कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

कोबीची पचडी

साहित्यः
 एक मध्यम कोबीचा गड्डा, एक डाळींब लहान, एक लिंबू, ओल्या मिरच्या चार, कोथिंबीर, मीठ, साखर, दोन चमचे तेल, मोहोरी, हिंग, हळद.
कृती:
 कोबी धुवा आणि किसून किंवा फूडप्रोसेसरला आपल्या आवडीनुसार जाड बारीक करा. डाळींब सोलून घ्या. कोबीच्या किसावर लिंबू पिळा, एक चमचा साखर, मीठ घाला. व्यवस्थित एकत्र करा. तेल तापत ठेवा. मोहोरी पाव चमचा घाला. तडतडली की मिरच्यांचे तुकडे घाला. गॅस बंद करून हिंग हळद घाला. तयार फोडणी कोबीच्या मिश्रणावर घाला. नीट एकत्र करा. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घाला. आता डाळींब दाणे घालून हलक्या हाताने मिसळा.
आमच्याकडे थोडी आंबट आवडते पचडी, मी दाण्याचे कूट घालत नाही.




शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

आल्याची वडी


साहित्यः
आलं किसून एक वाटी, साखर एक वाटी, सायीसह दूध किंवा नुसते दूध अर्धी वाटी

कृती:
आलं स्वच्छ धुवावे. सालं काढून किसून घ्यावे.किसल्यावर मिक्सरला फिरवावे. आधी मिक्सरला फिरवले तर दोर रहातात. जेवढा आल्याचा कीस तेवढी साखर आणि त्याच्या निम्मे सायीसकट दूध घ्यावे. मिश्रण कढईत एकत्र करून मंद गॅसवर ढवळत रहावे.
गोळा होत आला की खाली उतरून घोटावे. ताटाला तूपाचा हात लावून त्यात मिश्रण थापावे. वड्या पाडाव्यात.
साखरेचे प्रमाण आल्याच्या तिखटपणावर वाढवावे. मी या वड्या थोड्या जास्त सुकवल्यात कारण ओल्या राहिल्या तर जास्त टिकत नाहीत. सायीसह दूध वापरल्याने आल्याचा तिखटपणा कमी येतो.

सालासह मुगाचे लाडू

साहित्यः
 दोन वाट्या सालासह हिरवे मूग, एक वाटी डाळं, एक वाटी पोहे, एक वाटी सुकं खोबरं, पिठीसखर दोन वाट्या, साजूक तूप एक वाटी, बेदाणे, वेलची पावडर.


कृती:
 मूग मंद आचेवर तांबूस भाजून घ्यावेत. भाजलेले मूग आणि डाळं एकत्र रवाळ दळून आणावं. सुकंखोबरं किसून भाजावे. कढईत पोहे घालून तेही भाजून घ्यावेत. आता कढईत तूप घ्यावे. तूप आधी थोडे वगळावे, लागेल तसे घ्यावे. तूपात भाजलेले मूगाचे पीठ घेऊन मंद आचेवर भाजावे. तांबूस खमंग भाजावे. गार करायला ठेवावे. भाजलेले पोहे मिक्सरला रवाळ दळावे. हे पीठ भाजलेल्या मूगाच्या पिठात मिसळावे. पिठीसाखर मिसळा. वेलची पावडर मिसळावी. गरज असेल तर साखरेचे प्रमाण वाढवावे. बेदाणे लावून लाडू वळावेत.