कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

कटाची आमटी

पुरणपोळी केली की कटाची आमटी हवीच!


साहित्यःअर्धा कि. शिजलेल्या चणाडाळीचे पाणी, अर्धी वाटी सुके खोबरे किसून, दोन लवंगा, एक  छोटा तुकडा दालचिनी, दोन तीन सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा जिरं, दोन चमचे चिंचेचा कोळ, दोन चमचे गूळ, मीठ, कढिलिंबाची पाने, अर्धा चमचा गोडा मसाला, तेल,थोडे लाल तिखट, फोडणीचे साहित्य
कृती: पुरण पोळी जेव्हा केली जाते, तेव्हाच कटाची आमटी करतात. पुरण पोळीसाठी अर्धा कि. चणाडाळ जास्त पाणी घालून शिजत लावावी. डाळ शिजल्यावर चाळणीवर काढावी. चाळणीखाली पातेले ठेवावे. त्यात डाळीतले पाणी साठेल. हे पाणी जर खूप कमी असेल तर पाव वाटी चणाडाळ शिजवून ती घोटून या पाण्यात मिसळावी. सुके खोबरे भाजून घ्यावे. अगदी थोडे तेल घेऊन जिरं, लवंग, दालचिनी, सुक्या मिरच्या परतून घ्याव्या. सुके खोबरे आणि मसाला एकत्र बारीक वाटून घ्यावा. तेलाची मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी, फोडणीत अर्धा चमचा लाल तिखट घालावे. आता त्यात चणाडाळीचे पाणी घालावे. वाटलेला मसाला घालावा. चिंचेचा कोळ, गूळ घालावा. चवीनुसार मीठ घालावे. ५/६ पाने कढिलिंब घालावा. गोडा मसाला घालून आमटी चांगली उकळावी.  चवीनुसार चिंचेचा कोळ, गूळ, मीठाचे प्रमाण कमीजास्त करावे. ही आमटी थोडी सणसणीत मस्त वाटते, लागल्यास लाल तिखट वाढवावे.
साध्या डाळीची सुध्दा ही आमटी करता येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा