साहित्य: साबुदाणा पीठ दोन वाट्या, पिठीसाखर एक वाटी, साजूक तूप अर्धी वाटी, खसखस पाव वाटी, वेलची पावडर कृती: मंद आचेवर तडतड होईपर्यंत साबुदाणा भाजून घ्या. पीठ करून घ्या. पिठीसाखर आणि तूप एकत्र करून फेसून घ्या. त्या आधी खसखस भाजून बारिक करा. पिठीसाखर आणि तूप ,वेलचीपावडर फेसून घ्या. आता त्यात साबुदाणापीठ, खसखस घालून नीट मिक्स करा. लाडू वळा. तूप बरोबर होतेच पण जास्त वाटले तर थोडे पीठ वाढवा. चव घेऊन लागल्यास पिठीसाखर वाढवा.
उपासाला चालणारी झटपट सोपी रेसिपी साहित्य: अर्धी वाटी वरी तांदूळ, दोन वाट्या पाणी दोन वाट्या ताक, चार ओल्या मिरच्या, दोन चमचे तूप, चार चमचे शेंगदाण्याचे कूट, पाव चमचा जीरे, मीठ. कृती:वरी तांदूळ स्वच्छ धुवा. पाणी निथळत ठेवा. कढई तापत ठेवा. मिरच्या धुवा आणि तुकडे करून घ्या. कढईत तूप घाला. तापले की जीरे, मिरच्यांचे तुकडे घालून मंद गॅसवर परता. आता त्यात वरी तांदूळ घालून परता. त्यात पाणी घालून मंद गॅसवर शिजू द्या. वरी शिजली की त्यात दाण्याचे कूट, ताक, मीठ घालून ढवळा. हे थोडे सैलसर असते. गरमागरम छान लागते. उपासाला खात असाल तर कोंथिबीर घाला.
साहित्य: पाव की तोंडली, एक वाटी दही, दोन चमचे मेतकूट, थोडी कोथिंबीर, दोन ओल्या मिरच्या, मीठ, साखर, दोन चमचे तूप, चिमुटभर हिंग, जिरे कृती: तोंडली स्वच्छ धुवावीत. काचऱ्या करून। पाण्यात टाकाव्यात. सकाळीच एक वाटी दही लावावे. चिरलेल्या काचऱ्या कुकरला शिजवून घ्याव्यात. चाळणीवर घालून पाणी काढून टाकावे. तूपाची हिंग जिरे आणि मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी. सजलेल्या काचऱ्या बाऊलमध्ये काढाव्यात. त्यात चवीनुसार मीठ, थोडी साखर , दोन चमचे मेतकूट आणि धुवून बारीक चिरलेली कोंथिबीर घालावी. दही घालावे. वरून तयार फोडणी द्यावी. नीट मिक्स करावे. अशा प्रकारे पडवळ, दुधीचे पण भरीत छान लागते.
साहित्य: पाव की पातळ पोहे, तीन मध्यम कांदे, अर्ध लिंबू, एक चमचा साखर, मीठ, दोन तीन ओल्या मिरच्या, सांडगी मिरच्या तीन, कोंथिबीर , अर्धा नारळ, अर्धी वाटी तेल, दोन टॉमेटो, फोडणीचे साहित्य
कृती: पातळ पोहे चाळून मंद गॅसवर छान भाजून घ्या. तेल तापत ठेवा. तापले की सांडगी मिरची तळून घ्या. आता मोहोरी, हिंग, मिरचीचे तुकडे, हळद , घालून फोडणी करा. त्यात भाजलेले पोहे घालून छान परता. मीठ, साखर घाला. गॅस बंद करा. नारळ खवून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. कांदे बारीक चिरा. टॉमेटो चिरा. आता पोह्यात कांदा, कोथींबीर, खवलेला नारळ, लिंबाचा रस, चुरलेली सांडगी मिरची घालावी. नीट मिक्स करावे. ह्यात पापडही छान लागतो. खायला देताना टॉमेटो घालावा. सांडगी मिरची तळून, कुस्करून पोह्यात घातली की छान खमंग लागतात पोहे!
साहित्य: आटवलेला आंब्याचा रस एक वाटी, साखर दीड वाटी, वेलची पावडर चिमुटभर
कृती: कोकणात उन्हाळ्यात खूप आंबे होतात. तेव्हा मोठया परातीत आंब्याचा रस घेऊन लांब दांड्याच्या लाकडी उलथ्याने ढवळून आटवला जातो. घट्ट होत आला त्यात थोडी साखर घातली जाते. गार झाल्यावर या रसाचे गोळे हवाबंद डब्यात ठेवतात. वर्षभरात केव्हाही वापरता येतात. एक कढईत साखर घ्यावी. त्यात वाटीभर पाणी घालून पाक करायला गॅसवर ठेवावे. गोळीबंद पाक करावा. एक वाटीत पाणी घ्यावे. त्यात पाक एक दोन थेंब घालावा. पाकाची गोळी होते का पहावी. पाकाची गोळी झाली की गॅस बंद करावा. त्यात एक वाटी आटवलेला रस घालून घोटावे. हवी असल्यास वेलची पावडर घालावी. कारण वड्याना आंब्याचा सुंदर स्वाद येतो. ताटाला तुपाचा हात लावावा. घोटून गोळा झाला की ताटात थापावे, आणि आवडीप्रमाणे वड्या कापाव्यात.
साहित्य: एक वाटी भिजवलेला साबुदाणा, अर्धा ली दूध, ५/६ चमचे साखर , चिमुटभर वेलची पावडर.
कृती: खिचडीसाठी साबुदाणा भिजवलेला असेलच. त्यातला एक वाटी छान भिजलेला साबुदाणा एका पातेल्यात घ्या. त्यात अर्धा ली दूध मिसळा. पाच सहा चमचे साखर घाला. मिश्रण नीट ढवळून गॅसवर ठेवा. छान उकळी काढा. ढवळत रहा. साबुदाणा शिजला की पारदर्शक होतो. आता त्यात वेचची पावडर घाला आणि झटपट डिश सर्व्ह करा. साबुदाणा दूध साखर यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदला. गोड, दाट, पातळ जसे हवे तसे!