कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०१५

बीट सार





साहित्यः दोन मध्यम बीट, एका नारळाचे खोबरे, एक चमचा आमचूर, चार-पाच चमचे साखर, मीठ, दोन चमचे तूप, जीरे, हिंग, सात-आठ लसूण पाकळ्या बारीक करून, लाल तिखट चवीनुसार, कढीलिंबाची पाच-सहा पाने.



कृती: बीट कुकरला शिजवून घ्या. सालं काढून बीट्चे तुकडे करून मिक्सरला गुळगुळीत वाटून घ्या. नारळाचे दूध काढून वाटलेल्या बीटमध्ये मिसळा. मीठ, साखर, आमचुर, तिखट चवीनुसार मिसळा. बारीक केलेली लसूण मिसळा. गरजे नुसार पाणी घाला. कढीलिंबाची पाने धुऊन थोडी कुस्करून मिश्रणात टाका. तुपाची जीरे, हिंग घालून खमंग फोडणी करा आणि साराला द्या. साराला उकळी काढा, गरमागरम सार भाताबरोबर वाढा.
यात लाल तिखटाऐवजी ओली मिरची वापरायची असल्यास फोडणी करताना त्यात घालावी. लसूण नको असल्यास घालू नये, पण लसणीमुळे बीटचा उग्र वास येत नाही. नुसते प्यायलाही मस्त वाटते.

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

पपईची भाजी

कोकणात पूर्वी खेडेगावात फारशा भाज्या मिळत नसत. आणि विकत आणण्याएवढी परिस्थितीही नसे. मग परसात मिळणाय्रा विविध वस्तूंचा उपयोग करून तोंडीलावणे भागवले जायचे. पावसाळ्यात येणाय्रा विविध रानभाज्या, फणसाचा आठिळा, वाळवलेले गरे,  भोपळ्याची कोवळी पाने असे सर्व भाजीसाठी उपयोगी येत असे. अशाच एका नविन भाजीची रेसिपी पाहूया.
साहित्यः एक कच्चा पपई, तेल, फोडणीचे साहित्य, तिखट, मीठ, गूळ, कढीलिंबाची पाने, खोबरं, कोथिंबिर.
कृती: पपईची साले काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी करून घ्याव्यात. केलेल्या फोडी दहा मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवाव्यात (चीक जाण्यासाठी) कढईत तेल तापत ठेवावे, नेहमीप्रमाणे मोहोरी, हिंग्,हळद घालून फोडणी करावी, लालतिखट घालावे. चिरलेल्या फोडी फोडणीत घालून परताव्या. कढिलिंबाची पाने घालावी.थोडे पाणी घालून झा़कण ठेवावे. फोडी शिजल्या की मीठ, गूळ, ओले खोबरे घालावे. कोथिंबिर घालून सर्व्ह करावी.

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०१५

जाड पोह्यांचा चिवडा

साहित्यः जाड पोहे, तेल, तिखट, मीठ, पिठीसाखर, फोडणीचे साहित्य, शेंगदाणे.
कृती: जाडे पोहे चाळून पोह्यांना तेल चोळून घ्यावे. साधारणपणे पाव वाटी तेल अर्धा किलो पोह्यांना लागेल. तेल लावून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यावेत. अर्धी वाटी तेल घेऊन त्यात शेंगदाणे तळून घ्यावेत. आवडत असल्यास सुक्या खोबर्‍याचे काप तळून घ्यावेत. उरलेल्या तेलात नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात भाजलेले पोहे, शेंगदाणे, चवीनुसार तिखट, मीठ, पिठीसाखर मिसळावी. मंद गॅसवर चिवडा नीट मिक्स करावा. हा चिवडा मस्त लागतो.
.

भडंग

साहित्यः अर्धा कि. चुरमुरे, तीन चमचे मेतकुट, एक चमचा तिखट, चवीनुसार मीठ, दोन तीन चमचे पिठी साखर, शेंगदाणे, कढिलिंब, तेल, फोडणीचे साहित्य.
कृती: चुरमुरे चाळून घ्यावे. त्यात मेतकुट, तिखट, पिठीसाखर, मीठ घालावे. पाव वाटी तेल घालून हे सर्व चुरमुर्‍यांना लावून घ्यावे. कढईत तेल तापत ठेवावे. त्यात शेंगदाणे तळून बाजूला काढावे. साधारण अर्धी वाटी तेल लागेल. याच तेलात नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यावी. कढिलिंबाची पाने घालावी. ती चुरचुरीत झाली की तयार चुरमुरे घालावेत. तळलेले शेंगदाणे घालावेत. मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत परतावे. पिठीसाखर, तिखट याचे प्रमाण आवडीनुसार घ्यावे.

शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू

साहित्यः एक वाटी दाण्याचे कुट, अर्धी वाटी गूळ, चिमुटभर वेलची अगर जायफळ पावडर, खाण्याचा चमचाभर साजूक तूप.
कृती: शेंगदाणे भाजून सालं काढून कुट करून घ्यावे. कुटाच्या निम्मा गूळ, एक चमचा तूप, वेलची किंवा जायफळ पावडर सर्व मिक्सर मधून थोडे फिरवून एकजीव करून घ्यावे. तूप लाडू वळता यावे यासाठी असते. त्याचे प्रमाण गरजेनुसार कमी जास्त करावे. लाडू वळून मुलांना द्यावे.

नाचणीचे पौष्टिक लाडू

साहित्यः अर्धा कि. नाचणीचे पीठ, एक मध्यम वाटी (अंदाजे १०० ग्रॅम) सुके खोबरे, दोन वाट्या पोहे, १०० ग्रॅम खारीक पावडर, पाव कि. तूप, अर्धा कि. पिठी साखर, वेलची पावडर स्वादानुसार.
कृती: अर्धा कि. नाचणीचे पीठ घ्यावे. अर्धी वाटी तूप बाजूला ठेवून बाकीचे कढईत घ्यावे. त्यामध्ये नाचणीचे पीठ घेऊन बेसनाच्या लाड्वाप्रमाणे भाजून घ्यावे. नाचणीचा रंग मुळात काळपट असल्याने भाजताना खमंग वास सुटेपर्यंत भाजावे. (अंदाजे १० ते १५ मिनिटे) भाजलेले पीठ गार करण्यास ठेवावे. सुके खोबरे किसून खमंग भाजून घ्यावे. पोहे भाजून घ्यावे. खारीक पावडर जरा गरम करावी. भाजलेले सुके खोबरे मिक्सरला भरडसर फिरवावे. भाजलेले पोहे मिक्सरला फिरवून घ्यावे. नाचणीचे पीठ गार झाले की त्यात फिरवलेले सुके खोबरे, खारीक पावडर, पोह्यांचे पीठ मिसळावे. एक चमचा वेलची पावडर मिसळावी. मिश्रण नीट एकत्र करून त्यात पिठीसाखर मिसळावी. लाडू वळताना लगेच तुटतायत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या तुपापैकी लागेल तसे तूप घालावे. साखरेचे प्रमाण आपल्या चवीनुसार बदलण्यास हरकत नाही.
हे लाडू मुलांसाठी उन्हाळ्यात अतिशय उत्तम!! मुलांनाही खूप आवडतात. वरील प्रमाणात साधारणपणे मध्यम आकाराचे ३५ लाडू होतात.
.

एगलेस चॉकलेट केक

साहित्यः मैदा १५० ग्रॅम, लोणी १०० ग्रॅम्, मिल्कमेड्साठी ( दूध पाऊण ली.+ साखर पाऊण वाटी), १ चमचा बेकींग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, कोको पावडर अडीच चमचे, ५/६ चमचे साखर लागल्यास, दूध अर्धा कप, तूप.
क्रुती: पाऊण ली. दूध + पाऊण वाटी साखर मंद आचेवर आटवावे. मिश्रण मिल्कमेड सारखे झाल्यावर गार करावे. मिक्सरला फिरवून एकजीव करून घ्यावे. मैदा, बेकींग पावडर, खायचा सोडा, कोको पावडर चाळणीने तीन वेळा चाळून घ्यावे. यामुळे सोडा, बेकींग पावडर नीट मिक्स होईल. तयार मिल्कमेड आणि लोणी परातीत घेऊन फेसावे. फेसताना अर्धा कप दूध मिश्रणात घालावे. आता चाळलेला मैदा मिश्रणात मिसळावा. मिश्रण एकजीव करावे. ५/६ चमचे साखर मिसळावी. नॉनस्टीक फ्रायपॅनला तूप लावून घ्यावे. साखर घातल्यावर एकजीव झालेले मिश्रण फ्राय पॅनमध्ये ओतावे. मंद गॅसवर १५ मिनिटे ठेवावे. १५ मिनिटांनी झाकण काढून सुरीचे टोक घालून पहावे. मिश्रण सुरीला चिकटले नाही म्हणजे केक तयार झाला असे समजावे.
काहीना मिल्कमेड्ची गोडी पुरेशी वाटते, त्यांनी वरून साखर घालू नये. साधी साखर वरून घातल्यामुळे ती विरघळली की केकला छान जाळी पडते.
केकवर केलेली आयसिंगची फुले लोणी साखरेची आहेत. नेट्वर शोधून त्याची कृती मिळाली.
.

मुगडाळीचे डोसे


साहित्यः मुगडाळ तीन वाट्या, उडीदडाळ एक वाटी, १०-१२ लसूण
 पाकळ्या, एक इंच आल्याचा तुकडा, मीठ, ७-८ ओल्या मिरच्या.

कृती: मुगडाळ आणि उडीदडाळ स्वच्छ धुऊन ४/५ तास भिजवावी.
 मिक्सरला बारीक वाटून रात्रभर पीठ झाकून ठेवावे.
 स़काळी त्यात आले लसूण मिरची वाटून घालावी. 
चवीनुसार मीठ घालावे.
 आवडीप्रमाणे डोसे घालून नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.
 हे डोसे अतिशय हलके होतात.

जायफळाच्या सालींचे लोणचे आणि मुरांबा

पाककृती देण्यापूर्वी जायफळाचे झाड ज्यांनी पाहिले नसेल त्यांच्यासाठी हा फोटो.
jayfal
ही झाडावर दिसणारी फळे खालच्या बाजूने तडकतात आणि त्यातून जायफळ मिळते. जायफळ, त्यावर कडक आवरण, जायपत्री आणि त्यावर जाड साल असते. हे साल चवीला आंबट असते. त्यामुळे त्यापासून लोणचे, मुरंबा होऊ शकेल असे वाटले म्हणून हा प्रयोग. साली अशा दिसतात.
jayfal
जायफळाचे लोणचे
साहित्यः जायफळाच्या साली अर्धा कि., १०० ग्रॅ. तयार लोणचे मसाला, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी तेल, मोहरी, हिंग, हळद.
कृती: जायफळाच्या सालींचे वरचे जाड आवरण सोलून घ्यावे. आपल्या आवडीप्रमाणे फोडी कराव्या. मीठ लावून अर्धा तास ठेवाव्यात. अर्धी वाटी तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करून गार करण्यास ठेवावी. अर्ध्या तासाने फोडीमध्ये तयार लोणचे मसाला, गार झालेली फोडणी मिसळावी. एक दोन दिवसांनी लोणचे मुरते. याच्या फोडी चावून खाल्ल्यास अगदी कैरीसारख्या लागतात. खरं तर या सालींना जायफळाचा वास येतो. पण लोणच्यात तो जराही जाणवत नाही.
jayfal
जायफळाचा मुरंबा:
साहित्य: जायफळाच्या साली, सालींच्या वजनाएवढी साखर. जायपत्री एक दोन तुकडे.
कृती: जायफळाच्या सालींचे वरचे जाड आवरण सोलून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. तयार फोडी थोडे पाणी घालून कुकरला दोन शिट्या करून वाफवून घ्याव्या. या फोडी शिजल्यावर चाळणीवर ओतून घ्याव्या. त्याचे पाणी आपल्याला पाकासाठी वापरायचे आहे. जेवढ्या फोडी असतील तेवढीच साखर एका जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात घ्यावी. त्यात फोडींचे आलेले पाणी मिसळावे. पाणी साखर बुडेपर्यंत नाही झाले तर थोडे साधे पाणी साखरेत घालून पाक करण्यास ठेवावा. पाकाचा थेंब डिशमध्ये घातल्यावर पसरला नाही की त्यात शिजवलेल्या फोडी घालाव्यात. जायपत्रीच्या एक दोन पाकळ्या घालाव्या (ऐच्छिक. फोडी घातल्यावर पाक परत थोडा सैल होतो. पुन्हा डिशमध्ये घातल्यावर पसरणार नाही एवढा वेळ शिजवावे. गार झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावा. या फोडींना आंबट चव असल्याने मुरंबा मस्त लागतो. आणि जायफळाचा वासही येतो. जायपत्रीही वासासाठीच असते, म्हणून ती घातली पाहिजे असे नाही. या मुरंब्याला सुंदर गुलाबी रंग येतो.
jayfal

कोकम माहिती

कोकण प्रदेश निसर्गाने समृध्द आहे. प्रत्येक ऋतूत विविध फळे, भाज्या, फुले मुबलक प्रमाणात होतात. परंतु सुरवातीला शिक्षणाच्या अभावामुळे किंवा आहे त्यात समाधान मानण्याच्या वृत्तीमुळे कोकणी माणसाने स्वत:च्या उपजिविकेसाठी निसर्गाचा फार वापर केला नाही. आता मात्र परिस्थिती बदलते आहे. उन्हाळ्यात येणार्‍या करवंद, जांभुळ, फणस, आंबा, काजू, कोकम यासारख्या विविध फळांपासून अनेक टिकाऊ पदार्थ मोठया प्रमाणावर बनवले जाऊ लागले आहेत. आधीच्या पिढीतील शेतकरी नैसर्गिकपणे उगवणार्‍या झाडांवरच अवलंबून होता. परंतु आता व्यावसायिकदृष्ट्या या फळ्झाडांची लागवड करून त्यापासून जास्तीतजास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी कोकम या फळाची माहिती देताना कोकण कृषी विद्यापिठाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या माहितीचे संकलन केले आहे.
हे कोकमचे झाड.
kokam
कोकमाची फुले
kokam
लागवडः कोकम फळासाठी उष्ण दमट हवामान व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन लागते. कोकमाची लागवड पावसाच्या सुरवातीला करावी लागते. कोकमामध्ये रोपापसून लागवड केल्यास ५०% नर आणि ५०% मादी झाडे येतात. मादी झाडे जास्त येण्यासाठी त्याची कलमे लावणे आवश्यक आहे. लागवडीमध्ये ९०% मादी झाडे आणि १०% नर झाडे असावीत. कोकण कृषी विद्यापिठाने काही चांगल्या उत्पन्न देणार्‍या जाती विकसित केल्या आहेत. लागवड केल्यावर पहिली दोन वर्षे उन्हाळा व हिवाळयात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते.
कोकमची फळे: फोटो आंतरजालावरून साभार
kokam
कोकमाच्या फळापासून विविध प्रकारे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते. कोकमाच्या फळाची आतून रचना अशी असते.
लेख लिहायला घेतला तेव्हा सिझन संपल्याने हे फोटो मिळू शकले नाहीत.
फोटो आंतरजालावरून साभार.
kokam
कोकम सोलं किंवा आमसुलं: आमसुलांसाठी ताजी, लाल तयार कोकम फळे घ्यावीत. फळांच्या साली आणि आतील गर वेगवेगळे करावे. गराचे वजन करून एक किलो गरासाठी १०० ग्रॅम मीठ घ्यावे. गरात हे मीठ पूर्ण विरघळवून गाळून घ्यावे. सालींचे तुकडे गाळलेल्या रसात रात्रभर बुडवून ठेवतात. सकाळी बाहेर काढून परडीवर निथळत ठेवतात. निथळून आलेला रस झाकून ठेवावा. रस निथळला की साली उन्हात वाळवाव्यात. ही प्रक्रिया सात दिवस केली जाते. यालाच कोकणात फुट देणे असे म्हणतात. सात फुटांची काळीभोर आमसुले कडक उन्हात वाळवून प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये भरली जातात. आमसुलाचे सार, चटणी केली जाते. भाजी आमटीतही त्यांचा वापर केला जातो. आमसुले दोन दोन वर्षे चांगली टिकतात.
kokam
कोकम तेलः विविध पदार्थ तयार करण्यासाठी गर वापरून झाल्यावर कोकमच्या बिया स्वच्छ केल्या जातात. कडक उन्हात वाळवल्या जातात. वाळवल्यानंतर त्यावरचे जाड आवरण काढून टाकतात. त्यानंतर या बिया दळणीयंत्रातून बारीक करून आणतात. उकळत्या पाण्यात टाकून थोडा वेळ उकळवतात. पाणी चांगले उकळून गार झाले की तेल वर येऊन घट्ट होते. यातेलाचे गोळे बनवतात, वाळवतात. कोकम तेल सौंदर्य प्रसाधने, औषधे, साबण यासाठी वापरतात. थंडीत पायाला भेगा पडणे, ओठ फुटणे यावर कोकम तेल रामबाण उपाय आहे. कोकम तेल खाण्यासाठीही वापरतात.
kokam
कोकम सरबत(अमृत कोकम): कोकम सरबतासाठी तयार टणक कोकम फळे झाडावरून उतरवून काढली जातात. ही फळे स्वच्छ करून त्यातील गर, बिया बाजूला करून सालाचे ४/६ तुकडे केले जातात. एक किलो सालांसाठी दोन किलो साखर आणि ५० ग्रॅम मीठ असे प्रमाण घेतले जाते. सालांमध्ये साखर, मीठ एकत्र करून प्लॅस्टीकच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ८ ते १० दिवस ठेवतात. अधुनमधुन हे मिश्रण हलवावे लागते. पूर्ण साखर विरघळल्यावर तयार झालेले अमृत कोकम प्लॅस्टीकच्या बाटलीत किंवा कॅनमध्ये पॅक केले जाते. सरबत करताना १:५ या प्रमाणात पाणी, थोडी जीरे पावडर आणि लागल्यास मीठ मिसळून ताजे सरबत कोणत्याही मोसमात तयार करता येते. कोकम सरबत पित्तशामक आहे.
kokam
कोकम आगळः कोकम आगळ तयार करण्यासाठीही पक्व टणक फळे झाडावरून उतरवून काढली जातात. फळे स्वच्छ धुवून गर, बिया वेगळ्या कराव्या लागतात. सालींचे तुकडे करावेत, साली आणि गर यांचे एकत्रीत वजन करून एक किलोसाठी १५० ते २०० ग्रॅम मीठ घ्यावे. साली आणि गराच्या मिश्रणात मीठ मिसळून चार दिवस झाकून ठेवावे. चार दिवसांनी मिश्रणातील रस गाळून बाटल्यामध्ये भरावा. कोकम आगळची सोलकढी बनवली जाते.
kokam
अशा अनेक गोष्टींसाठी उपयोगी असे हे गुणी फळ मोठ्या प्रमाणात लागवड केल्यास नक्कीच फायदेशीर आहे. आपणही आपल्या घरासमोर अशोकाची झाडे लावून शोभा वाढवतो, त्याऐवजी कोकमची झाडे लावल्यास तीही सरळ वाढतात, आकर्षक दिसतात आणि उत्पन्नही देतात, बघा विचार करून!