कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, ६ जुलै, २०१६

खांडवी


खांडवी (नागपंचमी विशेष)




आमच्याकडे कोकणात नागपंचमीला चंदन उगाळून त्याने पाटावर नाग काढून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीला उकडीचे मोदक किंवा खांडवी केली जाते. तसे कोकणातल्या पाककृती म्हणजे त्यात तांदुळ, गूळ आणि ओले खोबरे हे मुख्य घटक हवेतच!
साहित्यः दोन वाट्या तांदळाचा रवा, दोन वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, मीठ, तूप वेलची, पाणी, चिमुटभर हळद, एक चमचाभर आल्याचा किस.
कृती: पूर्वी जातिणीवर रवा काढला जाई. आता मात्र बाजारात तयार इडली रवा मिळत असल्याने काम बरेच सोपे झालेय. हा रवा थोडा कोरडा भाजून झाल्यावर साधारण पाव वाटी तूप घालून मंद आचेवर तांबूस भाजावा. रव्याच्या 3 पट पाणी घेऊन ते उकळण्यास ठेवावे. त्यात गूळ. मीठ, थोडे ओले खोबरे आणि वेलची पावडर घालावी.हळद घालावी, आल्याचा कीस घालावा. उकळी आली की भाजलेला रवा मिसळावा. नीट मिक्स करून मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावे. थाळ्याला तूपाचा हात लावावा. रवा व्यवस्थित शिजला की मिश्रण थाळ्यात पसरावे, थापताना वर ओले खोबरे पसरून थापावे. आवडीप्रमाणे वड्या पाडाव्यात.
मस्त कणीदार तूप किंवा नारळाच्या दुधाबरोबर खाव्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा