कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, ३० एप्रिल, २०१७

आंब्याची शिकरण (दूध आंबा):

साहित्य:
 5 हापूस आंबे, (हापुसच), दूध अर्धा ली. , साखर दोन चमचे, अगदी थोडे मीठ.


कृती:
आंबे स्वच्छ धुवावेत. दोन बाजू कापून घ्याव्यात, त्यावर उभ्या आडव्या फोडी होतील अशा सुरीने रेषा माराव्यात. चमच्याने भांड्यात काढून घ्याव्यात. दोन्ही कडा पण कापून त्याच्या फोडी करून घ्याव्यात . कोयीचा रस काढून घ्यावा. दूध न तापवता गार करून घ्यावे. फोडी आणि रस एकत्र करावा. त्यात दूध आणि साखर आणि अगदी चवीला मीठ घालावे. नीट मिक्स करावे. आणि गारेगार खावे. मिठाने दूध नासत नाही, पण जर नको असेल तर नका घालू. चवीला मीठ घातले तर छान लागते. एक नवीन सोपी स्वीट डिश, अजून शाही करायचे तर देताना आईसक्रीम चा गोळा ठेवा.

सोमवार, १७ एप्रिल, २०१७

मिश्र पिठाची धिरडी


साहित्यः  मिश्र पीठ, तिखट, मीठ, कोथिंबीर,  पाणी, तेल.

मिश्र पीठ : ३ वाट्या तांदूळ, ३ वाट्या चणा डाळ, एक वाटी उडीद डाळ, एक वाटी मूग डाळ, अर्धी वाटी गहू, अर्धी वाटी जोंधळा, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी तूर डाळ, 1टेबलस्पून मेथी, 1 टेबलस्पून धने, अर्धा टेबलस्पून जीरं हे सर्व एकत्र करून दळून आणावे.


कृती:
  आपल्याला लागणार असेल तेवढे त्यार पीठ घ्या. या पिठात तिखट, मीठ चवीनुसार घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.  पाणी घालून डोश्यासारखे पीठ भिजवा. तवा तापत ठेवा. तेल पसरा. आता तयार मिश्रण गोल पसरवा. एक मिनिट झाकण ठेवा. झाकण काढून धिरडे परता. दुसरी बाजू भाजून घ्या. गरमागरम धिरडे सॉस, लोणी, चटणी बरोबर खायला द्या.
 या पिठात मेथी पाने, पालक, कांदा, टॉमेटो असे काहीही घालून वेगवेगळ्या चवीची धिरडी बनवू शकता.

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

करवंद सरबत

उन्हाळा सुरू झाला तसा रानमेवा पण खूपच देसू लागलाय! निसर्गाने उन्हापासून आपली काळजी घेण्यासाठी अनेक पर्याय देलेत. आज करूया करवंद सरबत!
साहित्यः
दोन वाट्या करवंद, एक वाटी साखर, मीठ चवीनुसार.


कृती:
करवंदांचा चीक जाण्यासाठी गरम पाण्यात दहा मिनिटे बुडवून ठेवा. पाण्यातून काढून घ्या. दोन भाग करून बिया वेगळ्या करा. करवंदाचा गर, साखर, मीठ आणि एक वाटी पाणी ज्युसर जारमधे एकत्र करा. मिक्सरला लावून नीट फिरवून घ्या. गाळणीने किंवा पातळ कापडाने गाळून घ्या. एक वाटी रसाला तीन वाट्या पाणी मिसळा. लागल्यास पाणी, साखर, मीठ वाढवा. गारेगार सरबत प्या.