कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

वाटले मूग

 वाटले मूग: 


  मूग आणि उडीद डाळ सकाळी भिजवली होती. तेव्हा खरंच असं काही करायचं असं डोक्यात नव्हतं. डोश्यासाठी भिजवलं होतं.

   मुगाच्या पाव भाग उडीद डाळ घेतली होती.

    संध्याकाळी भाजी आणायला जायचा कंटाळा केला पण रात्रीसाठी काहीतरी तोंडीलावणं लागणार होतं.

     मग सकाळी भिजवलेले मूग आठवले त्यातले वाटीभर मिश्रण चाळणीवर निथळत ठेवलं. तोपर्यंत कांदा चिरून घेतला. मूग आणि डाळ पाणी न घालता भरड वाटून घेतलं. 

     लोखंडी कढईत थोडं जास्तीचं तेल तापत ठेवलं. मोहोरी घातली ती तडतडल्यावर त्यात कांदा परतून घेतला, हळद हिंग आणि लाल तिखट घालून त्यात वाटलेले मिश्रण घालून नीट परतलं आणि पाण्याचा हबका मारून परतत परतत छान वाफ काढली.  आता त्यात मीठ, साखर, आमचूर पावडर घालून परतलं. परत एक वाफ काढली. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून सर्व्ह केली. 

     थोडक्यात सांगायचं तर जशी वाटली डाळ करतो तसंच पण मूग पचायला हलके!

      आमचूर ऐवजी लिंबू पण चालेल. केल्यावर लक्षात आलं हे मिश्रण भरून करंजी किंवा कचोरी छान होईल. त्यात फक्त धने जिर पावडर आणि गरम मसाला घालायचा😊 करतेच आता!


सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

लाल भोपळ्याची बाकर भाजी

 लाल भोपळा चिरून - अर्धा किलो ( साले काढुन) सालासहीत पण घेतात.



सुके खोबरे - पाव वाटी

खसखस - पाव वाटी

तेल - अर्धी वाटी

कढीपत्ता - १०-१२ पानं

चिंचेचा कोळ - २-३ टेबलस्पून

गूळ - २-३ टेबलस्पून

हळद - अर्धा टीस्पून

तिखट- दीड टीस्पून

आलं किसून - 1 टेबलस्पून

गरम मसाला 1 टीस्पून


लसूण - ५-६ पाकळ्या (ऑप्शनल) मी घालत नाही.

मीठ - चवीनुसार

कोथिंबीर


कृती


खोबरं आणि खसखस वेगवेगळं भाजून घ्या आणि नंतर कोरडंच एकत्र वाटा.


 पाव वाटी तेल गरम करा. तेल तापले की मोहरी, हिंग, कढीपत्ता घाला, आलं किसून यातच घाला, (लसूण खात असाल तर आल्या सोबत वाटून घाला) म्हणजे स्वाद जास्त छान येतो. आता यात वाटलेले खोबरं खसखस घाला. भरपूर परता. तेल सुटायला लागले की मग हळद, तिखट घाला.  मसाला घाला. लाल भोपळ्याच्या फोडी घाला,  पाणी घाला. भाजी शिजत आली की मीठ घाला, चिंच गुळ घालून उकळा यातला भोपळा शिजला पाहिजे पण गाळ नको पाच मिनिटांत शिजतो. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

 उरलेल्या तेलाची सुक्या मिरच्या, हिंग आणि पाव टीस्पून लाल तिखट घालून फोडणी करा. ही या भाजीला द्या.