कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २२ जुलै, २०१६

सफरचंद हलवा

साहित्य: 
  सफरचंद १ किलो, खवा ३५०ग्रॅम, साखर १ ते सव्वा वाटी, वेलची पावडर स्वादानुसार,बदाम काप,बेदाणे,काजू तुकडे,तूप        ३चमचे.
कृती:
प्रथम दोन दोन सफरचंदांची साले काढून घ्यावी.कढईत तूप तापत ठेवावे.गॅस बारीक ठेवावा. साले काढ्लेल्या सफरचंदाच्या फोडी करुन घ्याव्या. त्यातील बिया काढून फोडी किसाव्या, किस लगेच तुपात टाकून परतावा.याच प्रकारे सगळ्या सफरचंदांचा किस करुन तुपावर टाकावा. १० मिनीटे किस परतल्यावर त्यात साखर मिसळावी. साखर विरघळली की खवा मिसळावा.बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे यापैकी आवडीप्रमाणे मिसळावे.थोडा वेळ परतावा. वेलची पावडर घालावी.बदामाच्या कापानी सजवावे.( किस लगेच परतल्यामुळे काळा पडत नाही.)


बुधवार, ६ जुलै, २०१६

खांडवी


खांडवी (नागपंचमी विशेष)




आमच्याकडे कोकणात नागपंचमीला चंदन उगाळून त्याने पाटावर नाग काढून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीला उकडीचे मोदक किंवा खांडवी केली जाते. तसे कोकणातल्या पाककृती म्हणजे त्यात तांदुळ, गूळ आणि ओले खोबरे हे मुख्य घटक हवेतच!
साहित्यः दोन वाट्या तांदळाचा रवा, दोन वाट्या गूळ, एक वाटी ओले खोबरे, मीठ, तूप वेलची, पाणी, चिमुटभर हळद, एक चमचाभर आल्याचा किस.
कृती: पूर्वी जातिणीवर रवा काढला जाई. आता मात्र बाजारात तयार इडली रवा मिळत असल्याने काम बरेच सोपे झालेय. हा रवा थोडा कोरडा भाजून झाल्यावर साधारण पाव वाटी तूप घालून मंद आचेवर तांबूस भाजावा. रव्याच्या 3 पट पाणी घेऊन ते उकळण्यास ठेवावे. त्यात गूळ. मीठ, थोडे ओले खोबरे आणि वेलची पावडर घालावी.हळद घालावी, आल्याचा कीस घालावा. उकळी आली की भाजलेला रवा मिसळावा. नीट मिक्स करून मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावे. थाळ्याला तूपाचा हात लावावा. रवा व्यवस्थित शिजला की मिश्रण थाळ्यात पसरावे, थापताना वर ओले खोबरे पसरून थापावे. आवडीप्रमाणे वड्या पाडाव्यात.
मस्त कणीदार तूप किंवा नारळाच्या दुधाबरोबर खाव्या.

सोमवार, ४ जुलै, २०१६

कोबीची भजी

पाऊस जोरदार हजेरी लावतोय त्यामुळे गरमागरम भजी हवीतच!
साहित्यः
कोबी अर्धा कि., दोन कांदे, अर्धा कि. बेसन, अर्धी वाटी बारीक रवा, एक चमचा लसूण पेस्ट, एक चमचा आलं पेस्ट, लाल तिखट दोन चमचे, ओवा एक चमचा, मीठ चवीनुसार, तेल तळणीसाठी, अगदी थोडी हळद.
कृती:खेकडा भजीसाठी कांदा चिरतो तसाच लांब उभा कांदा चिरून घ्या, कोबीही कांद्यासारखाच चिरा. आता कांदा कोबी एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट मिसळा, ओवा, हळद मिसळा. दहा पंधरा मिनिटे झाकून ठेवा. कोबीला पाणी सुटले की त्यात रवा मिसळा. आता थोडे थोडे बेसन मिसळा. खेकडा भजीसारखेच भिजवायचे आहे, त्यामुळे बेसन लागेल तेवढेच वापरा. चवीनुसार लागल्यास तिखटमीठ वाढवा. तेल गरम करा. भजी तळून गरमागरम सर्व्ह करा.
मी यासोबत दह्यात कांदा लसूण मसाला, मीठ, साखर घालून दिले होते. ओव्याची पानेही बारीक चिरून घातली होती.
bhaji