कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, ९ जानेवारी, २०१६

मुळयाची पचडी आणि भाजी

या सिझनला लाल माठ, मुळा, नवलकोल अशा पालेभाज्या कोकणात मोठ्या प्रमाणात लावल्या जातात. आमच्याही बागेत सासय्रांनी मुळाभाजी पेरलीय छान कोवळी भाजी आता तयार होऊ लागलीय.
mula
मुळ्याची पचडी
साहित्यः मुळ्याच्या जुड्या दोन, अर्धे लिंबू, दोन्/तीन ओल्या मिरच्यांचे तुकडे, मीठ, साखर, शेंगदाण्याचे कूट पाव वाटी, फोडणीचे साहित्य.
कृती: मुळ्याचा कोवळा पाला स्वच्छ धूऊन घ्यावा. यासाठी मुळ्याचा कंद अजिबात नसलेला किंवा अगदी बारीक कंद असलेला पाला वापरावा. हा मुळ्याचा पाला बारीक चिरून घ्यावा. चिरलेल्या पाल्यात चिमुटभर मीठ घालून हाताने चांगला कुस्करून घ्यावा. दोन चमचे तेल तापत ठेवावे. मोहरी घालावी. मोहरी तडतडली की मिरच्यांचे तुकडे घालावे. मिरच्या थोड्या तळल्या की गॅस बंद करून हिंग, हळद घालावी. ही फोडणी, दाण्याचे कूट, चवीनुसार चमचाभर साखर पाल्यात मिसळावी. अर्धे लिंबू पिळावे. पचडी नीट एकत्र करून चवीनुसार थोडे मीठ घालावे, आपण आधी पाल्यात मीठ घातले आहे. चवीनुसार लिंबू, साखरेचे प्रमाण वाढवण्यास हरकत नाही. एकदम चविष्ट लागते ही पचडी! याच प्रकारे पालकचीही पचडी होते.


मुळ्याची भाजी
साहित्यः तीन जुड्या मुळा, तेल अर्धी वाटी, लाल तिखट, मीठ, साखर, वड्याची/कडबोळ्याची भाजणी एक वाटी, फोडणीचे साहित्य, दोन कांदे, सात/आठ लसूण पाकळ्या. सुक्या मिरच्या चार/पाच
कृती: मुळ्याचा पाला स्वच्छ धुऊन, बारीक चिरून घ्यावा, कांदे आपल्या आवडीप्रमाणे चिरून घ्यावेत, सात/ आठ लसूण पाकळ्या सोलून घ्याव्या. या भाजीला मेथीच्या भाजीसारखेच तेल सढळ हाताने लागते. बेसनापेक्षा भाजणीने खमंगपणा येतो, भाजणी नसल्यास बेसन वापरण्यास हरकत नाही.
कढईत तेल तापत ठेवावे. मोहरी घालावी. मोहरी तडतडली की चिरलेला कांदा, लसूण घालावे. थोडे परतल्यावर लाल मिरच्यांचे तुकडे घालावे. हळद, लाल तिखट घालून परतून घ्यावे. मुळ्याचा चिरलेला पाला फोडणीत घालावा. चांगला परतून झाकण ठेवावे. गॅस मंद ठेवून भाजीला वाफ काढून घ्यावी. दहा मिनिटांनी भाजीला वाफ आली ही चवीनुसार मीठ, साखर घालावी. या भाजीत पाणी अजिबात घालायचे नाही. मीठ, साखर नीट मिसळून घेतल्यावर भाजणी पेरावी. छान परतून झाकण ठेवावे, परत पाच मिनिटे वाफ काढावी. या भाजीला तेल व्यवस्थीत लागते. वाफ आल्यावर भाजी कोरडी वाट्ल्यास वाढण्यापूर्वी वरून फोडणी द्यावी.


याशिवाय नेहमीच्या आमटीलाही मुळ्याच्या पाल्याने मस्त स्वाद येतो.

मुळ्याच्या पाल्याचे मेथीसारखे पराठेही होतात. त्याचा फोटो नाहीय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा