कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

कुळीथः विविध पाककृती

कुळीथ यालाच हुलगा असेही म्हणतात. कोकणात भातकापणीनंतर कुळथाची लागवड केली जाते, त्याबरोबर कडवे, पावटे, लाल चवळी, पांढरी चवळी ही कडधान्येही लावली जातात. पण मुख्य पीक मात्र कुळीथ. बय्राच भागात कुळीथ हे माणसांचे अन्न समजले जात नाही. पण कोकणात लावली जाणारी ही पातळ सालीची कुळथाची जात माणसांना खाण्यासाठीच वापरली जाते. लागवडीपासून सुमारे ९० दिवसांत कुळीथ तयार होतो. कुळीथ उष्ण असून आरोग्यदायी आहे. मेद कमी होण्यासाठी आहारात कुळथाचा समावेश करतात. आमच्याकडे मुलगी झाली की कुळथाच्या घुगय्रा करण्याची पध्दत आहे, आणि मुलगा झाल्यावर या कुळथात शेंगदाणे घालतात. असे हे कुळीथ जन्मापासून आवडीचे असल्याने विविध प्रकारांनी आहारात वापरले जातात.
कुळथाचे पिठले सर्वांनाच माहित आहे,  हे पिठले तर आठवड्यातून एकदा होतेच. शेजार पाजारचा कोणी माणूस गेल्यावर घरच्यांना पिठलं भात दिला जातो. म्हणून शक्यतो कुळथाचे पिठले दिवसा करत नाहीत. ज्यानी कुळीथ पाहिले नाहीत त्यांच्यासाठी हा फोटो:

कुळथाचे लाडू:
साहित्यः कुळीथ पीठ दोन वाट्या, किसलेला गूळ पावणे दोन वाट्या, साजूक तूप पाऊण वाटी, वेलची पावडर.
कृती: कुळीथ खमंग भाजून त्याची साले काढून घ्यावीत. ही डाळ दळून आणावी. कुळीथ पीठ कोकणात प्रत्येकाकडे असतेच. हे तयार पीठ आणि किसलेला गूळ एकत्र करावा, नीट मिसळून तूप घालावे. थोडी वेलची पावडर घालावी. खरंतर कुळथाचा वासच इतका खमंग असतो की वेलचीची गरजच नाही. तूप घालून मिश्रण एकत्र करून आवडीनुसार लाडू वळावेत. थंडीच्या दिवसात हे लाडू उत्तम!
माझी आजी जेव्हा ताजे तूप कढवले असेल तेव्हाच हे लाडू करायची, आणि तुपाची बेरी त्यातच घालायची.

कुळथाची उसळः
साहित्यः दोन वाट्या कुळीथ, तीन चमचे तेल, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जीरे, दोन चिमुट हिंग, लाल तिखट, हळद, मीठ, गूळ, ओले खोबरे, कोथिंबिर.
कृती: कुळीथ सकाळी भिजत घालावेत. रात्री उसपून चाळणीवर काढावेत. घट्ट झाकण ठेवावे. सकाळी छान बारीक मोड येतील. निवडून घेऊन कुळीथ कुकरला शिजवून घ्यावेत. शिजताना पाणी थोडे जास्त घालावे. कुळीथ शिजले की हे जास्तीचे पाणी गाळून घ्यावे. सगळे पाणी गाळू नये. ह्या पाण्याचे कळण करणार आहोत. आधी उसळ करून घेऊ. तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करावी. शिजलेले कुळीथ घालावे. चवीनुसार तिखट, मीठ, गूळ घालावा. अर्धी वाटी ओले खोबरे घालावे. गूळ विरघळेपर्यंत शिजवावे. कोथिंबिर घालून पोळीबरोबर खावी. मला ही उसळ नुसतीच खायला आवडते.

कळणः
साहित्यः कुळीथ शिजल्यावर गाळलेले पाणी ३ वाट्या, नारळाचे दूध ४ वाट्या, ताक ४ वाट्या, ७/८ लसूण पाकळ्यांची पेस्ट, एक चमचा मिरचीचे वाटप, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जीरे, हळद.,कोथिंबिर, मीठ, साखर.
कृती: गाळलेले पाणी जेवढे असेल त्याच्या अडीच पट नारळाचे दूध आणि ताक मिळून घ्यावे लागते. हे पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात नारळाचे दूध आणि ताक मिसळावे. लसूण पेस्ट, मीठ, साखर चवीनुसार घालावी. मिरची पेस्ट चवीनुसार मिसळावी. तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करावी, हिंग व्यवस्थित असावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबिर घालावी. कळण जेवण्यापूर्वी अगदी थोडे गरं करावे, नाहीतर फुटण्याची शक्यता असते.
कळणाची चव अप्रतिम लागते. थंडीच्या दिवसात प्यायला खूप छान वाटते.

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

बीट सार





साहित्यः दोन मध्यम बीट, एका नारळाचे खोबरे, एक चमचा आमचूर, चार-पाच चमचे साखर, मीठ, दोन चमचे तूप, जीरे, हिंग, सात-आठ लसूण पाकळ्या बारीक करून, लाल तिखट चवीनुसार, कढीलिंबाची पाच-सहा पाने.



कृती: बीट कुकरला शिजवून घ्या. सालं काढून बीट्चे तुकडे करून मिक्सरला गुळगुळीत वाटून घ्या. नारळाचे दूध काढून वाटलेल्या बीटमध्ये मिसळा. मीठ, साखर, आमचुर, तिखट चवीनुसार मिसळा. बारीक केलेली लसूण मिसळा. गरजे नुसार पाणी घाला. कढीलिंबाची पाने धुऊन थोडी कुस्करून मिश्रणात टाका. तुपाची जीरे, हिंग घालून खमंग फोडणी करा आणि साराला द्या. साराला उकळी काढा, गरमागरम सार भाताबरोबर वाढा.
यात लाल तिखटाऐवजी ओली मिरची वापरायची असल्यास फोडणी करताना त्यात घालावी. लसूण नको असल्यास घालू नये, पण लसणीमुळे बीटचा उग्र वास येत नाही. नुसते प्यायलाही मस्त वाटते.

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

पपईची भाजी

कोकणात पूर्वी खेडेगावात फारशा भाज्या मिळत नसत. आणि विकत आणण्याएवढी परिस्थितीही नसे. मग परसात मिळणाय्रा विविध वस्तूंचा उपयोग करून तोंडीलावणे भागवले जायचे. पावसाळ्यात येणाय्रा विविध रानभाज्या, फणसाचा आठिळा, वाळवलेले गरे,  भोपळ्याची कोवळी पाने असे सर्व भाजीसाठी उपयोगी येत असे. अशाच एका नविन भाजीची रेसिपी पाहूया.
साहित्यः एक कच्चा पपई, तेल, फोडणीचे साहित्य, तिखट, मीठ, गूळ, कढीलिंबाची पाने, खोबरं, कोथिंबिर.
कृती: पपईची साले काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी करून घ्याव्यात. केलेल्या फोडी दहा मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवाव्यात (चीक जाण्यासाठी) कढईत तेल तापत ठेवावे, नेहमीप्रमाणे मोहोरी, हिंग्,हळद घालून फोडणी करावी, लालतिखट घालावे. चिरलेल्या फोडी फोडणीत घालून परताव्या. कढिलिंबाची पाने घालावी.थोडे पाणी घालून झा़कण ठेवावे. फोडी शिजल्या की मीठ, गूळ, ओले खोबरे घालावे. कोथिंबिर घालून सर्व्ह करावी.

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

जाड पोह्यांचा चिवडा

साहित्यः जाड पोहे, तेल, तिखट, मीठ, पिठीसाखर, फोडणीचे साहित्य, शेंगदाणे.
कृती: जाडे पोहे चाळून पोह्यांना तेल चोळून घ्यावे. साधारणपणे पाव वाटी तेल अर्धा किलो पोह्यांना लागेल. तेल लावून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यावेत. अर्धी वाटी तेल घेऊन त्यात शेंगदाणे तळून घ्यावेत. आवडत असल्यास सुक्या खोबर्‍याचे काप तळून घ्यावेत. उरलेल्या तेलात नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात भाजलेले पोहे, शेंगदाणे, चवीनुसार तिखट, मीठ, पिठीसाखर मिसळावी. मंद गॅसवर चिवडा नीट मिक्स करावा. हा चिवडा मस्त लागतो.
.

