कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

मक्याचा चिवडा

मक्याचा चिवडा:

गणपतीत रोज काहीतरी गोड खाणं झालं की चटपटीत हवं वाटायला लागतं! त्यासाठी घरीच करा कुरकुरीत मक्याचा चिवडा!
साहित्य: मक्याचे पोहे अर्धा की, पिठीसाखर अर्धा कप( कप=250 ml), मीठ एक टेबलस्पून, लाल तिखट एक टेबलस्पून, शेंगदाणे एक कप, काजूगर अर्धा कप, कढीलिंबाची पाने 25/30, तेल तळणीसाठी

कृती: कढईत तेल घ्या, त्यात तारेचे गाळणे ठेवा, गाळणे तेलात ठेवल्यावर त्यात तेल दिसेल. कढई तापत ठेवा. मक्याचे पोहे या गाळण्यात घालून झाऱ्याने हलवून तळा. हे पोहे पटकन फुलतात त्यामुळे गॅस मोठा ठेवू नका नाहीतर पोहे करपतील, पोहे तळलेत असं वाटलं तर गाळणे वर उचलून सावकाशपणे पोहे काढता येतात. असे सर्व पोहे नीट हलवून तळून घ्या. त्याच गाळण्यात अनुक्रमे शेंगदाणे, काजूगर आणि कढीलिंबाची पाने तळून या पोह्यांवर घाला. पिठीसाखर, मीठ, तिखट घालून चिवडा हलक्या हाताने नीट मिक्स करून घ्या.
गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
टीप: मी या चिवड्याला फोडणी करत नाही.
 आवडत असतील तर खोबऱ्याचे पातळ काप तळून घालू शकता.
तिखट, मीठ आणि साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदला.
✍🏻 मीनल सरदेशपांडे



रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

अंबाडीची भाजी:

अंबाडीची भाजी:






अंबाडीची भाजीला पळीपळी तेल..बघा हो सासूबाई सुनेचे खेळ!! अशी मंगळागौरीच्या खेळात येणारी ही भाजी भरपूर तेल घालून छान चमचमीत लागते...त्यासोबत भाकरी म्हणजे स्वर्ग...अहाहा!! चला तर करूया

साहित्य:
अंबाडीची पाने दोन कप, पाव कप तूरडाळ, पाव कप तांदूळ किंवा कण्या, दोन टेबलस्पून तेल, दहा/बारा लसूण पाकळ्या, सुक्या मिरच्यांचे तुकडे पाच सहा, मेथी दाणे पाव टीस्पून, मोहोरी पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून,  हळद अर्धा टीस्पून, लाल तिखट अर्धा टीस्पून, सांडगी मिरची कूट एक टीस्पून, मीठ, गूळ एक टीस्पून( ऐच्छिक)

अंबाडीच्या पानांचे देठ काढून पानं मिठाच्या पाण्यात दहा मिनिटं बुडवून ठेवावीत.  स्वच्छ धुवून बारीक चिरावीत. थोडं पाणी घालून शिजवून घ्यावीत.
तूरडाळ आणि तांदूळ वेगवेगळे धुवून दुप्पट पाणी घालून शिजवून घ्यावे. लसूण सोलून घ्यावी. कढईत एक टेबलस्पून तेल तापत ठेवावे. चार सांडगी मिरच्या तळून बाजूला ठेवाव्यात. आता तेलात मोहोरी, मेथी दाणे, हिंग, हळद आणि पाव टीस्पून लाल तिखट घालून फोडणी करावी. अंबाडीतले थोडे पाणी काढून ठेवावे, बाकी पाला फोडणीत घालावा. शिजलेली डाळ, तांदूळ घालून छान परतावे, अर्धी वाटी पाणी घालावे. सांडगी मिरची मिक्सरला लावून बारीक करावी. ही पावडर, मीठ, गूळ घालून भाजी शिजू द्यावी. चव बघून जे लागेल ते वाढवावे.
 एका लोखंडी कढल्यात एक टेबलस्पून तेल घेऊन त्यात लसूण पाकळ्या घालाव्यात. फार जाड असतील तर दोन भाग करून घालावे, लसूण तळून होत आली की। सुक्या मिरच्या घालाव्यात. त्या तळल्या गेल्या की गॅस बंद करून उरलेलं लाल तिखट घालून ही चरचरीत फोडणी भाजीला द्यावी.
गरमागरम भाकरी आणि ही भाजी..करा सुरू पटापट!

टीप: मला स्वतःला अंबाडीच्या भाजीत गूळ आवडत नाही पण तुम्हाला जास्त आवडत असेल तरी वाढवा किंवा अजिबात घालू नका.
 अंबाडी खूप आंबट असते म्हणून  शिजल्यावर पाणी बाजूला ठेवावे, भाजी झाल्यावर पुरेशी चव आली नसेल तर घालावे.