कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, २९ जून, २०१६

पडवळाची सुकी भाजी (भाजणी पेरून)

साहित्यः

पडवळ अर्धा कि., थालिपीठाची भाजणी किंवा चण्याचे पीठ वाटीभर, दोन टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट, दोन टेबलस्पून, ओले खोबरे, एक चमचा आमचूर पावडर, एक चमचा साखर, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला एक चमचा, तेल पाव वाटी, फोडणीचे साहित्य, मीठ चवीनुसार.

कृती:

पडवळ धुवावे, बिया काढून पातळ काचय्रा कराव्या. कढईत तेल घेऊन नेहमीप्रमाणे मोहोरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. पडवळ फोडणीत घालून परतावे. झा़कण ठेवून दहा मिनिटे मंद गॅसवर वाफ काढावी. तोपर्यंत एका डीशमध्ये भाजणी, दाण्याचे कूट, ओले खोबरे, आमचूर, गोडा मसाला, लाल तिखट, पीठापुरते मीठ घालून सर्व नीट एकत्र करावे. पडवळाला वाफ आली की त्यात मीठ, साखर घालावी. नीट धवळून दोन मिनिटे मीठ साखर पडवळाला लागू द्यावी. आता तयार पीठाचे कोरडे मिश्रण घालून भाजीत मिक्स करावे. एक वाफ येऊ द्यावी. या भाजीत पाणी अजिबात घालायचे नाही. चव बघून मीठ तिखट वाढवावे.
भाजणीमुळे भाजी खमंग होते, पण भाजणी नसल्यास बेसन भाजून वापरावे.

बुधवार, २२ जून, २०१६

शिंगाड्याच्या पिठाचे लाडू

शनिवारपासून श्रावण सुरू झाला. आता महिनाभर वेगवेगळे उपास केले जातील. उपासाला साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, आणि आरोग्यासाठीही तो हितकर नाही. शिंगाडा हा कंद उपासासाठी वापरल्या जाणाय्रा पदार्थांपैकी एक असला तरी आपण त्याचा फार कमी वापर करतो. आयुर्वेदिकदृष्ट्या शिंगाडा ऊर्जावर्धक आहे, त्यापासून पीठ तयार करतात. हे पीठ थालिपिठासाठी वापरतात. त्याची खीर, लाडूही करतात.
साहित्यः शिंगाड्याचे पीठ दोन वाट्या, पिठी साखर दीड वाटी, साजूक तूप पाऊण वाटी, सुक्या खोबय्राचा कीस अर्धी वाटी, दाण्याचे कूट अर्धी वाटी, वेलची पावडर.
कृती: शिंगाड्याचे पीठ कढईत घ्यावे. त्यात तूप घालून तांबूस रंगावर भाजून घ्यावे, गार करण्यास ठेवावे. सुके खोबरे किसून, भाजून घ्यावे, शेंगदाणे भाजून त्याचे कूट करून घ्यावे. भाजलेले पीठ गार झाले की त्यात पिठीसाखर, दाण्याचे कूट, सुक्या खोबय्राचा कीस बारीक करून मिसळावा. स्वादानुसार वेलची पावडर घालावी. सर्व पीठ नीट मिसळून लाडू वळावेत. लाडू नीट वळले जात नसतील तर गरजेनुसार साजूक तूप घालावे.
यामध्ये डिंक तळून , खारीक पावडरही घालता येईल. फक्त त्यानुसार लागल्यास पिठीसाखरेचे प्रमाण वाढवावे. या प्रमाणात १५/१८ लाडू होतील. हा लाडू अतिशय पौष्टिक आहे, लहान मुलांना अवश्य द्यावा.

बुधवार, १ जून, २०१६

आंब्याचा शिरा

आंब्याचा सिझन संपत आला, तेव्हा लक्षात आलं, इतके दिवस आंब्याचे पदार्थ झालेच नाहीत फारसे! आंब्याचा शिरा सोपा आहे, ही फक्त आठवण! राहिला असेल अजून करायचा तर करा लगेच!




साहित्यः
एक वाटी रवा, एक वाटी आमरस, एक वाटी दुथ, पाऊण वाटी तूप, पाऊण वाटी साखर, एक वाटी पाणी. बदामाचे काप, बेदाणे मीठ.
कृती:

आंब्याचा रस काढून मिक्सरला फिरवून घ्या. एक वाटी रवा मंद गॅसवर भाजून घ्या. थोडा भाजला गेला तूप घालून भाजा. दूध, पाणी, साखर एकत्र करून उकळायला ठेवा. सगळे एकत्र करून घातले की शिरा छान मौ होतो...
रव्यात चवीपुरते मीठ घाला. उकळलेले मिश्रण रव्यात मिसळा. आमरस मिसळा. गॅस मंद ठेवा. व्यवस्थित ढवळून घ्या. बेदाण्यातील काड्या काढून, स्वच्छ करून शिय्रात मिसळा. झाकण ठेवून एक वाफ काढा. दहा मिनिटांनी छान तूप सुटेल. बदामाच्या कापांनी सजवा. आंब्याच्या फोडी घालायच्या असतील तर शेवटी पाच मिनिटं आधी फोडी मिसळा, मिक्स करा.
आंब्याचा मस्त स्वाद येतो, त्यामुळे वेगळ्या स्वादाची गरज नाही.