कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १५ एप्रिल, २०२५

कच्च्या कैरीचे गूळ घालून पन्हे

 नमस्कार मंडळी,  आजचा मुख्य पदार्थ

 कच्च्या कैरीचे पन्हे:


साहित्य: एक कैरी फोडी करून, त्याच्या दुप्पट गूळ, एखादी मिरची, भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा, मीठ.


कृती: कैरीच्या फोडी, मिरची, गूळ, जिरं पावडर आणि मीठ सगळं एकत्र करून बारीक वाटून घ्या.

गाळून घेऊन साधारण पाच पट तरी पाणी लागेल. चव बघून काही हवं तर वाढवा. 


टीप: हे टीकाऊ सरबत नाही. किंचित मिरचीचा झटका छान लागतो.

शिजवून कैरी पण करतात हे झटपट होते. माझ्याकडे भोपळी आंबा होता पण चांगला आंबट आहे त्यामुळे मस्त झालं. 


#उन्हाळा 

#मिनलरेसिपिज #नाश्ता 

#रोजचास्वयंपाक 

#पन्हं

कैरी भेंडी फ्राय

 साहित्य: अर्धा किलो भेंडी, अर्धी वाटी किसलेली कैरी, अर्धी वाटी ओलं खोबरं, एक टेबलस्पून तीळ, मीठ,साखर, तिखट, फोडणीचे साहित्य



कृती: भेंडी धुवून पुसून काचऱ्या करून घ्या.

कैरी किसून घ्या. कढईत तेल तापत ठेवा त्यात मोहरी घाला ती तडतडली की लगेच भेंडी घालून घ्या, भेंडी परतत ठेवा त्यातच किसलेली कैरी पण घाला. दोन्हीही मंद गॅसवर परतत राहा. दहा मिनिटांनी भेंडीचा रंग बदलला की त्यात मीठ साखर हळद तिखट हे सगळं घालून नीट मिक्स करून घ्या परत एकदा भेंडी परतत ठेवा. 

आता त्यात ओलं खोबरं भाजलेले तीळ बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं घालून परत एकदा नीट मिक्स करा, चव बघा काही हवं असेल तर वाढवा आणि पुन्हा दोन मिनिटे परतून सर्व्ह करा.


सोमवार, १४ एप्रिल, २०२५

दही कारली

 नमस्कार मंडळी😊

बऱ्याच दिवसात काही लिहायला वेळ झाला नाही  झाल्यावर फोटो काढून ठेवत होते पण थोडी तब्येतीची कुरबुर त्यात ऑर्डरचा सपाटा त्यामुळे वेळ नव्हता होत.



दही कारली: आत्ता थंडावा देणाऱ्या गोष्टी या भाजीत वापरल्या आहेत. मी चणे घेतलेत तिथे डाळ्याचे पीठ पण घेऊ शकता.

साहित्य: एक वाटी कारल्याच्या फोडी, एक वाटी कांदा चिरून, एक वाटी दही, एक टेबलस्पून साल काढून चणे, एक चमचा लाल तिखट, एक चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरं पूड, दोन चमचे साखर, मीठ, कोथिंबीर. फोडणीचे साहित्य.


कृती: कारली बिया काढून पातळ 

काचऱ्या करून घ्या. कांदे पण अर्धेलांब चिरा. कारली मीठ लावून ठेवा.

चणे बारीक करून घ्या. दही फेटून घ्या. त्यात चण्याचे पीठ, धने पावडर, जिरं पावडर, तिखट हे सर्व मिक्स करून घ्या.

 कढईत तूप तापत ठेवा. त्यात जिरं, हिंग, हळद अशी फोडणी करा.

आता त्यात कांदा परतायला घाला.

कारली पिळून पाणी काढून ती पण परतायला घाला. पाच मिनिटं मंद आचेवर दोन्हीही व्यवस्थित परतून घ्या.

 आता त्यात थोडं मीठ, साखर घालून परत परतून घ्या. तयार दह्याचे मिश्रण घाला. कोथिंबीर बारीक चिरून घाला.

लागले तर थोडं पाणी घाला. व्यवस्थित उकळी येऊ द्या. चव बघून जे हवं ते वाढवा. छान लागते ही भाजी बघा करून!


टीप: आपण कारल्याच्या काचऱ्या 

मीठ लावून ठेवल्या होत्या त्यामुळे मीठ चव बघून घाला. पिळून घेतल्यावर थोडं कमी होतं.  किंचित कडवट चव लागतेच म्हणजे कारल्याची भाजी आहे एवढं कळतं. चणे घातल्याने दही फुटत नाही.

✍️ मीनल सरदेशपांडे