साध्या सरळ शांत स्वभावाच्या नवय्राने एकोणिस वर्ष मला सहन केलं, मी करत असलेल्या प्रायोगिक रेसिपी नावं ठेवता खाल्ल्या म्हणून आज त्याच्यासाठी ही स्पेशल डीश! आंब्याचा सीझन आहे हे काही विसरून चालणार नाही!!
साहित्यः
केकसाठी: मैदा १५० ग्रॅम, तूप १०० ग्रॅम्, मिल्कमेड२०० ग्रॅम, १ चमचा बेकींग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, ५/६ चमचे साखर , दूध अर्धा कप, तूप, व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा. (केक बाहेरून आणता येईल.)
पुडींगसाठी: अर्धा कि. प्लेन केक, चार हापूस आंबे,दोन रायवळ किंवा रसाचे आंबे, चार चमचे आंबा ज्यूस, अर्धा लि. दूध, दोन चमचे कस्टर्ड पावडर , साखर,आमरस पाव लि., चेरी सजावटीसाठी.
कृती:
केक: मैदा, बेकींग पावडर, खायचा सोडा, चाळणीने तीन वेळा चाळून घ्यावे. यामुळे सोडा, बेकींग पावडर नीट मिक्स होईल. ओव्हन १८० डिग्रीवर प्रीहीट करावा. केकच्या भांड्याला तूप लावावे. तयार मिल्कमेड आणि तूप परातीत घेऊन फेसावे. फेसताना अर्धा कप दूध मिश्रणात घालावे.व्हॅनिला इसेन्स घालावा. आता चाळलेला मैदा मिश्रणात मिसळावा. मिश्रण एकजीव करावे. ५/६ चमचे साखर मिसळावी. केकच्या भांड्यात मिश्रण घालून ओव्हनला २०० डीग्रीवर ३० मिनिटे ठेवावे. सुरीचे टोक घालून केक तयार झाला का ते पहावे. झाला असेल तर जाळीवर काढून गार करावा. स्लाईस करून घ्याव्या.
पुडींगः १)आंब्याच्या दोन्ही बाजूचे काप काढून चौकोनी फोडी करून घ्याव्या. फोडींमध्ये चार चमचे साखर घालावी. कढईत घेऊन पाच मिनिटे गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की उतरून गार करावे.
२) अर्धा लि. दुधातील अर्धी वाटी बाजूला ठेवून बाकीचे गरम करावे. चार चमचे साखर घालावी. अर्धी वाटी गार दुधात दोन चमचे कस्टर्ड पावडर मिसळून घ्यावी. गरम करायला ठेवलेल्या दुधात पावडरचे दूध मिसळावे. सतत ढवळत रहावे. मिश्रण दाट झाले की गार कारावे. लागल्यास साखर वाढवावी.
३) आंब्याच्या कोयींचा रस काढून त्यात चार चमचे साखर घालून मिक्सरला फिरवावा.
४) रायवळ आंब्याचा रस काढून त्यात दोन चमचे साखर, पाव वाटी पाणी घालून ज्यूस करावा. तयार ज्यूस वापरू शकता.
५) काचेचा गोल बाऊल घ्या. तळाला केकचा थर द्या. त्यावर दोन तीन चमचे ज्यूस शिंपडा. त्यावर आंब्याच्या फोडी पसरा. तयार कस्टर्ड मध्ये ३ नं स्टेपला काढलेला रस मिसळून घ्या. आता हे कस्टर्ड आंब्याच्या फोडींवर पसरा. फ्रीजरला गारेगार करा, आणि खा.