कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

आंबा माव्याची पोळी

 आटवलेल्या आमरसाची/ आंबा माव्याची पोळी:



कोकणातले पारंपरिक प्रकार रोजच शेअर करतेय पण आज थोडा वेगळा प्रकार घेऊन आलेय. आमच्याकडे आंबा सिझन सम्पत आला आणि आंबे सम्पण्यापूर्वी पाऊस सुरू झाला तरी उरलेले आंबे रस आटवण्यासाठी उपयोगात आणतात. 

या आटवलेल्या आमरसात थोडी साखर घालतात. असे घट्ट गोळे फ्रीजमध्ये वर्षभर टिकतात. यात बाहेर टिकण्यासाठी पिठीसाखर मिसळून मळतात. पूर्वी फ्रीज नसताना अशी साखर घालून ठेवत असत, तरीही तो वर्षभर रहात नसे.

साहित्य:  सारण:दोन वाट्या आटवलेल्या आमरस( या गोळ्यात वरून पिठीसाखर घातलेली नाहीये), दीड वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी बेसन, दोन टीस्पून तांदूळ पिठी, पाव वाटी तेल

पारीसाठी: साडेतीन वाट्या कणिक, अर्धी वाटी बेसन, दोन टेबलस्पून तेल, मीठ, पाणी

पोळी लाटायला: तांदूळ पिठी

कृती: सकाळी पोळ्या करायच्या असतील तर रसाचा गोळा रात्री फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा. पारीसाठी कणिक, बेसन एकत्र करा त्यात चवीला मीठ आणि तेल घालून घट्ट म्हणजे गुळपोळी सारखी कणिक मळा. झाकून ठेवा. 


आता एका कढईत अर्धी वाटी बेसन, दोन टीस्पून तांदूळ पिठी, पाव वाटी तेल एकत्र करून तांबूस रंगावर बेसन भाजा. गार होऊ द्या. रस गोळे हाताने कुस्करून मोकळे करा, त्यात दीड वाटी पिठीसाखर नीट मिक्स करा. गार झाल्यावर भाजलेलं बेसन या मिश्रणात घालून सगळं सारखं करा, लागलं तर मिक्सर किंवा फूड प्रोसेसर वापरा. सारण अगदी कोरडं वाटलं तर किंचित दूध लावून मळून घ्या. कणेकची गोल वाटी करा, तेवढाच रसाचा गोळा घेऊन, त्यात भरून वाटी बंद करा. गुळपोळी प्रमाणे तांदूळ पिठीवर पोळी लाटून


मध्यम ते मंद गॅसवर पोळी भाजून घ्या. 



पोळी सोबत मस्त तुपाचा गोळा आणि आंबट गोड पोळी...अहाहा...अप्रतिम चव!