कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

रविवार, २४ जानेवारी, २०१६

शेवग्याचे सार

शेवग्याच्या शेंगाना डांबेही म्हणतात. शेवग्याच्या पानांची, फुलांचीही भाजी करतात. शेवग्याच्या शेंगा पिठलं, आमटी यात वापरतात पण आज मी तुम्हाला खास थंडीत करण्यासारख्या साराची कृती सांगतेय.
shevga
फोटो आंतर्जालावरून साभार
साहित्यः १० शेवग्याच्या शेंगा, अर्ध्या ओल्या नारळाचे खोबरे, एक चमचा आमचुर, मीठ, साखर, दोन चमचे तूप, जीरे, हिंग चिमुटभर, ओल्या मिरच्या दोन तीन, कढीलिंबाची ७/८ पाने.
कृती: शेंगांचे बोटभर लांबीचे तुकडे करून त्यात थोडे पाणी घालून शिजवून घ्यावेत. गार झाल्यावर चमच्याने त्यातील गर, बीया काढून घ्याव्या. शेवग्याच्या बिया टणक असतील तर त्या घेऊ नयेत. काढलेल्या गरात शिजवताना घातलेले पाणी आणि एक चमचा आमचूर घालून मिक्सरला फिरवून घ्यावे. ओल्या खोबय्रात एक वाटीभर पाणी घालून दूध काढून घ्यावे, दोन तीन वेळा खोबरे पाणी घालून फिरवून सर्व दूध गाळून शेवग्याच्या गरात मिसळावे. त्यात कढीलिंबाची पाने घालावीत. कढीइतपत पातळ करावे, लागल्यास थोडे पाणी घालावे. चवीनुसार मीठ, साखर घालावे. तूपाची हिंग, जीरे आणि मिरच्या तुकडे घालून फोडणी करावी आणि साराला द्यावी. हे सार उकळले तरीही फुटत नाही. शेवग्याचा वास आवडणाय्राना नक्की आवडेल. थंडीत गरमागरम प्यायला मस्त वाटते.
साधारणपणे एक वाटी गरासाठी अर्ध्या नारळाचे दूध लागते. आवडत असल्यास वरून कोथिंबीर घालावी.

२ टिप्पण्या: