कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

नारळाच्या दुधातील खरवस

नारळाच्या दुधातील खरवस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make KHARVAS Recipe in Marathi )

  • पहिल्या दिवसाचा चीक एक वाटी
  • नारळाचं दूध सव्वा वाटी
  • गूळ पाऊण वाटी
  • जायफळ पावडर पाव टीस्पून
  • केशर काड्या
  • न वाट्या ओलं खोबरं मिक्सरला पाणी घालून फिरवा
  • गाळण्याने दूध गाळून घ्या.
  • एक वाटी चिकात सव्वा वाटी दूध मिसळा.
  • गूळ बारीक चिरून घ्या.
  • आधी अर्धी वाटी मिसळून चव बघा.
  • गोड पुढे लागेल असा गूळ हवा.
  • लागला तर अजून घाला.
  • एका डब्यात मिश्रण ओता.
  • जायफळ पावडर केशर काड्या घाला.
  • कुकरमध्ये खाली पाणी घालून प्लेट ठेवा.
  • डबा झाकण लावून ठेवा.
  • शिट्टी काढून 15 मिनिटं वाफवा.
  • गार किंवा गरम सर्व्ह करा.

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८

आल्याचा गुळाम्बा

आल्याचा गुळाम्बा:
थंडी सुरू झाली आल्याच्या वड्या आठवतात. प्रत्येक ऋतूत प्रत्येक प्रदेशात काही वेगळं केलं जातं.
आता हा गुळाम्बा पहा, झटपट होतो आणि टिकतोही!
साहित्य: आलं आणि गूळ
कृती: आलं स्वच्छ धुवून घ्या. त्याची सालं काढून किसणीवर किसून घ्या. शक्यतो किसूनच घ्या म्हणजे त्यातले दोर किसणीवर राहतात ते फ्रीजमध्ये ठेवा आणि चहात वापरा.
आल्याचा कीस वाटीने मोजा. एक वाटीला दीड वाटी या प्रमाणात बारीक चिरलेला गूळ मिक्स करा. अर्धा तास तसंच ठेवा. आल्याला पाणी सुटेल. आता पातेलं गॅसवर ठेवून द्या. उकळू द्या. गूळ विरघळला की थेंब डिशमध्ये टाकून पसरत नाही ना पहा. आता उतरून गार झाला की काचेच्या बरणीत भरून ठेवा. थंडीत चमच्याने घेऊन खाऊ शकता.
आल्याच्या तिखटपणावर गूळ कमी जास्त करा.

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

पाडवा स्पेशल... दिव्यांची मिठाई

साहित्य:

 एक वाटी काजूगर, अर्धी वाटी साखर, दोन टीस्पून कोको पावडर, वातींसाठी अर्धी वाटी काजूगर, पाव वाटी साखर केशरी रंग, दिव्यातील तूप म्हणून व्हाईट चॉकलेट कंपाउंड, थोडं दूध, सिल्व्हर बॉल्स


कृती:
 दिव्यासाठी च्या काजूची पावडर करा. त्यात कोको पावडर मिसळून घ्या.कढईत अर्धी वाटी साखर घ्या. त्यात पाव वाटी पाणी घाला. साखर विरघळू द्या. आता त्यात तयार काजू पावडर मिसळून ढवळत रहा. घट्ट होऊ लागलं की खाली उतरून घोटत रहा. गोळा झाला की ताटात काढून मळा. छोटा गोळा घेऊन दिव्याचा आकार द्या. सगळे दिवे करून घ्या.

आता वाती साठी काजू पावडर करा. अगदी तजोड खायचा रंग किंवा केशर सिरप घ्या. कढईत पाव वाटी साखर घ्या.थोडं पाणी घाला. साखर विरघळली की त्यात तयार पावडर आणि रंग मिसळा. दोन मिनिटं ढवळून खाली उतरवा. घटून गोळा करा. वाती तयार करून घ्या. आता एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळवा. दुसऱ्या छोट्या भांड्यात व्हाईट चॉकलेट कंपाऊंडचे तुकडे घ्या. अगदी थोडं दूध घाला. उकळत्या पाण्यात भांडं धरून चॉकलेट वितळवून घ्या. डबल बॉयलर पद्धतीने! आता तयार दिव्यात पटापट चॉकलेट घाला. जरा घट्ट झालं की तयार वाती उभ्या करा.

