कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

मुटके गवार भाजी:

मुटके गवार भाजी:
साहित्य: गवार अर्धा की, एक चमचा कांदा लसूण मसाला, दोन कांदे, ओलं खोबरं अर्धी वाटी, पांढरे तीळ दोन चमचे, दोन टेबल स्पून तेल, पाव चमचा मोहोरी, पाव चमचा हळद, दोन चमचे साखर, मीठ, लाल तिखट अर्धा चमचा.
मुटके: तीन चमचे कणिक, दोन चमचे रवा, दोन चमचे बेसन, अर्धा चमचा जीरं पावडर, धने पावडर अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, मीठ, तीळ एक चमचा, खायचा सोडा पाव चमचा, हळद पाव चमच

कृती:  गवार मोडून तुकडे करून स्वच्छ धुवावी. चाळणीत ठेवून वाफवावी. मुटके करायचं सर्व साहित्य एकत्र करावं. पाणी घेऊन कणिक भिजवतो तसं पीठ भिजवावं. तेलाचा हात घेऊन लांब गोल  मुटके करावेत. चाळणीत ठेवून दहा मिनिटं वाफवून घ्यावेत.
कांदा चिरावा. कढईत तेल तापवावे. मोहोरी घालावी, तडतडली की तीळ घालावे. कांदा घालून छान परतावा. मग हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालून परतावं. वाफवलेली गवार घालावी. मीठ, साखर घालून नीट मिक्स करावे. वाफवलेले मुटके गोल कापून तेही यात घालावे. ओलं खोबरं घालून छान वाफ आणावी. ही भाजी परतून छान लागते.

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

आयता किंवा घावन आणि दूध गूळ:

झटपट आयत्यावेळी करायचा आयता किंवा घावन आणि दूध गूळ:
साहित्य: तांदळाचं पीठ, पाणी , मीठ, तेल
एक वाटी दूध , एक चमचा गूळ, वेलची पावडर, केशर काड्या
कृती: घावन हे साधारणपणे घाटल्याबरोबर करतात.
आमच्याकडे मात्र  दूध गूळ आणि आयते (घावन)  नाश्त्याला करतात. फार तयारी न करता झटपट आयत्यावेळी होणारे  म्हणून आयते!
एक भांड्यात तांदळाचे एक वाटी पीठ घ्या, त्यात मीठ घाला. आणि आता पाणी एवढे घालायचे की तव्यावर घातल्यावर आपोआप पसरेल. अति पातळ नको पण धिरड्यापेक्षा  थोडे सरसरीत! दुधात गूळ घालून चव बघा लागला तर वाढवा. बाकी त्यात वेलची पावडर , केशर हे उगाच शाही वाटायला हवं ना!
बिडाचा तवा तापत ठेवा. तापल्यावर तेल लावा. आता त्यावर आयत्याचे पीठ घाला. हे पीठ परत पळीने पसरायचा प्रयत्न करू नका, चिकटून येईल. दोन मिनिटं झाकण ठेवा. झाकण काढून दुसरी बाजू भाजा, आणि दूध गूळ आयता सर्व्ह करा. यासोबत चटणी, सॉस ही घेऊ शकता. आयता अतिशय जाळीदार होतो.
तांदूळ धुवून पीठ करतात यासाठी पण तयार असेल तेही चालेल.