कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

तमळी( कढीचा एक प्रकार):



तमळी( कढीचा एक प्रकार): 

माझ्या माहेरच्या शेजारी एक प्रभाकाकू आहे. ती काही काही पदार्थ खूप सुंदर करायची. ही तिचीच रेसीपी! तमळी केली की ती हमखास माझ्यासाठी ठेवत असे. सुंठ आणि मेथी याचं मस्त कॉम्बिनेशन आहे तमळी!

साहित्य: पाऊण ली ताक, पाव ली पाणी, एक टेबलस्पून डाळीचं पीठ, चार टीस्पून सुंठ पावडर, दीड चमचा मेथी, दोन चमचे तूप, पाव चमचा जीरं, पाव चमचा हिंग, पाच सुक्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, मीठ, साखर चार टीस्पून, कढीलिंब पानं.

कृती: या तमळीचं वैशिष्ट्य म्हणजे याची फोडणी ती मातीच्या खापरात करायची. मातीचं भांडं गरम करा. त्यात तूप घाला. मेथी दाण्यांपैकी एक चमचा दाणे तळून बाजूला ठेवा. तळलेल्या मेथीची पावडर करून घ्या.गॅस बंद करा. पाण्यात डाळीचं पीठ आणि सुंठ पावडर आणि मेथी पावडर नीट कालवून घ्या. आता त्यात ताक मिसळा. मीठ, साखर घाला. कढीलिंब पानं घाला. सगळ्यात वर लाल तिखट पसरून घालून ठेवा, ढवळू नका. आता खापरात उरलेल्या तुपात जीरं, मेथी दाणे, सुक्या मिरच्या, हिंग अशी फोडणी करा. ही फोडणी त्या लाल तिखटावर घाला. ती ते खापर पण तमळीत बुडवायची. चर चर आवाज यायचा. तिखटावर अशी फोडणी घातली की तिखट जळत नाही. आता आपली तमळी तयार आहे. जेवताना गरम करा. या दिवसांत तमळी प्यायला मस्त वाटते. मेथी आणि सुंठ याचा वास मस्त येतो. सुंठ उगाळून घातली तर अजून छान लागते!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा