कोकण मेवा हा ब्लॉग शोधा
रविवार, १८ एप्रिल, २०२१
शेवग्याचं लोणचं
गुरुवार, १५ एप्रिल, २०२१
राय आवळ्याचा मेथावळा
मेथावळा:
साहित्य:
1 कप रायआवळ्याचे काप, अर्धा कप गूळ, 1 टीस्पून लाल तिखट, 1टीस्पून मेथी, मीठ, तेल एक टेबलस्पून, मोहोरी अर्धा टीस्पून, हिंग अर्धा टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, पाणी पाव कप
कृती: रायआवळे स्वच्छ धुवा. बी च्या बाजूचे काप चिरून घ्या. तयार काप 1 कप घ्या. कढईत तेल तापत ठेवा. मेथी घाला. जरा रंग बदलला की मोहोरी घाला. ती तडतडली की गॅस बारीक करून हिंग, हळद घाला. परतून घ्या आणि त्यात रायआवळा फोडी घाला. परता आणि पाव कप पाणी घालून दोन मिनिटं वाफ काढा.
आवळा पटकन शिजतो. आता त्यात गूळ, मीठ, तिखट घालून उकळी काढा. मिश्रण थोडं घट्ट होऊ द्या, कारण आवळ्याचे पाणी सुटून मिश्रण थोडे सैल होईल.
चव बघून लागेल ते वाढवा.
टेस्टी मेथावळा तयार आहे!
सोमवार, १५ फेब्रुवारी, २०२१
आंबे हळदीचं लोणचं
आंबे हळदीचं लोणचं:
साहित्य: पाव किलो आंबेहळद, दोन लिंबं, लोणचं मसाला 50 ग्रॅम, तेल पाव कप, मोहोरी अर्धा टीस्पून, हिंग अर्धा टीस्पून, हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, मीठ दोन टीस्पून
कृती: आंबे हळदीचे कांदे आतून पांढरे असतात आणि त्याला आंब्याचा वास येतो. तेल कढल्यात गरम करावे. मोहोरी घालावी, ती तडतडली की गॅस बंद करून हिंग, हळद आणि सर्वात शेवटी लाल तिखट घालावे. गार होऊ द्यावी. स्वच्छ धुवून, पुसून हळद सोलून घ्यावी. किसून घ्यावी. किसलेल्या हळदीत लिंबू रस घालावा. मीठ, लोणचं मसाला आणि गार झालेली फोडणी मिक्स करावी. मस्त चविष्ट लोणचं तयार!!
✍🏻 मीनल सरदेशपांडे
शनिवार, १९ डिसेंबर, २०२०
फोडणीची मिरची
फोडणीची मिरची:
साहित्य:
1 किलो जून मिरच्या, पाव किलो मोहोरी, 200 ग्रॅम मीठ( 1 वाटी), मेथी 1 टेबलस्पून, हिंग पावडर 2 टेबलस्पून, हळद 2 टेबलस्पून, मोहोरी फोडणीसाठी 2 टीस्पून, लिंबं मोठी 8, तेल पाव लीटर
कृती: मिरच्या धुवून पुसून कोरड्या करून घ्या. लिंबं धुवून पुसून घ्या, त्याचा रस काढून घ्या. मीठ कढईत गरम करून गार करत ठेवा. मिरच्यांचे तुकडे करून घ्या. मेथी जरा गरम करून पावडर करा. मिरच्यांमध्ये मीठ, लिंबू रस, एक टेबलस्पून हळद आणि 2 टेबलस्पून तेल घालून ठेवा. उरलेल्या तेलाची फोडणी करताना तेल तापल्यावर दोन टीस्पून मोहोरी घाला, ती तडतडली की गॅस बंद करून हिंग पावडर, हळद, मेथी पावडर घाला. फोडणी गार करत ठेवा. पाव किलो मोहोरीची पावडर करून ती मिरच्यांत मिसळा. गार फोडणी मिसळा. चार दिवस स्टीलच्या पातेलीत ठेवा, अधूनमधून ढवळत रहा. चार दिवसांनी काचेच्या बरणीत भरून ठेवा.
✍🏻 मीनल सरदेशपांडे
रविवार, १३ डिसेंबर, २०२०
आवळ्याचा छुन्दा
आवळ्याचा छुन्दा
छुन्दा हे गुजरात मधील प्रसिद्ध चविष्ट लोणचं आहे. मुख्यतः ते उन्हात ठेवून करतात पण तुम्ही गॅसवर सुद्धा करू शकता.
साहित्य: 2 कप आवळ्याचा कीस, अडीच कप गूळ, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून जीरं पावडर, चार तुकडे दालचिनी, 10/12 लवंगा
कृती: आवळे स्वच्छ धुवा, पुसून किसून घ्या. मला 2 कप व्हायला अर्धा की लागले. स्टेनलेस स्टीलच्या कोरड्या पातेल्यात कीस काढा. त्यात गूळ आणि मीठ मिक्स करा. नीट ढवळून पातेल्याला वर पातळ कॉटन कापड बांधा. तासाभराने पातेलं उन्हात ठेवा. चार दिवस उन्हात ठेवावं लागेल. ठेवण्यापूर्वी रोज कोरड्या चमच्याने ढवळा. पाचव्या दिवशी तिखट, जीरं पावडर, लवंगा, दालचिनी तुकडे घालून ढवळुन परत फडका बांधून एक दिवस उन्हात ठेवा. गार झाल्यावर बघा एक तारी पाक झालेला दिसेल. आता काचेच्या बरणीत भरून ठेवा.
उन्हात ठेवणं शक्य नसेल तर गूळ, आवळा किस आणि मीठ एकत्र करून तासभर ठेवा. तासाभराने गॅसवर ठेवून उकळा. एक तारी पाक दिसू लागला की गॅस बंद करून तिखट, जीरं पावडर, लवंगा, दालचिनी घालून ठेवा. गार झाला की काचेच्या बरणीत ठेवा. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही.
✍🏻मिनल सरदेशपांडे
बुधवार, २२ एप्रिल, २०२०
छुन्दा
साहित्य: 2 कप कैरीचा कीस, 2 कप गूळ, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून जीरं पावडर, चार तुकडे दालचिनी, 10/12 लवंगा
कृती: कैरी स्वच्छ धुवा, सोलून किसून घ्या. मला 2 कप व्हायला तीन कैऱ्या लागल्या. स्टेनलेस स्टीलच्या कोरड्या पातेल्यात कीस काढा. त्यात दोन कप गूळ आणि मीठ मिक्स करा. नीट ढवळून पातेल्याला वर पातळ कॉटन कापड बांधा. तासाभराने पातेलं उन्हात ठेवा. चार दिवस उन्हात ठेवावं लागेल. ठेवण्यापूर्वी रोज कोरड्या चमच्याने ढवळा. पाचव्या दिवशी तिखट, जीरं पावडर, लवंगा, दालचिनी तुकडे घालून ढवळुन परत फडका बांधून एक दिवस उन्हात ठेवा. गार झाल्यावर बघा एक तारी पाक झालेला दिसेल. आता काचेच्या बरणीत भरून ठेवा.
उन्हात ठेवणं शक्य नसेल तर गूळ, कैरी आणि मीठ एकत्र करून तासभर ठेवा. तासाभराने गॅसवर ठेवून उकळा. एक तारी पाक दिसू लागला की गॅस बंद करून तिखट, जीरं पावडर, लवंगा, दालचिनी घालून ठेवा. गार झाला की काचेच्या बरणीत ठेवा. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही.
✍🏻मिनल सरदेशपांडे
शुक्रवार, १० एप्रिल, २०२०
आवळा लोणचं
कृती: आवळे स्वच्छ धुवा, कोरडे करा. पाणी उकळत ठेवा, उकळी आली त्यात आवळे टाका पाच मिनिटं उकळू द्या. गॅस बंद करून दोन तीन मिनिटं आवळे त्यात राहू द्या. आता आवळे चाळणीवर काढा. गार होऊ द्या. दोन्ही देठाकडून दाब दिला की आवळ्याच्या फोडी होतील, बी काढा. तेलात मेथी तळून घ्या. उरलेल्या तेलाची मोहोरी, हिंग हळद घालून फोडणी करा. फोडणी गार करत ठेवा. अर्धी वाटी पाणी उकळून गार करा.
मेथीची पावडर करून घ्या. 50 ग्रॅम मोहोरीची पावडर करून घ्या. त्यात गार केलेले पाणी घालून मोहोरी फेसा, आवळे गार झाल्यावर त्यात दोन चमचे मीठ घाला, दोन चमचे लाल तिखट घाला. मेथी पावडर घाला. फेसलेली मोहोरी घाला.गार झालेली फोडणी मिक्स करा. मस्त झणझणीत लोणचे तयार आहे, पण जरा जपून... मोहोरी नाकात कळते!
✍🏻 मीनल सरदेशपांडे
रविवार, २४ मार्च, २०१९
लिंबू चटणी/ सॉस/लोणचे:
- लिंबाच्या फोडी एक कप,
- गूळ अडीच कप
- मीठ एक टेबलस्पून,
- लाल तिखट 2 टेबलस्पून,
- जीरं पावडर दोन टीस्पून
- कृती:
- लिंबं स्वच्छ धुवून पुसून घ्या.
- प्रत्येकी 8 फोडी करा.
- सगळ्या बिया व्यवस्थित काढून घ्या.
- बी राहिली तर कडवटपणा येतो.
- लिंबाच्या फोडी वाफवून घ्या.
- गार करून मिक्सरला फिरवा.
- त्यात बारीक चिरलेला गूळ, मीठ, लाल तिखट आणि जीरं पावडर घालून मिक्स करा.
- परत एकदा मिक्सरला फिरवून घ्या.
- तयार लोणचं काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवा.
- ✍🏻 मिनल सरदेशपांडे
मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९
नवलकोलचे लोणचे:
साहित्य: दोन वाट्या नवलकोल च्या फोडी, दोन टीस्पून लाल तिखट, तीन टीस्पून लाल मोहोरी, अर्धा टीस्पून मेथी दाणे, एक लिंबू, मीठ दीड टीस्पून, हिंग अर्धा टीस्पून तेल दोन टेबलस्पून, हळद अर्धा टीस्पून फोडणीसाठी: मोहोरी पाव चमचा, हिंग पावडर पाव चमचा, हळद अर्धा चमचा, तिखट चिमूटभर
कृती:
१)नवलकोल चे कांदे धुवून सोलून घ्या.
२)आवडीप्रमाणे फोडी करून घ्या.
३) फोडींना मीठ, हळद लावून घ्या.
४) दोन टेबलस्पून मोहोरी मिक्सरला फिरवून घ्या.
५) कढईत तेल तापवा, त्यात मेथी दाणे तळून घ्या.
६) मोहोरी, हिंग, हळद आणि चिमूटभर तिखट घालून फोडणी करा.
७) लिंबाचा रस काढून फोडींमध्ये मिसळा.
८) मोहोरी पावडर, लाल तिखट फोडींमध्ये मिक्स करा.
९) गार करून फोडणी घाला.
१०)एक दिवस मुरलं की खायला तयार... पण खाताना जरा जपून.. मोहोरी नाकात कळते!
✍🏻 मिनल सरदेशपांडे
गुरुवार, १७ जानेवारी, २०१९
स्ट्रॉबेरी लोणचे
आता तुम्ही म्हणाल स्ट्रॉबेरी नुसती खायची सोडून हे उद्योग कशाला? पण काही वेळा आंबट निघतात मग असं चविष्ट करायचं😊
साहित्य: दोन वाट्या स्ट्रॉबेरीचे तुकडे, पाव वाटी साखर, दीड टीस्पून लाल तिखट, मीठ, पाव टीस्पून मेथी, पाव टीस्पून मोहोरी, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, दोन टीस्पून तेल
कृती: स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून, पुसून आवडीप्रमाणे तुकडे करा. कढईत तेल तापवून त्यात मोहोरी, मेथी, हिंग हळद आणि थोडं तिखट घालून फोडणी करा, गार होऊ द्या. स्ट्रॉबेरीच्या तुकड्यात साखर, मीठ आणि तिखट मिसळा, गार झालेली फोडणी मिसळून ठेवा. मेथांब्यासारखी चव येते.
हे लोणचं टिकाऊ नाही..लगेच वापरता येते.
✍🏻 मिनल सरदेशपांडे
सोमवार, २३ जुलै, २०१८
उपासाचे लिंबू लोणचे
कृती: लिंबं स्वच्छ धुवावीत. कोरडी करावीत. प्रत्येक लिंबाच्या आठ याप्रमाणे फोडी कराव्यात. बिया काढून टाकाव्यात. फोडी एका घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून कुकरमध्ये 20 मिनिटं फोडीत पाणी न घालता शिजवाव्या.फोडींच्या दीडपट साखर घ्यावी. दोन वाट्या फोडी झाल्या. तर त्यात तीन वाट्या साखर, तिखट, मीठ गरम असताना एकत्र करून ठेवा. दहा दिवस मुरू द्या. अधे मधे ढवळा.
रविवार, ३ जून, २०१८
कैरीचं टक्कू किंवा तक्कू
कृती:
1) कैरी धुवून सोलून किसून घ्या.
2) काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात कीस मोजून घ्या.
3) किसात गूळ, मीठ, तिखट मिक्स करा.
4) कढईत तेल तापत ठेवा.
5) मोहोरी, मेथी, हिंग, हळद आणि थोडं तिखट घालून फोडणी करा. गार होऊ द्या.
6) पूर्ण गार झाल्यावर फोडणी तयार मिश्रणात मिसळा.
7) कैरी आंबट असेल तर गूळ जास्त लागू शकतो.
8) तिखटपणा कमी हवा असेल तर तिखट कमी घ्या.
9) मस्त टेस्टी झटपट लोणचं तयार आहे.
गुरुवार, ५ एप्रिल, २०१८
आंबा लोणचे
कृती: मोहोरी पावडर करा. मेथी तळून घेऊन पावडर करून घ्या. कैऱ्या स्वच्छ धुवून फोडी करून तिखट, मीठ, मोहोरी मेथी पावडर आणि गार करून फोडणी घाला. फोडणीत लाल तिखट घातले की रंग छान येतो!
गुरुवार, २९ मार्च, २०१८
सांडगी मिरची
ही पारंपरिक कोकणी डिश आहे. मसाला भरलेल्या ह्या मिरच्या खूप चविष्ट लागतात.
साहित्य: 1 की हिरव्या मिरच्या, मेथी पावडर 125 ग्रॅम, मोहोरी पावडर 250 ग्रॅम, 100 ग्रॅम मीठ, 50 ग्रॅम हळद, हिंग एक टेबलस्पून, जीरं पावडर दीड टेबलस्पून, धने पावडर दीड टेबलस्पून
कृती: यासाठी कोकणात मिळणाऱ्या स्पेशल जातीच्या मिरच्या मी वापरल्या, ज्यात मसाला जास्त राहतो.
1) मिरच्या स्वच्छ धुवा आणि कोरड्या करा.
2) एक मोठं भांडं घ्या.
3)त्यामध्ये मोहोरी पावडर, मेथी पावडर, हळद, मीठ, जीरं पावडर, धने पावडर, हिंग सर्व नीट एकत्र करा.
4) मिरच्यांना मधोमध उभी चीर पाडा.
5)चीर पाडलेल्या मिरच्यांमध्ये मसाला घट्ट भरा.
6)या भरलेल्या मिरच्या रात्रभर तशाच ठेवा. यामुळे आतील मसाला घट्ट बसतो.
7) कडक उन्हात चार पाच दिवस वाळवा.
8) घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
9) या मिरच्या वर्षभर चांगल्या टिकतात.
10)या मिरच्या तळून वापरतात. दह्यात कालवून छान तोंडीलावणं होतं. सांडगी मिरच्या भात, भाज्या, आमटी इत्यादी गोष्टींची लज्जत आणखी वाढवतात.
Dried stuffed green chillies:
This is a traditional konkani recipe.The chillies are stuffed with spices and then sundried
ingredients: Green chillies 1kg,fenugreek seeds powder125 grms,mustard seeds powder 250 grms, salt 100grms, turmeric powder 50grms, asafoetida 1tbsp, cumin seeds powder 11/2 tbsp, coriander seeds 1 1/2 tbsp.
Procedure:Preferably use konkani green chillies for this recipe as they are broad and have more space for stuffing. Wash and drain chillies and wipe them dry.
Now take a large mixing bowl add mustard seeds powder, fenugreek seeds powder , salt, turmeric powder ,asafoetida, cumin seeds powder , coriander seeds powder.Mix well and keep aside.Now slit the chillies at the centre(lengthwise). stuff the masala in the chillies tightly.keep the stuffed chillies overnight,it helps for binding the mixture. Keep it in the sun for 4 to 5 days.Store it in a airtight container, it stays well for a year..
It can be best enjoyed by deep frying and can be used as a side dish...it will enhance the taste of the curry sabzi and even curd rice.
सोमवार, २६ मार्च, २०१८
करवंद लोणचे
How to make: Rinse karvand two times in water. Dry with cotton towel. Make a small cut in the karvand. Add two tablespoon salt in warm water. Soak the karvand in salted water for two hours in order to remove white shriek which comes after cutting. After two hours drain water and dry it with cotton towel. Heat oil in small pan. Fry fenugreek seeds. Allow it to cool. Make powder of fenugreek seeds and mustard seeds.
Add salt, red chili powder, mustard seeds powder and fenugreek seeds powder in karvand. Mix well.
Heat 4 tablespoon oil in small pan. Add 1teaspoon mustard seeds. Once they start crackling switch off the gas flame. Add asafoetida, turmeric powder and small pinch red chili powder. Allow to cool. Add this cool tempering to pickle. Keep in dry glass bowl for two days for better result. Enjoy summer!!😊
karvand flower:
साहित्य: एक वाटी कच्ची करवंद, 3 टेबलस्पून मोहोरी, 4 टेबलस्पून लाल तिखट, मीठ, एक चमचा हळद, एक चमचा हिंग, तेल 4 टेबलस्पून, 1 चमचा मेथी
कृती: करवंद दोन वेळा स्वच्छ धुवा. कोरडी करा. करवंदाला छोटा कट द्या. कोमट पाण्यात दोन टेबलस्पून मीठ घाला. दोन तास या पाण्यात करवंद चीक जाण्यासाठी बुडवून ठेवा. दोन तासांनी पाणी काढून टाकून करवंद कोरडी करा.
मेथी दाणे तळून घ्या. गार करून त्याची पावडर करा. मोहोरीची पावडर करा. करवंदामध्ये मीठ, तिखट, मोहोरी पावडर, मेथी पावडर एकत्र करा. छोट्या कढईत तेल गरम करा. त्यात मोहोरी घाला. मोहोरी तडतडली की गॅस बंद करून हिंग, हळद आणि अगदी थोडं लाल तिखट घाला. गार होऊ द्या. गार फोडणी लोणच्यात मिसळा. दोन दिवस काचेच्या बाऊलमध्ये ठेवा, मुरू द्या. उन्हाळ्याचा आनंद घ्या.😊
शुक्रवार, २३ मार्च, २०१८
कैरी मिरची ठेचा:
आज केलाय झणझणीत कैरी मिरची ठेचा:
साहित्य: 250 ग्रॅम ओल्या मिरच्या, 50 ग्रॅम मोहोरी, दोन वाट्या कैरीचा कीस, एक चमचा मेथी, तेल पाव वाटी, एक चमचा हळद, अर्धा चमचा हिंग पावडर, अर्धा चमचा मोहोरी( फोडणीसाठी), मीठ
कृती: मिरच्यांची देठं काढून स्वच्छ धुवा, कोरड्या करा. मिरच्यांचे तुकडे करा. कैरी धुवा, साल काढून किसून घ्या. तेलात मेथी तळून घ्या. उरलेल्या तेलाची मोहोरी, हिंग हळद घालून फोडणी करा. फोडणी गार करत ठेवा.
मेथीची पावडर करून घ्या. 50 ग्रॅम मोहोरीची पावडर करून घ्या. मिरच्या मिक्सरला फिरवून घ्या. त्यात कैरीचा कीस, मोहोरी पावडर, मेथी पावडर, मीठ एकत्र करा. गार झालेली फोडणी मिक्स करा. मस्त झणझणीत ठेचा तयार आहे! पण जरा जपून...
बुधवार, २१ मार्च, २०१८
दह्यातील उकडांबा:
साहित्य: मिठातले उकडांबे दोन, एक वाटी दही, दोन चमचे साखर, दोन ओल्या मिरच्या, चिमुटभर हिंग, पाव चमचा जीरं, तीन चमचे तूप, कोथिंबीर बारीक चिरलेली, मेतकूट दोन चमचे( ऐच्छिक)
कृती: मिठातला उकडांबा
उकडांबा करण्यासाठी वेगळे खास रायवळ आंबे असतात.... नाहीतर कोणतेही छोटे रायवळ तयार आंबे दहा बारा घ्या. पण हे आंबे झाडावरून उतरून काढलेले हवेत, पडलेले टिकत नाहीत. आंबे स्वच्छ धुवा. देठाकडचा चीक जाऊ द्या. पातेल्यात पाणी उकळून त्यात घालून दहा मिनिटं उकळावेत. पाण्यातून चाळणीवर काढून गार होऊ द्यावेत. आंबे पूर्ण गार व्हायला हवेत. आता देठाकडून साल थोडी सोडवून ठेवा. एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत आंबे बुडतील इतपत पाणी घ्या. पाणी खारट लागेल इतपत मीठ घाला. आता पूर्ण गार झालेले आंबे पाण्यात बुडवून झाकण लावा. हे आंबे वर्षभर टिकतात. त्यावर पांढरा साक धरतो सायीसारखा तो अधून मधून काढून टाकायचा. माझी आजी मोठी चिनीमातीची बरणी भरून करायची हे आंबे आणि त्याच्या तोंडाला स्वच्छ पांढरं कापड घट्ट बांधायची.. दादरा बांधणं म्हणतात त्याला! आणि मग कोणी आलं गेलं हे आंबे द्यायची! विशेषत: श्रावण महिन्यात तोंडीलावणं म्हणून हे आंबे काढले जायचे!
कृती: दह्यातील उकडांबा:
हा मिठातला आंबा काढून घेऊन त्याच साल सोलावं.. आतील गर काढून घ्यावा. नीट कुस्करून घ्यावा. त्यात दही साखर मेतकूट आणि कोथिंबीर घालावी. तूपाची जीरं, मिरच्या, हिंग घालून फोडणी करावी. ही फोडणी या उकडांब्याला द्यावी. छान मिक्स करावे. मीठ घालावे लागत नाही.
बुधवार, ७ मार्च, २०१८
आंब्याचे रायते: शिजवून
साहित्य: दोन मोठया कैऱ्या, दोन वाट्या गूळ, लाल तिखट दोन चमचे, मीठ, तेल तीन चमचे, मोहोरी अर्धा चमचा, मेथी पाव चमचा, हळद पाव चमचा
टीप: कैऱ्या आंबट असतील तर गूळ जास्त लागू शकतो, टेस्ट अप्रतिम!!
बुधवार, १० जानेवारी, २०१८
मिश्र भाज्यांचे लोणचे
साहित्य:
अर्धा की फ्लॉवर, एक वाटी मटार, चार गाजरं, एक बोटभर आल्याचा तुकडा, एक बोटभर ओली हळद किंवा आंबे हळदीचा तुकडा, चार लिंबं, एक वाटी तेल, एक चमचा मोहोरी, एक चमचा हिंग, एक चमचा हळद पावडर, चार चमचे लाल तिखट, तीन चमचे मीठ, एक पाकीट लोणचे मसाला(100 ग्रॅम)
कृती:
फ्लॉवर साफ करून मिठाच्या पाण्यात तुरे टाकावेत. गाजराचे तुकडे करावेत. आलं, हळदीच्या चकत्या कराव्यात. मटार सोलावेत. फ्लॉवर पाण्यातून काढून कोरडा करायला फडक्यावर पसरावा. सर्व भाज्या कोरड्या कराव्यात. लिंबाचा रस काढावा. तेलाची मोहोरी, हिंग, हळद आणि एक चमचा लाल तिखट घालून फोडणी करावी. गार करत ठेवावी. फोडणीत तिखट घातल्याने लोणच्याला रंग छान येतो. फ्लॉवर, मटार, गाजराचे तुकडे, ओल्या हळदीचे तुकडे, आल्याचे तुकडे सर्व स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात एकत्र करावे. त्यात तिखट, मीठ,100 ग्रॅम लोणचे मसाला, लिंबाचा रस घालून नीट मिक्स करावे. गार झाली की फोडणी मिक्स करावी. तयार लोणचे काचेच्या बरणीत भरावे.
मस्त टेस्टी लोणचं तयार आहे!
रविवार, १७ डिसेंबर, २०१७
खजूर लोणचं
अर्धा की सीडलेस खजूर, 12 लिंबं, तीन चमचे लाल तिखट, दीड वाटी गूळ, अर्धा चमचा शेंदेलोण, अर्धा चमचा पादेलोण, एक चमचा जीरं पावडर, अर्धा चमचा साधं मीठ
कृती:
खजुराचे चार तुकडे होतील असे तुकडे करावे. लिंबाचा रस काढून घ्यावा. गूळ बारीक चिरावा. स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात खजूर, गूळ, लिंबाचा रस, शेंदेलोण, पादेलोण, मीठ, तिखट, जीरं पावडर सर्व एकत्र करावे. एक दिवस तसेच ठेवून मुरू द्यावे. दुसऱ्या दिवशी खायला घेता येते. चव अप्रतीम!!!








































