कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, २२ एप्रिल, २०२०

छुन्दा

छुन्दा: छुन्दा गुजरात मधील प्रसिद्ध चवि हेष्ट लोणचं आहे. मुख्यतः ते उन्हात ठेवून करतात पण तुम्ही गॅसवर सुद्धा करू शकता.
साहित्य: 2 कप कैरीचा कीस, 2 कप गूळ, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून जीरं पावडर, चार तुकडे दालचिनी, 10/12 लवंगा
कृती: कैरी स्वच्छ धुवा, सोलून किसून घ्या. मला 2 कप व्हायला तीन कैऱ्या लागल्या. स्टेनलेस स्टीलच्या कोरड्या पातेल्यात कीस काढा. त्यात दोन कप गूळ आणि मीठ मिक्स करा. नीट ढवळून पातेल्याला वर पातळ कॉटन कापड बांधा. तासाभराने पातेलं उन्हात ठेवा. चार दिवस उन्हात ठेवावं लागेल. ठेवण्यापूर्वी रोज कोरड्या चमच्याने ढवळा. पाचव्या दिवशी तिखट, जीरं पावडर, लवंगा, दालचिनी तुकडे घालून ढवळुन परत फडका बांधून एक दिवस उन्हात ठेवा. गार झाल्यावर बघा एक तारी पाक झालेला दिसेल. आता काचेच्या बरणीत भरून ठेवा.
उन्हात ठेवणं शक्य नसेल तर गूळ, कैरी आणि मीठ एकत्र करून तासभर ठेवा. तासाभराने गॅसवर ठेवून उकळा. एक तारी पाक दिसू लागला की गॅस बंद करून तिखट, जीरं पावडर, लवंगा, दालचिनी घालून ठेवा. गार झाला की काचेच्या बरणीत ठेवा. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही.
✍🏻मिनल सरदेशपांडे

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

आवळा लोणचं

साहित्य: 250 ग्रॅम आवळे, 50 ग्रॅम मोहोरी, एक चमचा मेथी, तेल पाव वाटी, एक चमचा हळद, अर्धा चमचा हिंग पावडर, अर्धा चमचा मोहोरी( फोडणीसाठी), मीठ दोन चमचे, लाल तिखट दोन चमचे

कृती: आवळे स्वच्छ धुवा, कोरडे करा.  पाणी उकळत ठेवा, उकळी आली त्यात आवळे टाका पाच मिनिटं उकळू द्या. गॅस बंद करून दोन तीन मिनिटं आवळे त्यात राहू द्या. आता आवळे चाळणीवर काढा. गार होऊ द्या. दोन्ही देठाकडून दाब दिला की आवळ्याच्या फोडी होतील, बी काढा. तेलात मेथी तळून घ्या. उरलेल्या तेलाची मोहोरी, हिंग हळद घालून फोडणी करा. फोडणी गार करत ठेवा. अर्धी वाटी पाणी उकळून गार करा.
मेथीची पावडर करून घ्या. 50 ग्रॅम मोहोरीची पावडर करून घ्या. त्यात गार केलेले पाणी घालून मोहोरी फेसा,  आवळे गार झाल्यावर त्यात दोन चमचे मीठ घाला, दोन चमचे लाल तिखट घाला. मेथी पावडर घाला. फेसलेली मोहोरी घाला.गार झालेली फोडणी मिक्स करा. मस्त झणझणीत लोणचे तयार आहे, पण जरा जपून... मोहोरी नाकात कळते!
✍🏻 मीनल सरदेशपांडे