कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

पोह्यांची उकड

पोहे हे आम्हा कोकणीमाणसांचा जीव की प्राण! कोणताही समारंभ पूर्ण होतच नाही पोह्यांशिवाय. जसे पोह्यांचे वेगवेगळे प्रकार होतात तशीच पोह्यांची उकडही मस्त लागते.
साहित्यः


 दोन वाट्या जाडे पोहे, दोन वाट्या ताक, दोन हिरव्या मिरच्या, कढिलिंबाची पाने, दोन चमचे तूप, एक चमचा जीरे, दहा बारा लसूण पाकळ्या, थोडं आलं किसून, मीठ, चिमुटभर हळद.
कृती:
 पोहे धुवावेत. धुतलेले पोहे आणि जरूरीनुसार ताक घालून मिक्सरवर फिरवून घ्या. अगदी गुळगुळीत करू नका. कढईत तूप घालून तापत ठेवा. त्यात जीरे, मिरचीचे तुकडे, सोललेल्या लसूण पाकळ्या घाला. लसूण चांगली तांबूस होऊद्या. तोपर्यंत तयार मिश्रणात मीठ, हळद मिसळून घ्या.लसूण तळली की कढीलिंबाची पाने घाला. आता तयार मिश्रण फोडणीत ओता. उरलेले ताक घाला. किसलेले आले घाला. गरजेनुसार पाणी घाला. ढवळून एक वाफ काढा.  गरमागरम उकडीवर साजूक तूप घालून खा.

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

नवलकोलची भाजी

साधारणपणे भात कापणीनंतर कोकणात लाल माठ, मुळा, नवलकोल, गावठी मिरच्या इत्यादी भाज्या लावल्या जातात. याच सिझनला त्या मिळतात. 

साहित्यः
 दोन जुड्या नवलकोल, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, दोन/तीन सुक्या लाल मिरच्या, तिखट, मीठ, गूळ, ओले खोबरे(ऐच्छीक).
कृती:
नवलकोलच्या कांद्यांवरील कोवळी पाने काढून धुऊन बारिक चिरावीत. कुकरला दोन शिट्या करून घ्याव्या. नवलकोलच्या कांद्याची साले काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी कराव्या. नेहमीप्रमाणे फोडणी करावी, फोडणीत सुक्या मिरच्या घालाव्या. त्यावर चिरलेल्या फोडी टाकून थोडे पाणी घालून शिजवून घ्याव्या. फोडी शिजल्या की चवीनुसार तिखट, मीठ, गूळ घालावे. शिजलेली पाने मिक्स करावीत. आवडत असल्यास थोडे ओले खोबरे घालावे. गरमागरम पोळीबरोबर भाजी फस्त करावी. या भाजीत फोडीबरोबर पानेही घातल्याने भाजी छान लागते
.

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

घाटलं!!

गौरी गणपतीला, शेतकापणी झाल्यावर मूगवणीला तसेच कोकणात बय्राच सणांना घाटलं करायची पध्द्त आहे. नेहमीचेच पदार्थ वापरून केलेला अजून एक चविष्ट पारंपारीक प्रकार!


साहित्यः
अर्धी वाटी तांदळाचा रवा, एक वाटी गूळ, एका नारळाचे ओले खोबरे (यातले अर्धी वाटी तसेच वापरायचे आहे आणि बाकीच्याचे दूध काढायचे आहे.), चार वाट्या पाणी, वेलची पावडर, सुंठ पावडर एक चमचा, हळद पाव चमचा, मीठ आणि केशर, एक चमचा तूप.
ghatla
कृती:
ओल्या खोबय्रापैकी अर्धी वाटी बाजूला ठेवा. बाकी खोबय्राचे दूध काढून घ्या, साधारण चार वाट्या दूध निघेल. कढईत एक चमचा तूप घ्या. त्यात अर्धी वाटी रवा घालून मंद आचेवर तांबूस भाजून घ्या. एक वाटी गूळ, अर्धी वाटी ओले खोबरे, मीठ चवीपुरते, हळद, चार वाट्या पाणी हे सर्व एकत्र करा. उकळी काढा. गूळ विरघळला की भाजलेल्या रव्यात ओतून मंद आचेवर ठेवा. रवा शिजत आला की नारळाचे दूध, वेलची पावडर, सुंठ पावडर घालून ढवळा. वरून केशराच्या काड्या घाला.
तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे सैल घट्ट करा. पण घाटलं चमच्याने खाण्या इतपत असते. तांदळाच्या पिठाच्या घावनांबरोबर घाटलं करतात.
माझी आजी प्राजक्ताच्या फुलांची देठं काढून ती सावलीत वाळवत असे. आणि त्या काड्याच केशर म्हणून वापरत असे.
ghatla

