कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, १३ जानेवारी, २०१६

काळ्या तिळाच्या गूळ पोळ्या (संक्रांत स्पेशल)

संक्रांत जवळ आलीय, म्हणून पोळ्यांची कृती आधीच देतेय. बघा या संक्रांतीला या पध्द्तीने पोळ्या करून! माझ्या माहेरी गूळ पोळ्यांसाठी काळे तीळ वापरायची पध्दत आहे या पोळ्या जास्त खमंग लागतात. काळे तीळ म्हणजे लांबडे कारळे तीळ नव्हे, पांढय्रा तिळांसारखे दिसतात ते.
साहित्यः अर्धा कि.गूळ, दीड वाटी काळे तीळ, पाव वाटी दाण्याचे कूट, एक मध्यम वाटी सुके खोबरे, अर्धी वाटी खसखस, एक वाटी बेसन, 1/2 वाटी तेल, वेलची पावडर. हे सारणाचे साहित्य.

पारीसाठी साहित्यः अडीच वाट्या मैदा, दोन वाट्या कणिक,  1/2 वाटी बेसन, 4 चमचे तेल, मीठ. लाटण्यासाठी तांदूळ पिठी 

कृती: पारीसाठी: मैदा, कणिक, चाळून घ्या. त्यात मीठ घाला. ४ चमचे तेल गरम करून पिठात घाला. पीठ घट्ट मळून, झाकून ठेवा.
सारणासाठी: गूळ किसून घ्या. खोबरे किसून घ्या. बेसनात पाववाटी तेल घालून बेसन तांबूस रंगावर भाजून गार करायला ठेवा. तीळ, खसखस,शेंगदाणे खोबरे वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्या. तेलावर भाजलेले बेसन, तीळ, खोबरे, दाण्याचे कूट, खसखस हे सर्व गुळात नीट मिसळून घ्या.


पिठाची आणि तयार सारणाची सारखी गोळी करून घ्या. पिठाला वाटीचा आकार देऊन त्यात सारण भरून वाटी बंद करा.


तांदुळाच्या पिठीवर पोळी लाटावी. यापोळीची एक काळजी घ्यावी लागते, पोळी भाजताना मध्यम आचेवर भाजावी. तिळाच्या रंगामुळे पोळी करपलेली लक्षात येणार नाही.
मस्त तुपाच्या गोळ्याबरोबर पोळीचा आस्वाद घ्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा