कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

खरवसाची वडी



kharvas
साहित्यः
पहिल्या दिवसाचा चीक दोन वाट्या, साखर दोन वाट्या, वेलची पावडर, दूध दोन वाट्या, केशर, बदामाचे काप.
kharvas
कृती:
पहिल्या दिवसाचा चीक नुसताच शिट्टी न लावता १५ मिनिटे कुकरला वाफवून घ्यावा. गार झाला की भांड्यातून काढून किसावा. मी अर्धा चीक मिक्सरला फिरवून घेतला. जेवढा चीक असेल तेवढी साखर, चीक आणि दूध कढईत एकत्र करावे.
kharvas
मध्यम आचेवर मिश्रण ढवळत रहावे. एकजीव झाले की वेलची पावडर आणि केशर मिसळावे.
kharvas
ताटाला तूप लावावे. मिश्रणाचा गोळा होत आला की ताटात थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. हवे असल्यास बदामाचे काप सजावटीसाठी लावावे.
kharvas
गोडीला कमी हवे असेल तर साखरेचे प्रमाण कमी घ्यावे. पूर्वी मुंबईकर मंडळींना लगेच चिकाचे दूध पाठवता येत नाही, म्हणून अशा वड्या करून खरवस पोहोचवला जायचा.

पोह्यांची उकड

पोहे हे आम्हा कोकणीमाणसांचा जीव की प्राण! कोणताही समारंभ पूर्ण होतच नाही पोह्यांशिवाय. जसे पोह्यांचे वेगवेगळे प्रकार होतात तशीच पोह्यांची उकडही मस्त लागते.
साहित्यः


 दोन वाट्या जाडे पोहे, दोन वाट्या ताक, दोन हिरव्या मिरच्या, कढिलिंबाची पाने, दोन चमचे तूप, एक चमचा जीरे, दहा बारा लसूण पाकळ्या, थोडं आलं किसून, मीठ, चिमुटभर हळद.
कृती:
 पोहे धुवावेत. धुतलेले पोहे आणि जरूरीनुसार ताक घालून मिक्सरवर फिरवून घ्या. अगदी गुळगुळीत करू नका. कढईत तूप घालून तापत ठेवा. त्यात जीरे, मिरचीचे तुकडे, सोललेल्या लसूण पाकळ्या घाला. लसूण चांगली तांबूस होऊद्या. तोपर्यंत तयार मिश्रणात मीठ, हळद मिसळून घ्या.लसूण तळली की कढीलिंबाची पाने घाला. आता तयार मिश्रण फोडणीत ओता. उरलेले ताक घाला. किसलेले आले घाला. गरजेनुसार पाणी घाला. ढवळून एक वाफ काढा.  गरमागरम उकडीवर साजूक तूप घालून खा.

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

नवलकोलची भाजी

साधारणपणे भात कापणीनंतर कोकणात लाल माठ, मुळा, नवलकोल, गावठी मिरच्या इत्यादी भाज्या लावल्या जातात. याच सिझनला त्या मिळतात. 

साहित्यः
 दोन जुड्या नवलकोल, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, दोन/तीन सुक्या लाल मिरच्या, तिखट, मीठ, गूळ, ओले खोबरे(ऐच्छीक).
कृती:
नवलकोलच्या कांद्यांवरील कोवळी पाने काढून धुऊन बारिक चिरावीत. कुकरला दोन शिट्या करून घ्याव्या. नवलकोलच्या कांद्याची साले काढून आपल्या आवडीप्रमाणे फोडी कराव्या. नेहमीप्रमाणे फोडणी करावी, फोडणीत सुक्या मिरच्या घालाव्या. त्यावर चिरलेल्या फोडी टाकून थोडे पाणी घालून शिजवून घ्याव्या. फोडी शिजल्या की चवीनुसार तिखट, मीठ, गूळ घालावे. शिजलेली पाने मिक्स करावीत. आवडत असल्यास थोडे ओले खोबरे घालावे. गरमागरम पोळीबरोबर भाजी फस्त करावी. या भाजीत फोडीबरोबर पानेही घातल्याने भाजी छान लागते
.

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

घाटलं!!

गौरी गणपतीला, शेतकापणी झाल्यावर मूगवणीला तसेच कोकणात बय्राच सणांना घाटलं करायची पध्द्त आहे. नेहमीचेच पदार्थ वापरून केलेला अजून एक चविष्ट पारंपारीक प्रकार!


साहित्यः
अर्धी वाटी तांदळाचा रवा, एक वाटी गूळ, एका नारळाचे ओले खोबरे (यातले अर्धी वाटी तसेच वापरायचे आहे आणि बाकीच्याचे दूध काढायचे आहे.), चार वाट्या पाणी, वेलची पावडर, सुंठ पावडर एक चमचा, हळद पाव चमचा, मीठ आणि केशर, एक चमचा तूप.
ghatla
कृती:
ओल्या खोबय्रापैकी अर्धी वाटी बाजूला ठेवा. बाकी खोबय्राचे दूध काढून घ्या, साधारण चार वाट्या दूध निघेल. कढईत एक चमचा तूप घ्या. त्यात अर्धी वाटी रवा घालून मंद आचेवर तांबूस भाजून घ्या. एक वाटी गूळ, अर्धी वाटी ओले खोबरे, मीठ चवीपुरते, हळद, चार वाट्या पाणी हे सर्व एकत्र करा. उकळी काढा. गूळ विरघळला की भाजलेल्या रव्यात ओतून मंद आचेवर ठेवा. रवा शिजत आला की नारळाचे दूध, वेलची पावडर, सुंठ पावडर घालून ढवळा. वरून केशराच्या काड्या घाला.
तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे सैल घट्ट करा. पण घाटलं चमच्याने खाण्या इतपत असते. तांदळाच्या पिठाच्या घावनांबरोबर घाटलं करतात.
माझी आजी प्राजक्ताच्या फुलांची देठं काढून ती सावलीत वाळवत असे. आणि त्या काड्याच केशर म्हणून वापरत असे.
ghatla