कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

घाटलं!!

गौरी गणपतीला, शेतकापणी झाल्यावर मूगवणीला तसेच कोकणात बय्राच सणांना घाटलं करायची पध्द्त आहे. नेहमीचेच पदार्थ वापरून केलेला अजून एक चविष्ट पारंपारीक प्रकार!


साहित्यः
अर्धी वाटी तांदळाचा रवा, एक वाटी गूळ, एका नारळाचे ओले खोबरे (यातले अर्धी वाटी तसेच वापरायचे आहे आणि बाकीच्याचे दूध काढायचे आहे.), चार वाट्या पाणी, वेलची पावडर, सुंठ पावडर एक चमचा, हळद पाव चमचा, मीठ आणि केशर, एक चमचा तूप.
ghatla
कृती:
ओल्या खोबय्रापैकी अर्धी वाटी बाजूला ठेवा. बाकी खोबय्राचे दूध काढून घ्या, साधारण चार वाट्या दूध निघेल. कढईत एक चमचा तूप घ्या. त्यात अर्धी वाटी रवा घालून मंद आचेवर तांबूस भाजून घ्या. एक वाटी गूळ, अर्धी वाटी ओले खोबरे, मीठ चवीपुरते, हळद, चार वाट्या पाणी हे सर्व एकत्र करा. उकळी काढा. गूळ विरघळला की भाजलेल्या रव्यात ओतून मंद आचेवर ठेवा. रवा शिजत आला की नारळाचे दूध, वेलची पावडर, सुंठ पावडर घालून ढवळा. वरून केशराच्या काड्या घाला.
तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे सैल घट्ट करा. पण घाटलं चमच्याने खाण्या इतपत असते. तांदळाच्या पिठाच्या घावनांबरोबर घाटलं करतात.
माझी आजी प्राजक्ताच्या फुलांची देठं काढून ती सावलीत वाळवत असे. आणि त्या काड्याच केशर म्हणून वापरत असे.
ghatla

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा