कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, २८ मे, २०१६

आंबा कलाकंद





साहित्यः १०० ग्रॅम साखर, १५० ग्रॅम हापूस आंब्याचा रस, १०० ग्रॅम पनीर, १०० ग्रॅम खवा. सजावटीसाठी पिस्ते काप, केशराच्या काड्या.

कृती: हापूस आंब्याचा रस काढून मिक्सरवर फिरवून बारीक करून घ्यावा. रस मोजून घ्यावा. पनीर आणि खवा एकत्र करून गुठळ्या मोडून घ्याव्या. साखर आणि आमरस एकत्र करून मंद गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की एकत्र केलेले खवा पनीर त्यात मिसळावे. परतत रहावे.
मिश्रणाचा गोळा होत आला
की ताटाला तूप लावून गोळा थापावा. पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्यांनी सजवावे. चांदीचा वर्खही लावता येईल. आवडीप्रमाणे वड्या कापाव्या.
मी माझ्या आत्याच्या पंचात्तरीला मुंबईला न्यायचे असल्याने मिश्रण बर्फीसारखे न ठेवता वडीसारखे घट्ट केले. नाहीतर कलाकंद थोडा ओलसर असतो. ताज्या आंब्याचा मस्त स्वाद येतो.

गुरुवार, १२ मे, २०१६

रायआवळ्याचे सरबत









साहित्यः रायआवळे, पिठीसाखर, मीठ, वेलची पावडर,
 पाणी.

कृती: ज्युसर जारमध्ये आवळे आणि थोडे पाणी घालून
 फिरवावे. ज्युसर जारमध्ये बिया तशाच राहतात. तयार
 मिश्रण गाळून घ्यावे. साधारणपणे एक भाग आवळा
 रसाला तीन भाग पाणी लागते, लागल्यास पाणी जास्त
 घ्यावे. पिठीसाखर, मीठ चवीनुसार मिसळावे.
 वेलचीपावडर घालावी. थंडगार करून सर्व्ह करावे.

उन्हाळा फारच वाढलाय. त्यामुळे आवळ्याचे लगडलेले
 झाड पाहून सरबताची कल्पना सुचली. अगदी कैरीच्या
 पन्ह्यासारखे लागते.

                      

बुधवार, ११ मे, २०१६

रातांब्याचं (कोकम) पन्हं

साहित्यःरातांब्याचा गर एक वाटी, गूळ चिरलेला दोन वाटया, मीठ चवीनुसार, एक टीस्पून जीरे पावडर, दोन ओल्या मिरच्या वाटून, पाणी.
sarbat
कृती:रातांबे स्वच्छ करून घ्या. दोन भाग करून आतला गर बियांसह काढून घ्या.( सालींचे कोकमसरबत करता येते.) गर मोजून त्याच्या दुप्पट गूळ आणि चवीनुसार मीठ मिसळून गर अर्धा तास झाकून ठेवा,
sarbat
गूळ पूर्ण विरघळला की त्यात जीरेपूड आणि वाटलेली मिरची घालून मिश्रण गाळून घ्या. मिश्रणाच्या चौपट पाणी लागते.
चव बघून लागल्यास मीठ घाला. तयार पन्हं थंडगार करून सर्व्ह करा.
माझ्या माहेरी पाडव्याला गावच्या देवळात सर्व गावकरी एकत्र जमून वसंत पूजा करतात. गणपतीची पूजा करून नवीन पंचांगाचे वाचन करतात. त्यावेळी नैवेद्याला आंबेडाळ आणि रातांब्याचं पन्हं असा नैवेद्य असतो. नंतर आलेल्या सर्वाना डाळ आणि पन्हं वाटलं जातं.
sarbat
या पन्ह्याला कोकम सरबतासारखा रंग येत नाही, पण जीरं, मिरची आणि गूळ याने अप्रतिम चव येते. आमच्याकडे थोड्या फुगीर अशा ओल्या मिरच्या येतात या सिझनला, त्याचा वास मस्त असतो. मिरची तिखटपणासाठी नसून फक्त स्वादासाठी आहे. हे पन्हं टिकावू नाही.

Spicy Kokum Juice



  • Ingredients:
  • 1 cup kokum pulp
  • 2 cups jaggery
  • 1 teaspoon roasted cumin powder
  • 2 green chilies
  • water
  • salt 2 teaspoons


  • Procedure:
  • Wash and peel kokum fruits.
  • Keep outer skin aside for concentrated juice.
  • Add pulp with seeds in a large bowl.




  • Crush jaggery and add in a pulp, keep aside for an hour.
  • Make paste of green chilies.
  • After an hour strain the mixture. 
  • You will get concentrated juice.
  • Add 1:5 water in a juice.
  • Mix salt, roasted cumin powder, chilly paste.
  • Adjust as per your taste.
  • Strain again and serve chilled!!
  • Enjoy summer!!!!
  • Dried seeds of kokum are useful to make kokum butter!


 

रविवार, १७ एप्रिल, २०१६

पांढर्‍या जामचे सरबत


पांढर्‍या जामचे सरबत




उन्हाळ्यात अनेक प्रकारची फळे येतात. पांढरे जाम ज्यांना आमच्याकडे विलायती जाम म्हणतात ते या दिवसात मोठ्या प्रमाणात होतात. नुसते खायला छान लागतातच, पण काढल्यावर फार दिवस टिकत नाहीत. घरीच झाड असल्याने त्यांचा दुसरा काहीतरी उपयोग म्हणून सरबत करून पाहिले. सरबत चवीला पन्ह्यासारखे लागते, आणि फ्रिजमध्ये दोन दिवस टिकतेही! हा जामचा फोटो!

साहित्यः पांढरे जाम २०, साखर चार पाच चमचे, मीठ, वेलची पावडर, थंड पाणी.
कृती: जाम स्व्च्छ करून घ्यावेत.जामचे दोन भाग करून त्यातील बिया काढून घ्याव्यात. ज्युसर जारमध्ये जामच्या फोडी , मीठ, साखर घालावे. मीठ साखरेचे प्रमाण चवीनुसार कमी जास्त करावे. या जामना किंचीत आंबट चव असते.साधारण वीस जामसाठी एक ग्लास पाणी घालावे. आणि हे सर्व मिक्सरला फिरवावे. गाळून घ्यावे. वेलची पावडर घालून थंडगार सर्व्ह करावे.
तयार सरबत!

सोमवार, २१ मार्च, २०१६

चटपटा हांडवो- अनाहिता अन्नपूर्णा स्पर्धा उपविजेती पाककृती

महिला दिनानिमित्त अनाहितामध्ये वन डिश मिल या संकल्पनेवर आधारित "अनाहिता अन्नपूर्णा स्पर्धा "आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतली ही उपविजेती पाककृती.
पूर्ण जेवण म्हणून पदार्थ करताना तो सर्व घटक असणारा आणि दिसण्याबरोबर चवीलाही चांगला हवा म्हणून गुजराती/राज्स्थानी प्रकारात थोडे बदल करून ही पोटभरीची डीश चटपटीत करण्याचा प्रयत्न केलाय.
साहित्यः
१) हांडवोसाठी:
तांदूळ २०० ग्रॅम, मूगडाळ ५० ग्रॅम, तूरडाळ ५० ग्रॅम, उडिदडाळ ५०ग्रॅम, चणाडाळ ५० ग्रॅम, दही १०० मिली., आलंपेस्ट
एक टेबलस्पून, लसूणपेस्ट एक टेबल्स्पून, मिरची पेस्ट एक टेबलस्पून, मीठ दीड टीस्पून, साखर एक टीस्पून, तेल दोन
टेबलस्पून, खायचा सोडा एक टीस्पून, हळद एक टीस्पून.
भाज्या: गाजर किसून अर्धी वाटी, कोबी किसून अर्धी वाटी, दुधी किसून अर्धी वाटी, कांदा बारीक चिरून अर्धी वाटी, पाव
वाटी कांदापात चिरून, पाव वाटी कोथिंबिर बारीक चिरून. भाज्या सर्व मिळून २००ग्रॅम.
२) फोडणीसाठी:
तेल दोन टेबलस्पून, पांढरे तीळ एक टीस्पून, मोहरी अर्धा टीस्पून, हळड अर्धा टीस्पून, कढीलिंब १० पाने.
३) हिरवी चटणी:
तीन हिरव्या मिरच्या, मूठभर पुदिना, मूठभर कोथिंबिर, अर्धा टीस्पून शेंदेलोण, अर्धा टीस्पून पादेलोण, लागल्यास साधे
मीठ, एक टीस्पून जिरे.
४) चिंच खजूर चटणी:
१५ खजूर, १२ काळ्या मनुका, एक टेबलस्पून गूळ, एक टेबलस्पून चिंच, एक टीस्पून जिरे, एक टीस्पून धने, अर्धा
टीस्पून शेंदेलोण, अर्धा टीस्पून पादेलोण, एक टीस्पून लाल तिखट, लागल्यास साधे मीठ.
५) सजावटीसाठी:
बारीक पिवळी शेव, चीज दोन क्युब, सॉस.
handvo
कृती:१) डाळी आणि तांदूळ धुऊन रात्री भिजत घालावेत. सकाळी दोन्ही गोष्टी रवाळ वाटाव्यात. वाटताना त्यात दही घालावे,
इडलीच्या पिठाइतपत सैल हवे. पाणी लागल्यास घ्यावे, नाहीतर जादाचे पाणी वापरू नये.
२) मिश्रण उबदार जागी सात्/आठ तास ठेवावे.
३) करायच्या आधी अर्धा तास तयारी करावी कोबी, गाजर, दुधी किसून घ्यावा. आलं लसूण मिरची यांची पेस्ट करावी.
कांदापात, कोथिंबिर बारीक चिरावी.
४) हिरव्या चटणीचे सर्व साहित्य एकत्र करून वाटून घ्यावे.
५) चिंच, खजूर बिया काढून, मनुका थोड्या पाण्यात शिजवून घ्याव्या. बाकी साहित्य एकत्र करून चिंचखजूराची
चटणी वाटून घ्यावी.
६) दोन टेबलस्पून तेलाची मोहरी, तीळ, कढीलिंबाची पाने, हळद घालून फोडणी करावी.
७) वाटलेल्या मिश्रणात. आलं, लसूण, मिरची पेस्ट, साखर, मीठ, खायचा सोडा, तेल, हळद आणि सर्व भाज्या मिक्स
कराव्या.
८) फ्रायपॅनमध्ये केलेल्या फोडणी पैकी थोडी फोडणी घालावी. तयार मिश्रण ओतावे. थोडी फोडणी वरून घालावी.
handvo
९) फ्रायपॅन मंद गॅसवर ठेवावे. दहा मिनिटांनी उघडून पहावे. बाजू उलट करावी, परत ७/८ मिनिटे ठेवावे. सुरीचे टोक
घालून चिकटत नाही ना ते पहावे. तयार हांडवो गार करण्यास ठेवावा.
खरं तर हा तयार हांडवो असाचही छान लागतो. पण त्यावर चटण्या शेव किंवा सॉस लावून आणि चीज किसून
घातल्यास मुलेही अगदी आवडीने खातात.
१०) हांडवो गार झाला की त्याचे पिझ्झ्याप्रमाणे तुकडे करा. प्रत्येक तुकड्याला सॉस लावा. त्यावर चीज पसरा, आणि
द्या मुलांना!
११) किंवा चिंच खजूर चटणी, हिरवी चटणी लावा आणि त्यावर बारीक शेव घालून खा.
१२) हांडवो ओव्हनमध्ये करायचा झाल्यास २०० डिग्रीला प्रिहीट करून २०० डिग्रीवर ३५ ते ४० मिनिटे ठेवावे.
handvo
१३) हांडवो इडलीप्रमाणे उकडूनही करता येतो.
१४) झटपट होण्यासाठी सर्व डाळी आणि तांदूळ यांचे रवाळ पीठ करून ठेवावे. रात्री दही घालून ठेवल्यास भाज्या
मिसळून सकाळी डब्यालाही करता येईल. भाज्या आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही घेता येतील.
handvo

रविवार, ६ मार्च, २०१६

उपासाचा पौष्टीक केक



उद्या महाशिवरात्रीचा उपास असेल. आणि रोजचे तेच तेच खाऊन कंटाळला असाल ना? आता आलाच कोणाचा वाढदिवस उपासाच्या दिवशी तर केकशिवाय साजरा नाही करावा लागणार!
साहित्यः
शिंगाड्याचे पीठ २०० ग्रॅम.
साजूक तूप १०० मिली.
पिठी साखर १०० ग्रॅम
खजूर २० बिया
बेकिंग पावडर एक टीस्पून
खायचा सोडा अर्धा टीस्पून
अर्धा टीस्पून वेलची पावडर
नेसकॉफी चार पाकिटे १ रू. वाली
दीड वाटी दूध
साधी साखर तीन टीस्पून
बदाम सजावटीसाठी

कृती:
अर्धी वाटी दूध गरम करावे. खजूराच्या बिया काढून या दुधात भिजत घालावे. शिंगाड्याचे पीठ, कॉफी पावडर, बेकिंग पावडर, सोडा. वेलची पावडर एकत्र करून तीन वेळा चाळून घ्यावे. खजूर दुधासकट मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यावा. ओव्हन १८० डिग्रीवर पाच मिनिटे प्रिहीट करून घ्यावा. तूप, पिठी साखर, वाटलेला खजूर एकत्र परातीत घेऊन फेसावे. चाळलेले पीठ फेसलेल्या तुपात मिसळून फेसावे. लागेल तसे दूध मिसळावे. मला वाटीभर लागले. त्यार मिश्रणात साधी साखर घालून नीट मिसळावी. यामुळे साखर असलेल्या ठिकाणी साखर विरघळून छान जाळी पडते. सजावटीसाठी बदामाचे काप घालावे. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून त्यात मिश्रण ओतावे.
१८० डिग्रीवर पस्तीस मिनिटे ठेवावे. झाकण काढून सुरी घालून मिश्रण चिकटत नाही ना ते पहावे.

दहा मिनिटे गार करून जाळीवर केक काढावा. गार झाल्यावर तुकडे करून डब्यात भरावा. आता उपास करायला हरकत नाही

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

गुजराती मिठाई: हलवासन

गुजरातच्या खंबातची प्रसिद्ध मिठाई म्हणजे हलवासन. माझ्या सासूबाईंचे माहेर बडोद्याला असल्याने तिकडे गेल्यावर हलवासन हमखास आणले जाई. जेव्हा मला जायची संधी मिळाली तेव्हा खंबातला जाऊन हलवासनची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून मिळालेली ही पाकृ मी दोन तीन वेळा प्रयोग करून सुयोग्य प्रमाणात करू लागले.
साहित्यः एक लिटर दूध, चार टेबलस्पून दही, चार टेबलस्पून डींक, चार टेबलस्पून साजूक तूप, ५० ग्रॅम जाडसर दळलेली कणिक, १५० ग्रॅम साखर, एक टेबलस्पून किसलेले आले, अर्धा टीस्पून वेलची पावडर, अर्धा टीस्पून जायफळ पावडर, १/८ चमचा केशर, १५ बदाम.

कृती: दोन टेबलस्पून तुपावर कणिक मंद गॅसवर बदामी रंगावर भाजून घ्यावी. डींक जाडसर कुटून घ्यावा. दोन टेबलस्पून तुपावर परतून मंदगॅसवर फुलवून घ्यावा. सगळा डींक फुलला की बाजूला काढून ठेवावा. दुसय्रा कढईत दूध उकळायला ठेवावे. उकळी आली की सगळे दही घालावे, यामुळे दूध फाटेल. दूध तसेच उकळत ठेवावे. तळलेला डींक चुरून दुधात मिसळावा. दूध ढवळत रहावे. भाजलेली कणिक दुधात मिसळावी. ७५ ग्रॅम साखर दुधात मिसळावी. ढवळत रहावे. उरलेली ७५ ग्रॅम साखर पॅनमध्ये घेऊन मंद गॅसवर हलवत रहावी. विरघळून तपकिरी रंग आला की हा पाकही दुधात मिसळावा. पाक असा दिसतो.
halvasan
दुधात किसलेले आले घालावे, शिजवत राहावे. दूध घट्ट होत आल्यावर त्यात जायफळ पावडर, वेलची पावडर, केशर मिसळावे. मिश्रणाचा गोळा झाय्राला चिकटेनासा झाला की गॅस बंद करावा. बदामाचे काप करून घ्यावे. गोळा गार होईपर्यंत मिश्रण हलवत रहावे. गोळ्यात अर्धे बदामाचे काप मिसळावे. पॅटीससारखे गोळे करून बदाम काप लावून सजवावे.

या मोसमात खंबातला अजून एक गोष्ट पहायला मिळाली ती म्हणजे पतंगोत्सवाची तयारी! गुजरातची मिठाई आणि या मोसमातली, म्हणजे पतंग हवाच!
halvasan