कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

मक्याचा चिवडा

मक्याचा चिवडा:

गणपतीत रोज काहीतरी गोड खाणं झालं की चटपटीत हवं वाटायला लागतं! त्यासाठी घरीच करा कुरकुरीत मक्याचा चिवडा!
साहित्य: मक्याचे पोहे अर्धा की, पिठीसाखर अर्धा कप( कप=250 ml), मीठ एक टेबलस्पून, लाल तिखट एक टेबलस्पून, शेंगदाणे एक कप, काजूगर अर्धा कप, कढीलिंबाची पाने 25/30, तेल तळणीसाठी

कृती: कढईत तेल घ्या, त्यात तारेचे गाळणे ठेवा, गाळणे तेलात ठेवल्यावर त्यात तेल दिसेल. कढई तापत ठेवा. मक्याचे पोहे या गाळण्यात घालून झाऱ्याने हलवून तळा. हे पोहे पटकन फुलतात त्यामुळे गॅस मोठा ठेवू नका नाहीतर पोहे करपतील, पोहे तळलेत असं वाटलं तर गाळणे वर उचलून सावकाशपणे पोहे काढता येतात. असे सर्व पोहे नीट हलवून तळून घ्या. त्याच गाळण्यात अनुक्रमे शेंगदाणे, काजूगर आणि कढीलिंबाची पाने तळून या पोह्यांवर घाला. पिठीसाखर, मीठ, तिखट घालून चिवडा हलक्या हाताने नीट मिक्स करून घ्या.
गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
टीप: मी या चिवड्याला फोडणी करत नाही.
 आवडत असतील तर खोबऱ्याचे पातळ काप तळून घालू शकता.
तिखट, मीठ आणि साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदला.
✍🏻 मीनल सरदेशपांडे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा