कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

कुळीथः विविध पाककृती

कुळीथ यालाच हुलगा असेही म्हणतात. कोकणात भातकापणीनंतर कुळथाची लागवड केली जाते, त्याबरोबर कडवे, पावटे, लाल चवळी, पांढरी चवळी ही कडधान्येही लावली जातात. पण मुख्य पीक मात्र कुळीथ. बय्राच भागात कुळीथ हे माणसांचे अन्न समजले जात नाही. पण कोकणात लावली जाणारी ही पातळ सालीची कुळथाची जात माणसांना खाण्यासाठीच वापरली जाते. लागवडीपासून सुमारे ९० दिवसांत कुळीथ तयार होतो. कुळीथ उष्ण असून आरोग्यदायी आहे. मेद कमी होण्यासाठी आहारात कुळथाचा समावेश करतात. आमच्याकडे मुलगी झाली की कुळथाच्या घुगय्रा करण्याची पध्दत आहे, आणि मुलगा झाल्यावर या कुळथात शेंगदाणे घालतात. असे हे कुळीथ जन्मापासून आवडीचे असल्याने विविध प्रकारांनी आहारात वापरले जातात.
कुळथाचे पिठले सर्वांनाच माहित आहे,  हे पिठले तर आठवड्यातून एकदा होतेच. शेजार पाजारचा कोणी माणूस गेल्यावर घरच्यांना पिठलं भात दिला जातो. म्हणून शक्यतो कुळथाचे पिठले दिवसा करत नाहीत. ज्यानी कुळीथ पाहिले नाहीत त्यांच्यासाठी हा फोटो:

कुळथाचे लाडू:
साहित्यः कुळीथ पीठ दोन वाट्या, किसलेला गूळ पावणे दोन वाट्या, साजूक तूप पाऊण वाटी, वेलची पावडर.
कृती: कुळीथ खमंग भाजून त्याची साले काढून घ्यावीत. ही डाळ दळून आणावी. कुळीथ पीठ कोकणात प्रत्येकाकडे असतेच. हे तयार पीठ आणि किसलेला गूळ एकत्र करावा, नीट मिसळून तूप घालावे. थोडी वेलची पावडर घालावी. खरंतर कुळथाचा वासच इतका खमंग असतो की वेलचीची गरजच नाही. तूप घालून मिश्रण एकत्र करून आवडीनुसार लाडू वळावेत. थंडीच्या दिवसात हे लाडू उत्तम!
माझी आजी जेव्हा ताजे तूप कढवले असेल तेव्हाच हे लाडू करायची, आणि तुपाची बेरी त्यातच घालायची.

कुळथाची उसळः
साहित्यः दोन वाट्या कुळीथ, तीन चमचे तेल, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचा जीरे, दोन चिमुट हिंग, लाल तिखट, हळद, मीठ, गूळ, ओले खोबरे, कोथिंबिर.
कृती: कुळीथ सकाळी भिजत घालावेत. रात्री उसपून चाळणीवर काढावेत. घट्ट झाकण ठेवावे. सकाळी छान बारीक मोड येतील. निवडून घेऊन कुळीथ कुकरला शिजवून घ्यावेत. शिजताना पाणी थोडे जास्त घालावे. कुळीथ शिजले की हे जास्तीचे पाणी गाळून घ्यावे. सगळे पाणी गाळू नये. ह्या पाण्याचे कळण करणार आहोत. आधी उसळ करून घेऊ. तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करावी. शिजलेले कुळीथ घालावे. चवीनुसार तिखट, मीठ, गूळ घालावा. अर्धी वाटी ओले खोबरे घालावे. गूळ विरघळेपर्यंत शिजवावे. कोथिंबिर घालून पोळीबरोबर खावी. मला ही उसळ नुसतीच खायला आवडते.

कळणः
साहित्यः कुळीथ शिजल्यावर गाळलेले पाणी ३ वाट्या, नारळाचे दूध ४ वाट्या, ताक ४ वाट्या, ७/८ लसूण पाकळ्यांची पेस्ट, एक चमचा मिरचीचे वाटप, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जीरे, हळद.,कोथिंबिर, मीठ, साखर.
कृती: गाळलेले पाणी जेवढे असेल त्याच्या अडीच पट नारळाचे दूध आणि ताक मिळून घ्यावे लागते. हे पाणी पूर्ण गार झाल्यावर त्यात नारळाचे दूध आणि ताक मिसळावे. लसूण पेस्ट, मीठ, साखर चवीनुसार घालावी. मिरची पेस्ट चवीनुसार मिसळावी. तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करावी, हिंग व्यवस्थित असावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबिर घालावी. कळण जेवण्यापूर्वी अगदी थोडे गरं करावे, नाहीतर फुटण्याची शक्यता असते.
कळणाची चव अप्रतिम लागते. थंडीच्या दिवसात प्यायला खूप छान वाटते.

२ टिप्पण्या: