कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

वाटले मूग

 वाटले मूग: 


  मूग आणि उडीद डाळ सकाळी भिजवली होती. तेव्हा खरंच असं काही करायचं असं डोक्यात नव्हतं. डोश्यासाठी भिजवलं होतं.

   मुगाच्या पाव भाग उडीद डाळ घेतली होती.

    संध्याकाळी भाजी आणायला जायचा कंटाळा केला पण रात्रीसाठी काहीतरी तोंडीलावणं लागणार होतं.

     मग सकाळी भिजवलेले मूग आठवले त्यातले वाटीभर मिश्रण चाळणीवर निथळत ठेवलं. तोपर्यंत कांदा चिरून घेतला. मूग आणि डाळ पाणी न घालता भरड वाटून घेतलं. 

     लोखंडी कढईत थोडं जास्तीचं तेल तापत ठेवलं. मोहोरी घातली ती तडतडल्यावर त्यात कांदा परतून घेतला, हळद हिंग आणि लाल तिखट घालून त्यात वाटलेले मिश्रण घालून नीट परतलं आणि पाण्याचा हबका मारून परतत परतत छान वाफ काढली.  आता त्यात मीठ, साखर, आमचूर पावडर घालून परतलं. परत एक वाफ काढली. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून सर्व्ह केली. 

     थोडक्यात सांगायचं तर जशी वाटली डाळ करतो तसंच पण मूग पचायला हलके!

      आमचूर ऐवजी लिंबू पण चालेल. केल्यावर लक्षात आलं हे मिश्रण भरून करंजी किंवा कचोरी छान होईल. त्यात फक्त धने जिर पावडर आणि गरम मसाला घालायचा😊 करतेच आता!