कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २२ जुलै, २०१६

सफरचंद हलवा

साहित्य: 
  सफरचंद १ किलो, खवा ३५०ग्रॅम, साखर १ ते सव्वा वाटी, वेलची पावडर स्वादानुसार,बदाम काप,बेदाणे,काजू तुकडे,तूप        ३चमचे.
कृती:
प्रथम दोन दोन सफरचंदांची साले काढून घ्यावी.कढईत तूप तापत ठेवावे.गॅस बारीक ठेवावा. साले काढ्लेल्या सफरचंदाच्या फोडी करुन घ्याव्या. त्यातील बिया काढून फोडी किसाव्या, किस लगेच तुपात टाकून परतावा.याच प्रकारे सगळ्या सफरचंदांचा किस करुन तुपावर टाकावा. १० मिनीटे किस परतल्यावर त्यात साखर मिसळावी. साखर विरघळली की खवा मिसळावा.बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे यापैकी आवडीप्रमाणे मिसळावे.थोडा वेळ परतावा. वेलची पावडर घालावी.बदामाच्या कापानी सजवावे.( किस लगेच परतल्यामुळे काळा पडत नाही.)


बुधवार, ६ जुलै, २०१६

खांडवी


खांडवी (नागपंचमी विशेष)




आमच्याकडे कोकणात नागपंचमीला चंदन उगाळून त्याने पाटावर नाग काढून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीला उकडीचे मोदक किंवा खांडवी केली जाते. तसे कोकणातल्या पाककृती म्हणजे त्यात तांदुळ, गूळ आणि ओले खोबरे हे मुख्य घटक हवेतच!
साहित्यः दोन वाट्या तांदळाचा रवा, दोन वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, मीठ, तूप वेलची, पाणी, चिमुटभर हळद, एक चमचाभर आल्याचा किस.
कृती: पूर्वी जातिणीवर रवा काढला जाई. आता मात्र बाजारात तयार इडली रवा मिळत असल्याने काम बरेच सोपे झालेय. हा रवा थोडा कोरडा भाजून झाल्यावर साधारण पाव वाटी तूप घालून मंद आचेवर तांबूस भाजावा. रव्याच्या 3 पट पाणी घेऊन ते उकळण्यास ठेवावे. त्यात गूळ. मीठ, थोडे ओले खोबरे आणि वेलची पावडर घालावी.हळद घालावी, आल्याचा कीस घालावा. उकळी आली की भाजलेला रवा मिसळावा. नीट मिक्स करून मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावे. थाळ्याला तूपाचा हात लावावा. रवा व्यवस्थित शिजला की मिश्रण थाळ्यात पसरावे, थापताना वर ओले खोबरे पसरून थापावे. आवडीप्रमाणे वड्या पाडाव्यात.
मस्त कणीदार तूप किंवा नारळाच्या दुधाबरोबर खाव्या.

सोमवार, ४ जुलै, २०१६

कोबीची भजी

पाऊस जोरदार हजेरी लावतोय त्यामुळे गरमागरम भजी हवीतच!
साहित्यः
कोबी अर्धा कि., दोन कांदे, अर्धा कि. बेसन, अर्धी वाटी बारीक रवा, एक चमचा लसूण पेस्ट, एक चमचा आलं पेस्ट, लाल तिखट दोन चमचे, ओवा एक चमचा, मीठ चवीनुसार, तेल तळणीसाठी, अगदी थोडी हळद.
कृती:खेकडा भजीसाठी कांदा चिरतो तसाच लांब उभा कांदा चिरून घ्या, कोबीही कांद्यासारखाच चिरा. आता कांदा कोबी एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट मिसळा, ओवा, हळद मिसळा. दहा पंधरा मिनिटे झाकून ठेवा. कोबीला पाणी सुटले की त्यात रवा मिसळा. आता थोडे थोडे बेसन मिसळा. खेकडा भजीसारखेच भिजवायचे आहे, त्यामुळे बेसन लागेल तेवढेच वापरा. चवीनुसार लागल्यास तिखटमीठ वाढवा. तेल गरम करा. भजी तळून गरमागरम सर्व्ह करा.
मी यासोबत दह्यात कांदा लसूण मसाला, मीठ, साखर घालून दिले होते. ओव्याची पानेही बारीक चिरून घातली होती.
bhaji

बुधवार, २९ जून, २०१६

पडवळाची सुकी भाजी (भाजणी पेरून)

साहित्यः

पडवळ अर्धा कि., थालिपीठाची भाजणी किंवा चण्याचे पीठ वाटीभर, दोन टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट, दोन टेबलस्पून, ओले खोबरे, एक चमचा आमचूर पावडर, एक चमचा साखर, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला एक चमचा, तेल पाव वाटी, फोडणीचे साहित्य, मीठ चवीनुसार.

कृती:

पडवळ धुवावे, बिया काढून पातळ काचय्रा कराव्या. कढईत तेल घेऊन नेहमीप्रमाणे मोहोरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. पडवळ फोडणीत घालून परतावे. झा़कण ठेवून दहा मिनिटे मंद गॅसवर वाफ काढावी. तोपर्यंत एका डीशमध्ये भाजणी, दाण्याचे कूट, ओले खोबरे, आमचूर, गोडा मसाला, लाल तिखट, पीठापुरते मीठ घालून सर्व नीट एकत्र करावे. पडवळाला वाफ आली की त्यात मीठ, साखर घालावी. नीट धवळून दोन मिनिटे मीठ साखर पडवळाला लागू द्यावी. आता तयार पीठाचे कोरडे मिश्रण घालून भाजीत मिक्स करावे. एक वाफ येऊ द्यावी. या भाजीत पाणी अजिबात घालायचे नाही. चव बघून मीठ तिखट वाढवावे.
भाजणीमुळे भाजी खमंग होते, पण भाजणी नसल्यास बेसन भाजून वापरावे.

बुधवार, २२ जून, २०१६

शिंगाड्याच्या पिठाचे लाडू

शनिवारपासून श्रावण सुरू झाला. आता महिनाभर वेगवेगळे उपास केले जातील. उपासाला साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, आणि आरोग्यासाठीही तो हितकर नाही. शिंगाडा हा कंद उपासासाठी वापरल्या जाणाय्रा पदार्थांपैकी एक असला तरी आपण त्याचा फार कमी वापर करतो. आयुर्वेदिकदृष्ट्या शिंगाडा ऊर्जावर्धक आहे, त्यापासून पीठ तयार करतात. हे पीठ थालिपिठासाठी वापरतात. त्याची खीर, लाडूही करतात.
साहित्यः शिंगाड्याचे पीठ दोन वाट्या, पिठी साखर दीड वाटी, साजूक तूप पाऊण वाटी, सुक्या खोबय्राचा कीस अर्धी वाटी, दाण्याचे कूट अर्धी वाटी, वेलची पावडर.
कृती: शिंगाड्याचे पीठ कढईत घ्यावे. त्यात तूप घालून तांबूस रंगावर भाजून घ्यावे, गार करण्यास ठेवावे. सुके खोबरे किसून, भाजून घ्यावे, शेंगदाणे भाजून त्याचे कूट करून घ्यावे. भाजलेले पीठ गार झाले की त्यात पिठीसाखर, दाण्याचे कूट, सुक्या खोबय्राचा कीस बारीक करून मिसळावा. स्वादानुसार वेलची पावडर घालावी. सर्व पीठ नीट मिसळून लाडू वळावेत. लाडू नीट वळले जात नसतील तर गरजेनुसार साजूक तूप घालावे.
यामध्ये डिंक तळून , खारीक पावडरही घालता येईल. फक्त त्यानुसार लागल्यास पिठीसाखरेचे प्रमाण वाढवावे. या प्रमाणात १५/१८ लाडू होतील. हा लाडू अतिशय पौष्टिक आहे, लहान मुलांना अवश्य द्यावा.

बुधवार, १ जून, २०१६

आंब्याचा शिरा

आंब्याचा सिझन संपत आला, तेव्हा लक्षात आलं, इतके दिवस आंब्याचे पदार्थ झालेच नाहीत फारसे! आंब्याचा शिरा सोपा आहे, ही फक्त आठवण! राहिला असेल अजून करायचा तर करा लगेच!




साहित्यः
एक वाटी रवा, एक वाटी आमरस, एक वाटी दुथ, पाऊण वाटी तूप, पाऊण वाटी साखर, एक वाटी पाणी. बदामाचे काप, बेदाणे मीठ.
कृती:

आंब्याचा रस काढून मिक्सरला फिरवून घ्या. एक वाटी रवा मंद गॅसवर भाजून घ्या. थोडा भाजला गेला तूप घालून भाजा. दूध, पाणी, साखर एकत्र करून उकळायला ठेवा. सगळे एकत्र करून घातले की शिरा छान मौ होतो...
रव्यात चवीपुरते मीठ घाला. उकळलेले मिश्रण रव्यात मिसळा. आमरस मिसळा. गॅस मंद ठेवा. व्यवस्थित ढवळून घ्या. बेदाण्यातील काड्या काढून, स्वच्छ करून शिय्रात मिसळा. झाकण ठेवून एक वाफ काढा. दहा मिनिटांनी छान तूप सुटेल. बदामाच्या कापांनी सजवा. आंब्याच्या फोडी घालायच्या असतील तर शेवटी पाच मिनिटं आधी फोडी मिसळा, मिक्स करा.
आंब्याचा मस्त स्वाद येतो, त्यामुळे वेगळ्या स्वादाची गरज नाही.

शनिवार, २८ मे, २०१६

आंबा कलाकंद





साहित्यः १०० ग्रॅम साखर, १५० ग्रॅम हापूस आंब्याचा रस, १०० ग्रॅम पनीर, १०० ग्रॅम खवा. सजावटीसाठी पिस्ते काप, केशराच्या काड्या.

कृती: हापूस आंब्याचा रस काढून मिक्सरवर फिरवून बारीक करून घ्यावा. रस मोजून घ्यावा. पनीर आणि खवा एकत्र करून गुठळ्या मोडून घ्याव्या. साखर आणि आमरस एकत्र करून मंद गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की एकत्र केलेले खवा पनीर त्यात मिसळावे. परतत रहावे.
मिश्रणाचा गोळा होत आला
की ताटाला तूप लावून गोळा थापावा. पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्यांनी सजवावे. चांदीचा वर्खही लावता येईल. आवडीप्रमाणे वड्या कापाव्या.
मी माझ्या आत्याच्या पंचात्तरीला मुंबईला न्यायचे असल्याने मिश्रण बर्फीसारखे न ठेवता वडीसारखे घट्ट केले. नाहीतर कलाकंद थोडा ओलसर असतो. ताज्या आंब्याचा मस्त स्वाद येतो.