चवीला, ओलं खोबरं, आल्याचा कीस एकत्र करा. त्यात केशर सिरप आणि वेलची वावडर घालून गूळ विरघळेपर्यंत उकळा. उकळलेले मिश्रण भाजलेल्या रव्यात घालून ढवळा. मंद गॅसवर दहा मिनिटं वाफ येऊ द्या. थाळ्याला तूप लावून घ्या. दहा मिनिटांनी मिश्रण ढवळून परत झाकण ठेवा. रवा पूर्ण शिजला आणि मिश्रण घट्ट झाले की थाळ्यात थापून घ्या. ओलं खोबरं थापताना वर पसरून सजवा.

सोमवार, २३ जुलै, २०१८

उपासाचे लिंबू लोणचे

साहित्य: सहा लिंबं, साखर तीन वाट्या, लाल तिखट तीन टीस्पून, मीठ तीन टीस्पून
कृती: लिंबं स्वच्छ धुवावीत. कोरडी करावीत. प्रत्येक लिंबाच्या आठ याप्रमाणे फोडी कराव्यात. बिया काढून टाकाव्यात.  फोडी एका घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून कुकरमध्ये 20 मिनिटं फोडीत  पाणी न घालता शिजवाव्या.फोडींच्या दीडपट साखर घ्यावी. दोन वाट्या फोडी झाल्या.  तर त्यात तीन वाट्या साखर, तिखट, मीठ  गरम असताना एकत्र करून ठेवा. दहा दिवस मुरू द्या. अधे मधे ढवळा.

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

तळलेले गरे अर्थात फणसाचे वेफर्स:


साहित्य:
 मोठ्या गऱ्याचा कच्चा फणस, खोबरेल तेल , मीठ, पाणी

कृती: फणसाचे चार भाग करा. चीक कागदाने पुसून घ्या. वरचे साल आणि मधला कडक दांडा काढून घ्या. गऱ्यावर असलेल्या पाती , आतली आठीळ काढून घ्या, आता उभे बारीक काप करा. एका बाऊलमध्ये अर्धा बाउल पाणी घ्या. पाणी चांगले खारट होईपर्यंत मीठ मिसळा. आता कढई तापत ठेवा. अर्धा ली खोबरेल तेल घाला. ओंजळभर गरे तेल तापल्यावर तेलात सोडा. थोडे तळले कि एक चमचा मिठाचे पाणी तळणीत गऱ्यांवर घाला. आता सावकाश तळा. गोल्डन कलर आला की गरे चाळणीत काढा. गार झाले की घट्ट झाकणाच्या डब्यात भरा. मिठाचा अंदाज एकदा तळले कि येईल. माझ्या बहिणीच्या प्रमाणानुसार 5 ली तेलात 12कि गरे तळून होतात.

रताळ्याचा कीस

साहित्य:
 अर्धा की रताळी, एक वाटी किंवा आवडीनुसार शेंगदाण्याचे कूट, दोन चमचे साखर, पाव वाटी तूप, चार ओल्या मिरच्या, मीठ, अर्धा चमचा जीरे, पाव वाटी ओलं खोबरं ऐच्छिक

कृती:
 रताळी स्वच्छ धुऊन घ्यावीत. सालं काढून घ्यावीत. स्वच्छ असेल तर सालं ठेवली तरी चालतील. पातेल्यात अर्धी पातेली पाणी घ्यावे.रताळी किसून कीस पाण्यात टाकावा. मिरच्यांचे तुकडे करून घ्यावे. कीस पाण्यातून काढून घट्ट पिळून घ्यावा. त्यात दाण्याचे कूट, साखर, मीठ घालून नीट मिक्स करावे. कीस परतल्यावर आळतो, त्या अंदाजाने मीठ घालावे. कढईत तूप तापत ठेवावे. तापलं की जीरं, जीरं तडतडलं की मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरच्या परतल्या की तयार मिश्रण घालून ढवळावे. झाकण ठेवून छान वाफ काढावी. दहा पंधरा मिनिटात कीस तयार होतो, त्याचा रंग बदलतो. ओलं खोबरं वरून घालू शकता किंवा आधीच मिक्स करू शकता. चव बघून लागल्यास मीठ घालावे.

साबुदाणा वडा:

साहित्य:
 साबुदाणा 200 ग्रॅम, दोन मध्यम बटाटे, चार ओल्या मिरच्या, अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट, अर्धी वाटी उपास भाजणी, मीठ, तेल, लागल्यास लाल तिखट

कृती:
 आदल्यादिवशी रात्री स्वच्छ धुवून साबुदाणा खिचडी साठी भिजवतो तसा साबुदाणा भिजवावा. सकाळी मिरच्या वाटून घ्याव्या. बटाटे शिजवून घ्यावेत. शिजलेला बटाटा सालं काढून कुस्करून घ्यावा. बटाटा, साबुदाणा, दाण्याचे कूट, भाजणी,मिरची पेस्ट चवीनुसार मीठ घालून पीठ मळावे. चव बघून लागल्यास लाल तिखट घालावे. कढईत तेल तापत ठेवावे. पिठाची गोळी घेऊन वड्यासारखं थापावे. तेल चांगलं तापलं की वडे कुरकुरीत तळावे. गरमागरम वडे चटणीसोबत खावे.
हे वडे पॅटिस सारखे थोडे जाडसर गोल ठेवून तळतात पण त्यापेक्षाही असे थापून केलेले जास्त कुरकुरीत होतात.

सोमवार, ३१ जुलै, २०१७

साबुदाणा लाडू

साहित्य:
 साबुदाणा पीठ दोन वाट्या, पिठीसाखर एक वाटी, साजूक तूप अर्धी वाटी, खसखस पाव वाटी, वेलची पावडर
कृती: 
मंद आचेवर तडतड होईपर्यंत साबुदाणा भाजून घ्या. पीठ करून घ्या. पिठीसाखर आणि तूप एकत्र करून फेसून घ्या. त्या आधी खसखस भाजून बारिक करा. पिठीसाखर आणि तूप ,वेलचीपावडर फेसून घ्या. आता त्यात साबुदाणापीठ, खसखस घालून नीट मिक्स करा. लाडू वळा. तूप बरोबर होतेच पण जास्त वाटले तर थोडे पीठ वाढवा. चव घेऊन लागल्यास पिठीसाखर वाढवा.

ताकातले वरी तांदूळ/ ताकातली भगर:

उपासाला चालणारी झटपट सोपी रेसिपी
साहित्य:
अर्धी वाटी वरी तांदूळ, दोन वाट्या पाणी दोन वाट्या ताक, चार ओल्या मिरच्या, दोन चमचे तूप, चार चमचे शेंगदाण्याचे कूट, पाव चमचा जीरे, मीठ.
कृती: वरी तांदूळ स्वच्छ धुवा. पाणी निथळत ठेवा. कढई तापत ठेवा. मिरच्या धुवा आणि तुकडे करून घ्या. कढईत तूप घाला. तापले की जीरे, मिरच्यांचे तुकडे घालून मंद गॅसवर परता. आता त्यात वरी तांदूळ घालून परता. त्यात पाणी घालून मंद गॅसवर शिजू द्या. वरी शिजली की त्यात दाण्याचे कूट, ताक, मीठ घालून ढवळा. हे थोडे सैलसर असते. गरमागरम छान लागते. उपासाला खात असाल तर कोंथिबीर घाला.

मंगळवार, ४ जुलै, २०१७

उपवासाचे आप्पे

साहित्यः 
दोन वाट्या वरी तांदूळ, अर्धी वाटी साबुदाणा, मिरची पेस्ट, आले पेस्ट, जिरे पावडर, कोथिबिर, दाण्याचे कूट, मीठ, खायचा सोडा, तेल किंवा तूप.

कृती:
 आप्पे करायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी वरी तांदूळ आणि साबुदाणा वेगवेगळे भिजत घालावे. ७-८ तासांनी दोन्ही एकत्र मिक्सरवर वाटावे. मिश्रण इडलीच्या पिठाइतपत असावे. रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी आप्पे करण्यापूर्वी या मिश्रणात अर्धा चमचा आले पेस्ट, अर्धा चमचा मिरची पेस्ट (आवडीनुसार प्रमाण घ्यावे.), मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, २-३ चमचे दाण्याचे कूट, चिरलेली कोथिंबिर मिसळावी. पाव छोटा चमचा खायचा सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. आप्पेपात्रात नेहमीच्या आप्प्याप्रमाणे आप्पे करावे. नारळाच्या दही घातलेल्या सैलसर चटणीसोबत खावे.



साबुदाणा खीर/ लापशी

साहित्य: एक वाटी भिजवलेला साबुदाणा, अर्धा ली दूध, ५/६ चमचे साखर , चिमुटभर वेलची पावडर.

कृती: 
खिचडीसाठी साबुदाणा भिजवलेला असेलच. त्यातला एक वाटी छान भिजलेला साबुदाणा एका पातेल्यात घ्या. त्यात अर्धा ली दूध मिसळा. पाच सहा चमचे साखर घाला. मिश्रण नीट ढवळून गॅसवर ठेवा. छान उकळी काढा. ढवळत रहा. साबुदाणा शिजला की पारदर्शक होतो. आता त्यात वेचची पावडर घाला आणि झटपट डिश सर्व्ह करा. साबुदाणा दूध साखर यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदला. गोड, दाट, पातळ जसे हवे तसे!

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

गय्राच्या पिठाची आंबीलः खास उपासासाठी!

मे महिन्यात जेव्हा खूप फणस तयार होतात तेव्हा कच्च्या फणसाचे गरे सोलून बारीक चौकोनी फोडी करून वाळवले जातात. अगदी चांगले वाळले ही डब्यात भरून ठेवतात. या गय्रांचे पीठ केले जाते. हे पीठ चार पाच महिने चांगले टिकते. पावसातल्या उपासाला उपयोगी येते. अर्थात गय्राचा थोडा वास कळतो. या पिठाची थालिपीठे, आंबील असे प्रकार होतात.
साहित्यः
एक वाटी ताक, एक वाटी पाणी, मीठ, दोन चमचे गय्राचे पीठ, पाव चमचा जीरे, एक चमचा तूप, एक ओली मिरची, चिमुटभर साखर.


कृती:
एका भांड्यात ताक, पाणी, मीठ एकत्र करा. हवी असल्यास साखर घाला. आता यात दोन चमचे गय्राचे पीठ नीट मिसळून घ्या. गोळी राहता कामा नये. या मिश्रणाला तूपाची जिरे आणि मिरचीची खमंग फोडणी द्या. मंद गॅसवर उकळायला
ठेवा. ढवळत रहा. दाटपणा आला की गॅस बंद करा. गरमागरम प्या. नाचणीच्या आंबिली सारखीच लागते. कोथिंबीर वापरत असाल उपासाला तर वरून घाला.

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

उपासाच्या सुरळीच्या वड्या

नवरात्र चालू आहे. नऊ दिवस उपास करणाय्रांसाठी थोडी वेगळी पण चविष्ट पाककृती घेऊन आलेय. उपास नसला तरी करून आस्वाद घ्यायला हरकत नाहीच!

साहित्यः
पाऊण वाटी शिंगाडा पीठ, पाव वाटी साबुदाणा पीठ, दोन वाट्या पाणी, एक वाटी ताक, मीठ, दोन ओल्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ओलंखोबरं, दोन चमचे साजूक तूप, अर्धा चमचा जिरं.


कृती:
खोबरं खवून घ्यावं. कोथिंबीर धुवून बारीक चिरावी. मिरच्या वाटून घ्याव्या. खोबरं कोथिंबीर, मिरचीचं वाटप आणि मीठ एकत्र करावं. दोन वाट्या पाणी आणि ताक नॉनस्टीक पॅनमध्ये एकत्र करावं. चवीनुसार मीठ, लाल तिखट घालावं. आता त्यात शिंगाडापीठ आणि साबुदाणा पीठ घालून नीट मिसळावं. गोळी होता कामा नये.

आता मंद गॅसवर मिश्रण सतत ढवळत राहावं.





 दोन ताटाना तूपाचा हात लावून घ्यावा. मिश्रण शिजत आलं की घट्ट होत जातं. पिठाचा रंग बदलतो. आता मिश्रण उलथ्याच्या सहाय्याने भराभर ताटावर पसरावे. त्यावर खोबरं कोथिंबीर घालावी. तूप जिय्राची फोडणी करावी. या मिश्राणावर पसरावी. हा फोटो फोडणी घालण्या पूर्वीचा आहे.


आता उभ्या रेषा मारून घ्याव्या. अर्ध्यापर्यंत गुंडाळावे.


अश्या पध्दतीने सर्व वड्या गुंडाळून घ्याव्या. मस्त डीश तयार आहे. आता मनसोक्त उपास करा!!!

बुधवार, २२ जून, २०१६

शिंगाड्याच्या पिठाचे लाडू

शनिवारपासून श्रावण सुरू झाला. आता महिनाभर वेगवेगळे उपास केले जातील. उपासाला साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, आणि आरोग्यासाठीही तो हितकर नाही. शिंगाडा हा कंद उपासासाठी वापरल्या जाणाय्रा पदार्थांपैकी एक असला तरी आपण त्याचा फार कमी वापर करतो. आयुर्वेदिकदृष्ट्या शिंगाडा ऊर्जावर्धक आहे, त्यापासून पीठ तयार करतात. हे पीठ थालिपिठासाठी वापरतात. त्याची खीर, लाडूही करतात.
साहित्यः शिंगाड्याचे पीठ दोन वाट्या, पिठी साखर दीड वाटी, साजूक तूप पाऊण वाटी, सुक्या खोबय्राचा कीस अर्धी वाटी, दाण्याचे कूट अर्धी वाटी, वेलची पावडर.
कृती: शिंगाड्याचे पीठ कढईत घ्यावे. त्यात तूप घालून तांबूस रंगावर भाजून घ्यावे, गार करण्यास ठेवावे. सुके खोबरे किसून, भाजून घ्यावे, शेंगदाणे भाजून त्याचे कूट करून घ्यावे. भाजलेले पीठ गार झाले की त्यात पिठीसाखर, दाण्याचे कूट, सुक्या खोबय्राचा कीस बारीक करून मिसळावा. स्वादानुसार वेलची पावडर घालावी. सर्व पीठ नीट मिसळून लाडू वळावेत. लाडू नीट वळले जात नसतील तर गरजेनुसार साजूक तूप घालावे.
यामध्ये डिंक तळून , खारीक पावडरही घालता येईल. फक्त त्यानुसार लागल्यास पिठीसाखरेचे प्रमाण वाढवावे. या प्रमाणात १५/१८ लाडू होतील. हा लाडू अतिशय पौष्टिक आहे, लहान मुलांना अवश्य द्यावा.

रविवार, ६ मार्च, २०१६

उपासाचा पौष्टीक केक



उद्या महाशिवरात्रीचा उपास असेल. आणि रोजचे तेच तेच खाऊन कंटाळला असाल ना? आता आलाच कोणाचा वाढदिवस उपासाच्या दिवशी तर केकशिवाय साजरा नाही करावा लागणार!
साहित्यः
शिंगाड्याचे पीठ २०० ग्रॅम.
साजूक तूप १०० मिली.
पिठी साखर १०० ग्रॅम
खजूर २० बिया
बेकिंग पावडर एक टीस्पून
खायचा सोडा अर्धा टीस्पून
अर्धा टीस्पून वेलची पावडर
नेसकॉफी चार पाकिटे १ रू. वाली
दीड वाटी दूध
साधी साखर तीन टीस्पून
बदाम सजावटीसाठी

कृती:
अर्धी वाटी दूध गरम करावे. खजूराच्या बिया काढून या दुधात भिजत घालावे. शिंगाड्याचे पीठ, कॉफी पावडर, बेकिंग पावडर, सोडा. वेलची पावडर एकत्र करून तीन वेळा चाळून घ्यावे. खजूर दुधासकट मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यावा. ओव्हन १८० डिग्रीवर पाच मिनिटे प्रिहीट करून घ्यावा. तूप, पिठी साखर, वाटलेला खजूर एकत्र परातीत घेऊन फेसावे. चाळलेले पीठ फेसलेल्या तुपात मिसळून फेसावे. लागेल तसे दूध मिसळावे. मला वाटीभर लागले. त्यार मिश्रणात साधी साखर घालून नीट मिसळावी. यामुळे साखर असलेल्या ठिकाणी साखर विरघळून छान जाळी पडते. सजावटीसाठी बदामाचे काप घालावे. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात मिश्रण ओतावे.
१८० डिग्रीवर पस्तीस मिनिटे ठेवावे. झाकण काढून सुरी घालून मिश्रण चिकटत नाही ना ते पहावे.

दहा मिनिटे गार करून जाळीवर केक काढावा. गार झाल्यावर तुकडे करून डब्यात भरावा. आता उपास करायला हरकत नाही