मस्त वेगळी दिवाळी स्पेशल मिठाई तयार आहे!

तमळी( कढीचा एक प्रकार):



तमळी( कढीचा एक प्रकार): 

माझ्या माहेरच्या शेजारी एक प्रभाकाकू आहे. ती काही काही पदार्थ खूप सुंदर करायची. ही तिचीच रेसीपी! तमळी केली की ती हमखास माझ्यासाठी ठेवत असे. सुंठ आणि मेथी याचं मस्त कॉम्बिनेशन आहे तमळी!

साहित्य: पाऊण ली ताक, पाव ली पाणी, एक टेबलस्पून डाळीचं पीठ, चार टीस्पून सुंठ पावडर, दीड चमचा मेथी, दोन चमचे तूप, पाव चमचा जीरं, पाव चमचा हिंग, पाच सुक्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, मीठ, साखर चार टीस्पून, कढीलिंब पानं.

कृती: या तमळीचं वैशिष्ट्य म्हणजे याची फोडणी ती मातीच्या खापरात करायची. मातीचं भांडं गरम करा. त्यात तूप घाला. मेथी दाण्यांपैकी एक चमचा दाणे तळून बाजूला ठेवा. तळलेल्या मेथीची पावडर करून घ्या.गॅस बंद करा. पाण्यात डाळीचं पीठ आणि सुंठ पावडर आणि मेथी पावडर नीट कालवून घ्या. आता त्यात ताक मिसळा. मीठ, साखर घाला. कढीलिंब पानं घाला. सगळ्यात वर लाल तिखट पसरून घालून ठेवा, ढवळू नका. आता खापरात उरलेल्या तुपात जीरं, मेथी दाणे, सुक्या मिरच्या, हिंग अशी फोडणी करा. ही फोडणी त्या लाल तिखटावर घाला. ती ते खापर पण तमळीत बुडवायची. चर चर आवाज यायचा. तिखटावर अशी फोडणी घातली की तिखट जळत नाही. आता आपली तमळी तयार आहे. जेवताना गरम करा. या दिवसांत तमळी प्यायला मस्त वाटते. मेथी आणि सुंठ याचा वास मस्त येतो. सुंठ उगाळून घातली तर अजून छान लागते!

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

अनार कढी/ डाळिंबाचे सार:

अनार कढी/ डाळिंबाचे सार:



  दोन किलो डाळिंब आणलेली घरी, कोणी फारसं खात नव्हतं..मी वाटच बघत होते, कधी एकदा करून बघायला मिळतंय याची..मग काय आज मुहूर्त लागला!

साहित्य: चार डाळिंब सोलून दाणे, एक नारळाचं खोबरं, मीठ, दोन तीन ओल्या मिरच्या, चार चमचे साखर, दोन चमचे आरारूट, दोन चमचे तूप, पाव चमचा जीरं, चिमूटभर हिंग, कढीलिंब पाच सहा पानं.

कृती:
 डाळिंब सोलून दाणे काढून घ्या. ज्युसर जार ला पाणी घालून फिरवा. एका पातेल्यात गाळून घ्या. खोबऱ्यात दोन वेळा पाणी घालून फिरवा, त्याच पातेल्यात गाळा. मीठ, साखर, मिरची वाटून घाला. आता छान ढवळा. तुम्हाला जर गार सोलकढी सारखं प्यायचं असेल तर तयार कढी/ सार गार करून सर्व्ह करा.
आमच्याकडे सार थोडं गरम आवडतं. म्हणून मी त्यात कढीलिंब पानं घातली. वरून तुपाची हिंग, जीरं घालून फोडणी दिली. दोन चमचे आरारूट थोड्या पाण्यात कालवून साराला लावलं. आणि जेवताना फक्त गरम करून घेतलं!