भडंग

साहित्यः अर्धा कि. चुरमुरे, तीन चमचे मेतकुट, एक चमचा तिखट, चवीनुसार मीठ, दोन तीन चमचे पिठी साखर, शेंगदाणे, कढिलिंब, तेल, फोडणीचे साहित्य.
कृती: चुरमुरे चाळून घ्यावे. त्यात मेतकुट, तिखट, पिठीसाखर, मीठ घालावे. पाव वाटी तेल घालून हे सर्व चुरमुर्‍यांना लावून घ्यावे. कढईत तेल तापत ठेवावे. त्यात शेंगदाणे तळून बाजूला काढावे. साधारण अर्धी वाटी तेल लागेल. याच तेलात नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यावी. कढिलिंबाची पाने घालावी. ती चुरचुरीत झाली की तयार चुरमुरे घालावेत. तळलेले शेंगदाणे घालावेत. मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतावे. पिठीसाखर, तिखट याचे प्रमाण आवडीनुसार घ्यावे.

शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू

साहित्यः एक वाटी दाण्याचे कुट, अर्धी वाटी गूळ, चिमुटभर वेलची अगर जायफळ पावडर, खाण्याचा चमचाभर साजूक तूप.
कृती: शेंगदाणे भाजून सालं काढून कुट करून घ्यावे. कुटाच्या निम्मा गूळ, एक चमचा तूप, वेलची किंवा जायफळ पावडर सर्व मिक्सर मधून थोडे फिरवून एकजीव करून घ्यावे. तूप लाडू वळता यावे यासाठी असते. त्याचे प्रमाण गरजेनुसार कमी जास्त करावे. लाडू वळून मुलांना द्यावे.

नाचणीचे पौष्टिक लाडू

साहित्यः अर्धा कि. नाचणीचे पीठ, एक मध्यम वाटी (अंदाजे १०० ग्रॅम) सुके खोबरे, दोन वाट्या पोहे, १०० ग्रॅम खारीक पावडर, पाव कि. तूप, अर्धा कि. पिठी साखर, वेलची पावडर स्वादानुसार.
कृती: अर्धा कि. नाचणीचे पीठ घ्यावे. अर्धी वाटी तूप बाजूला ठेवून बाकीचे कढईत घ्यावे. त्यामध्ये नाचणीचे पीठ घेऊन बेसनाच्या लाड्वाप्रमाणे भाजून घ्यावे. नाचणीचा रंग मुळात काळपट असल्याने भाजताना खमंग वास सुटेपर्यंत भाजावे. (अंदाजे १० ते १५ मिनिटे) भाजलेले पीठ गार करण्यास ठेवावे. सुके खोबरे किसून खमंग भाजून घ्यावे. पोहे भाजून घ्यावे. खारीक पावडर जरा गरम करावी. भाजलेले सुके खोबरे मिक्सरला भरडसर फिरवावे. भाजलेले पोहे मिक्सरला फिरवून घ्यावे. नाचणीचे पीठ गार झाले की त्यात फिरवलेले सुके खोबरे, खारीक पावडर, पोह्यांचे पीठ मिसळावे. एक चमचा वेलची पावडर मिसळावी. मिश्रण नीट एकत्र करून त्यात पिठीसाखर मिसळावी. लाडू वळताना लगेच तुटतायत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या तुपापैकी लागेल तसे तूप घालावे. साखरेचे प्रमाण आपल्या चवीनुसार बदलण्यास हरकत नाही.
हे लाडू मुलांसाठी उन्हाळ्यात अतिशय उत्तम!! मुलांनाही खूप आवडतात. वरील प्रमाणात साधारणपणे मध्यम आकाराचे ३५ लाडू होतात.
.