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

गूळ नारळ पोहे : दिवाळी स्पेशल

कोकणात या दिवसात नविन भात तयार होते.  याभातापासून ताजे पोहे दिवाळीसाठी तयार केले जातात. भात आदल्यादिवशी भिजत घातले जाते. दुसय्रा दिवशी परडीत उसपून त्यावर आधण (गरम) पाणी ओतले जाते. मग हे भात भाजून त्यापासून पोहे कांडले जात. पूर्वी हे काम घरीच केले जाई. आता पोह्यांच्या गिरणीत होते.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी नैवेद्याला गूळ नारळ पोहे हवेतच.
साहित्यः
 एक वाटी गावठी किंवा नेहमीचे जाडे पोहे, अर्धी वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी गूळ, एक चमचा तूप, मीठ, वेलची पावडर. थोडे पाणी.

 कृती: प्रथम पोहे धुवावेत आणि चाळणीवर निथळत ठेवावेत. ओले खोबरे, गूळ आणि चवीला मीठ हे सर्व कढईत एकत्र करावे. पाव वाटी पाणी घालावे. मंद गॅसवर ठेवावे. गूळ विरघळला की धुतलेले पोहे घालून नीट मिसळावे. वेलची पावडर घालावी. चमचाभर तूप सोडावे. आणि एक वाफ येऊ द्यावी. गरमागरम चविष्ट पोहे केळीच्या पानावर घ्यावेत आणि वर तूपाची धार!!!! अहाहा!! थंडीच्या दिवसात मजा येते हे पोहे खायला. गूळ तुमच्या चवीनुसार कमी घेण्यास हरकत नाही.




बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

कडबोळी: दिवाळी स्पेशल

पूर्वी अठराधान्यांची कडबोळी करत असत. अगदी अठरा नाही पण जी घरात उपलब्ध होती ती घेऊन केलेली खमंग कडबोळी!
साहित्यः
भाजणीसाठी: तांदूळ १ कि. ( मी गावठी वापरले), चणाडाळ अर्धा कि., उडीद पाव कि., एक वाटी पोहे, एक वाटी साबूदाणा, पाव वाटी तूरडाळ, पाव वाटी मसूरडाळ, पाव वाटी नाचणी, पाव वाटी मूग, पाव वाटी ज्वारी, अर्धी वाटी धने, पाव वाटी जीरे.
कडबोळ्यांसाठी: एक कि. भाजणी, पाऊण लि. पाणी, तेल १५०मिली, ओवा पाव वाटी, तिखट, मीठ, हळद, तेल तळणीसाठी.
कृती:
तांदूळ धुवावेत आणि सावलीत वाळवावेत. धुतलेले तांदूळ आणि बाकी सर्व साहित्य भाजून घ्यावे. खूप जास्त भाजू नये. उडीद भाजताना काळजी घ्यावी. भाजलेले सर्व साहित्य एकत्र करून बारीक दळून आणावे.
kadboli
कडबोळी करायला घेताना एक कि. भाजणी मोजून घ्यावी, पाऊण लि. पाणी गरम करावे. ओवा मिक्सरला जरा फिरवून घ्यावा. पिठात ओवा, तिखट चार चमचे, हळद एक चमचा, मीठ मिसळावे. तेल चांगले गरम करून पिठावर घालावे. गरम पाणी घालावे. सर्व मिश्रण नीट एकत्र करून झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने भाजणी चांगली मळून घ्यावी. मी फूडप्रोसेसरला फिरवून घेते. तयार पिठाचा गोळा घेऊन ताटाच्या पाठच्या बाजूला लांब वळावे. मग चकलीसारखे गुंडाळावे.
kadboli
कढईत तेल चांगले तापवावे. तयार कडबोळी मध्यम गॅसवर छान कुरकुरीत तळावीत. लोण्याबरोबर फस्त करावीत. चकली तर वर्षभर असतेच. या दिवाळीला बघा कडबोळी करून!
kadboli
मी कडबोळ्याच्या भाजणीत अख्खे हरभरे घालत नाही. हरभरे वापरले तर कडबोळी खाल्ल्यावर जळजळ होते, हा माझा अनुभव पण तुम्ही वापरून पहायला हरकत नाही.

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

गय्राच्या पिठाची आंबीलः खास उपासासाठी!

मे महिन्यात जेव्हा खूप फणस तयार होतात तेव्हा कच्च्या फणसाचे गरे सोलून बारीक चौकोनी फोडी करून वाळवले जातात. अगदी चांगले वाळले ही डब्यात भरून ठेवतात. या गय्रांचे पीठ केले जाते. हे पीठ चार पाच महिने चांगले टिकते. पावसातल्या उपासाला उपयोगी येते. अर्थात गय्राचा थोडा वास कळतो. या पिठाची थालिपीठे, आंबील असे प्रकार होतात.
साहित्यः
एक वाटी ताक, एक वाटी पाणी, मीठ, दोन चमचे गय्राचे पीठ, पाव चमचा जीरे, एक चमचा तूप, एक ओली मिरची, चिमुटभर साखर.


कृती:
एका भांड्यात ताक, पाणी, मीठ एकत्र करा. हवी असल्यास साखर घाला. आता यात दोन चमचे गय्राचे पीठ नीट मिसळून घ्या. गोळी राहता कामा नये. या मिश्रणाला तूपाची जिरे आणि मिरचीची खमंग फोडणी द्या. मंद गॅसवर उकळायला
ठेवा. ढवळत रहा. दाटपणा आला की गॅस बंद करा. गरमागरम प्या. नाचणीच्या आंबिली सारखीच लागते. कोथिंबीर वापरत असाल उपासाला तर वरून घाला.

घोसाळ्याची (पारोश्यांची) भजी

या मोसमात मुबलक प्रमाणात ही भाजी बाजारात दिसते. याची चिंचगुळाची भाजी, दह्यातले भरीत होतेच, पण भजी म्हणजे अहाहा!!!!
bhaji
साहित्यः
दोन पारोशी, तीन वाट्या बेसन, अर्धी वाटी रवा, अर्धा चमचा ओवा, दोन चमचे तिखट, मीठ, तेल तळणीसाठी.
bhaji
कृती:
पारोशी धुवून त्याच्या गोल चकत्या करून घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ घाला. मीठाची चव आली पाहिजे पाण्याला. आता या पाण्यात चकत्या बुडवून ठेवा. एका खोलगट भांड्यात बेसन, रवा, तिखट, मीठ एकत्र करा. ओवा अगदी थोडा भरड करून घ्या. पिठात मिसळा.पाणी घाला. पिठाची चव बघून लागेल तसे तिखट, मीठ वाढवा. आता चकत्या चाळणीवर काढा. पाणी निघून जाऊ द्या. कढईत तेल तापत ठेवा. चकत्या पिठात बुडवून तळून घ्या. रव्यामुळे कुरकुरीत होतात भजी, सोडा किंवा तेल घालायची गरज नाही.
bhaji
मस्त कुरकुरीत भजी तयार आहेत!!
bhaji
आता वाट का पाहताय? करा सुरूवात!! पण जरा जपून, नाहीतर कांदाभजीसारखी खायला जाल आणि तोंड भाजेल!!
ही काही नविन पाकृ नव्हे....फक्त आठवण...केली नसाल तर लगेच करा!!