कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

टॉमेटोचा चटका


ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे, झटपट सोपी!
कधी कधी भाजी आणायची राहून जाते अचानक पाहुणे येतात अशावेळी ही पटकन होणारी चविष्ट भाजी नक्की करून पहा!
साहित्य: 8 पिकलेले टॉमेटो, एक टेबलस्पून शेंगदाणे कूट, एक टेबलस्पून ओलं खोबरं, दोन कांदे( ऐच्छिक), कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट एक टीस्पून (मिरचीच्या तिखटपणावर अवलंबून), पाच ओल्या मिरच्या, गूळ एक टीस्पून, मीठ, तेल  एक टेबलस्पून, मेथी दाणे दहा/बारा, मोहोरी पाव टीस्पून, हळद पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून
कृती: टॉमेटो धुवून त्याच्या कोशिंबीरीसाठी करतो त्यापेक्षा थोडया मोठ्या फोडी करा, बिया काढून टाका. मिरच्या धुवून आवडीप्रमाणे तुकडे करा. कढईत तेल तापत ठेवा. तेल तापलं की मोहोरी घालून ती तडतडली की मेथी दाणे घाला. मिरचीचे तुकडे घालून परता. कांदा घालणार असाल तर आत्ता घालून परतून घ्या. हळद, हिंग घालून परता. टॉमेटो फोडी घालून  दोन मिनिटं परता. आता त्यात गूळ, मीठ, दाण्याचं कूट, ओलं खोबरं घाला. अर्धी वाटी पाणी घाला. गूळ विरघळला की चव बघा, मिरचीचा तिखटपणा आला नसेल तर तिखट किंवा कांदा लसूण मसाला घाला. एक उकळी आली की गॅस बंद करा.
टीप: चटका म्हणून यात मिरच्या असल्या तरी लाल तिखट लागतं, हल्ली ज्या मिरच्या मिळतायत त्या अजिबात तिखट नसतात.
आत्ता गणपती असल्याने मी कांदा आणि कांदा लसूण मसाला घातला नाही पण त्याने चव चांगली येते.
✍🏻 मीनल सरदेशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा