कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ४ जुलै, २०१७

तोंडल्याचे भरीत:

साहित्य:
पाव की तोंडली, एक वाटी दही, दोन चमचे मेतकूट, थोडी कोथिंबीर, दोन ओल्या मिरच्या, मीठ, साखर, दोन चमचे तूप, चिमुटभर हिंग, जिरे
कृती:
तोंडली स्वच्छ धुवावीत. काचऱ्या करून। पाण्यात टाकाव्यात. सकाळीच एक वाटी दही लावावे. चिरलेल्या काचऱ्या कुकरला शिजवून घ्याव्यात. चाळणीवर घालून पाणी काढून टाकावे. तूपाची हिंग जिरे आणि मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी. सजलेल्या काचऱ्या बाऊलमध्ये काढाव्यात. त्यात चवीनुसार मीठ, थोडी साखर , दोन चमचे मेतकूट आणि धुवून बारीक चिरलेली कोंथिबीर घालावी. दही घालावे. वरून तयार फोडणी द्यावी. नीट मिक्स करावे. अशा प्रकारे पडवळ, दुधीचे पण भरीत छान लागते.

दडपे पोहे:

साहित्य:
 पाव की पातळ पोहे, तीन मध्यम कांदे, अर्ध लिंबू, एक चमचा साखर, मीठ, दोन तीन ओल्या मिरच्या, सांडगी मिरच्या तीन, कोंथिबीर , अर्धा नारळ, अर्धी वाटी तेल, दोन टॉमेटो, फोडणीचे साहित्य

कृती:
पातळ पोहे चाळून मंद गॅसवर छान भाजून घ्या. तेल तापत ठेवा. तापले की सांडगी मिरची तळून घ्या. आता मोहोरी, हिंग, मिरचीचे तुकडे, हळद , घालून फोडणी करा. त्यात भाजलेले पोहे घालून छान परता. मीठ, साखर घाला. गॅस बंद करा. नारळ खवून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. कांदे बारीक चिरा. टॉमेटो चिरा. आता पोह्यात कांदा, कोथींबीर, खवलेला नारळ, लिंबाचा रस, चुरलेली सांडगी मिरची घालावी. नीट मिक्स करावे. ह्यात पापडही छान लागतो. खायला देताना टॉमेटो घालावा. सांडगी मिरची तळून, कुस्करून पोह्यात घातली की छान खमंग लागतात पोहे!

आंबा वडी:

साहित्य: 
आटवलेला आंब्याचा रस एक वाटी, साखर दीड वाटी, वेलची पावडर चिमुटभर

कृती: 
कोकणात उन्हाळ्यात खूप आंबे होतात. तेव्हा मोठया परातीत आंब्याचा रस घेऊन लांब दांड्याच्या लाकडी उलथ्याने ढवळून आटवला जातो. घट्ट होत आला त्यात थोडी साखर घातली जाते. गार झाल्यावर या रसाचे गोळे हवाबंद डब्यात ठेवतात. वर्षभरात केव्हाही वापरता येतात. 
एक कढईत साखर घ्यावी. त्यात वाटीभर पाणी घालून पाक करायला गॅसवर ठेवावे. गोळीबंद पाक करावा. एक वाटीत पाणी घ्यावे. त्यात पाक एक दोन थेंब घालावा. पाकाची गोळी होते का पहावी. पाकाची गोळी झाली की गॅस बंद करावा. त्यात एक वाटी आटवलेला रस घालून घोटावे. हवी असल्यास वेलची पावडर घालावी. कारण वड्याना आंब्याचा सुंदर स्वाद येतो. ताटाला तुपाचा हात लावावा. घोटून गोळा झाला की ताटात थापावे, आणि आवडीप्रमाणे वड्या कापाव्यात.

उपवासाचे आप्पे

साहित्यः 
दोन वाट्या वरी तांदूळ, अर्धी वाटी साबुदाणा, मिरची पेस्ट, आले पेस्ट, जिरे पावडर, कोथिबिर, दाण्याचे कूट, मीठ, खायचा सोडा, तेल किंवा तूप.

कृती:
 आप्पे करायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी वरी तांदूळ आणि साबुदाणा वेगवेगळे भिजत घालावे. ७-८ तासांनी दोन्ही एकत्र मिक्सरवर वाटावे. मिश्रण इडलीच्या पिठाइतपत असावे. रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी आप्पे करण्यापूर्वी या मिश्रणात अर्धा चमचा आले पेस्ट, अर्धा चमचा मिरची पेस्ट (आवडीनुसार प्रमाण घ्यावे.), मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, २-३ चमचे दाण्याचे कूट, चिरलेली कोथिंबिर मिसळावी. पाव छोटा चमचा खायचा सोडा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. आप्पेपात्रात नेहमीच्या आप्प्याप्रमाणे आप्पे करावे. नारळाच्या दही घातलेल्या सैलसर चटणीसोबत खावे.



साबुदाणा खीर/ लापशी

साहित्य: एक वाटी भिजवलेला साबुदाणा, अर्धा ली दूध, ५/६ चमचे साखर , चिमुटभर वेलची पावडर.

कृती: 
खिचडीसाठी साबुदाणा भिजवलेला असेलच. त्यातला एक वाटी छान भिजलेला साबुदाणा एका पातेल्यात घ्या. त्यात अर्धा ली दूध मिसळा. पाच सहा चमचे साखर घाला. मिश्रण नीट ढवळून गॅसवर ठेवा. छान उकळी काढा. ढवळत रहा. साबुदाणा शिजला की पारदर्शक होतो. आता त्यात वेचची पावडर घाला आणि झटपट डिश सर्व्ह करा. साबुदाणा दूध साखर यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार बदला. गोड, दाट, पातळ जसे हवे तसे!

सोमवार, १९ जून, २०१७

श्रीखंडाच्या वड्या:

साहित्य:
चक्का एक वाटी, साखर दीड वाटी, केशर काड्या, किंवा केशर सिरप , वेलची पावडर

कृती:
रात्री सुती फडक्यात दही बांधून त्यातील पाणी जाण्यासाठी टांगून ठेवावे. तयार चक्का वाटीने मोजून घ्यावा. एक वाटी चक्का आणि दीड वाटी साखर एका कढईत घ्यावे. नीट एकत्र करावे. मंद गॅसवर ढवळत राहावे. पाच सहा केशराच्या काड्या दुधात भिजवून किंवा अर्धा चमचा केशर सिरप मिश्रणात घालावे. ढवळत रहावे. पाव चमचा वेलची पावडर घालावी. घट्ट होऊ लागले की खाली उतरावे. ताटाला तूप लावावे. खाली उतरून गोळा होईपर्यंत घोटावे. इथे खूप संयम लागतो. (बरेचदा पिठी साखर मिसळुन काम सोपे केले जाते, पण त्यामुळे वडी खूप गोड होते.) घोटून गोळा झाला की तूप लावलेल्या ताटात थापावा. आवडीनुसार वड्या पाडाव्यात. आंबट गोड वडी छान लागते!!

निविगऱ्या( निर्विघ्न):



निविगऱ्या( निर्विघ्न):

साहित्य:
मोदकाची उकड, हिरव्या मिरच्या पाच सहा वाटून, मूठभर कोथींबीर बारीक चिरून, मीठ लागल्यास, थोडं जिरं पावडर., हळद हवी असल्यास

:
कृती
आमच्याकडे सहसा मोदक करतानाच निविगऱ्या करण्यासाठी जास्त उकड काढली जाते. पण वेगळी काढायची तर दोन वाट्या पाणी कढईत उकळू द्या. त्यात चवीला मीठ आणि दोन चमचे लोणी घाला. पाणी उकळले की त्यात दोन वाट्या तांदूळ पिठी घालून नीट मिसळा. मंद गॅसवर छान वाफ येऊ द्या. मिरच्या धुवा आणि वाटून घ्या. कोंथिबीर धुवा आणि बारीक चिरा. उकड जरा गार झाली की त्यात मिरची, कोथींबीर, जिरे पावडर चिमुटभर मिसळा. आता वड्यासारखे गोल थापा, दुमडा. चाळणीत केळीचे पान ठेवून त्यात तयार निविगऱ्या ठेवा. मोदकासारखे वाफवा. लोणी, मिरचीचे लोणचे किंवा नुसतेही छान लागते. उकड उरली तर ती संपवायचा हा चविष्ट मार्ग!!