कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

घरगुती मसाला सुपारी (सुपारी विरहीत)

 आता नवरात्र म्हटले की रोज गोड खाणं होणार आणि गोड खाल्ल्यावर मुखशुध्दी हवीच! माझ्या एका मैत्रिणीने पद्मावतिने दिलेल्या रेसिपीत माझ्या आवडीनुसार बदल करून केलेली ही घरगुती मसाला सुपारी!!
 साहित्यः
 तीन वाट्या बडिशेप, अर्धी वाटी पांढरे तीळ, अर्धी वाटी ओवा, २५ ग्रॅम जेष्ठ्मध, २५ लवंगा, २५ वेलची नग, सुके खोबरे एक वाटी, मीठ चवीनुसार, पिठीसाखर पाव वाटी, धना डाळ ५० ग्रॅम


कृती:
सुके खोबरे किसून घ्यावे. बडिशेप, ओवा, लवंगा, वेलची, सुके खोबरे, तीळ हे सर्व वेगवेगळे मंद गॅसवर खमंग भाजून घ्यावे. तीळ तसेच ठेवावे. बडिशेप, ओवा, वेलची, लवंगा आणि किसून भाजलेले सुके खोबरे आणि २५ ग्रॅम धना डाळ सर्व मिक्सरवर बारीक करून घ्यावे. आता बारीक केलेले सर्व एकत्र करावे. चवीनुसार मीठ, पिठीसाखर घालावी. जेष्ठमध पावडर मिसळावी. शेवटी भाजलेले तीळ अख्खेच मिसळावे. २५ ग्रॅम धना डाळ अख्खी मिसळावी. पिठीसाखर चवीनुसार कमीजास्त करावी. तयार आहे आपली झटपट मसाला सुपारी! आता भरा बकाणे!!

नाचणीचे डोसे

साहित्य: 
   दोन वाट्या नाचणीचे पीठ, पाऊण वाटी तांदुळाचे पीठ, पाव वाटी डाळीचे पीठ, दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक करून, कोथिंबीर बारीक चिरून, दोन वाट्या ताक, मीठ, पाणी.
कृती:
  नाचणीचे पीठ, तांदुळाचे पीठ, डाळीचे पीठ एकत्र करावे. मिक्सरला मिरच्या बारीक करून घ्याव्या. कोथिंबीर धुवून बारीक चिरावी. मिरचीचे वाटप, कोथिंबीर, मीठ पिठात मिसळावे. ताक घालावे. गरजेनुसार पाणी घालावे डोश्याइतपत पीठ असावे. तवा तापवून तेलावर डोसे घालावे. गॅस मध्यम ठेवावा. नाचणीमुळे पटकन रंग बदललेला कळत नाही.
 नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करावे

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

आमसुलाची चटणी

खरंतर आमसुलाची चटणी अतिशय चविष्ट असते, ती इतरवेळी का करत नाहीत कोण जाणे. कदाचित सारखे खीर वडे खाणाय्रा मंडळीना त्रास होऊ नये म्हणून आमसुलाची चटणी याचवेळी केली जात असावी .ज्याच्याशिवाय श्राध्द पक्ष पूर्ण होत नाही अशी ही आमसुलाची चटणी!
साहित्यः
अर्धी वाटी आमसुले, पाव वाटी गूळ, पाच सहा ओल्यामिरच्या, पाव वाटी ओले खोबरे, एक चमचा जीरे, मीठ.
कृती:
आदल्यादिवशी रात्री आमसुले पाण्यात भिजत घालावीत. विसरल्यास सकाळी गरम पाण्यात घालावीत. मिरच्या धुवून तुकडे करावेत. आमसुले (पाण्याशिवाय), मिरच्यांचे तुकडे, ओले खोबरे, गूळ, जीरे आणि चवीनुसार मीठ एकत्र करून छान बारीक वाटावे. गरज वाटल्यास आमसुलाचे पाणी वाटताना घालावे. आमसुले व्यवस्थित आंबट असतील तर गूळ जास्त लागू शकतो.
ही चटणी एकदम मस्त लागते. उरलेले आमसुले भिजवलेले पाणी आमटीत वापरावे.

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

चिबडाची दह्यातली कोशिंबिर


चिबडाची दह्यातली कोशिंबिर


पावसाळ्यात कोकणात ठरावीक फळभाज्या मोठ्या प्रमाणात येतात. पडवळ, दुधी, काकडी, भेंडे, भोपळा, शिराळी, पारोशी त्यापैकीच एक चिबूड! ही काही फार वेगळी पाकृ नाहीय. पण ज्यांनी चिबूड पाहिला नसेल त्यांच्यासाठी! चिबूड नुसता मीठ साखर लावून पण चांगला लागतो.
chibud
हा चिरल्यावर आतून असा दिसतो.
chibud
साहित्यः
एक मध्यम आकाराचा चिबूड, पाव लिटर दुधाचे घट्ट दही, पाच सहा ओल्या मिरच्या, मीठ, चार पाच चमचे साखर, दोन चमचे तूप, हिंग , जीरे.
chibud
कृती:
बाहेरची साल पूर्ण पिवळी झालेला चिबूड घ्यावा. बिया आणि साल काढून फोडी करून घ्याव्या. दह्यात मीठ, साखर घालून सारखे करावे. तूप गरम करून जीरे, मिरची तुकडे, हिंग घालून फोडणी करावी. जेवायला बसताना आयत्यावेळी सगळे एकत्र करावे. चिबडाच्या फोडीत मीठ, साखर घातल्यास पाणी सुटते, म्हणून आयत्यावेळी सारखी करावी.
याला एक प्रकारचा वास असतो, काहींना तो आवडत नाही. पण ज्यांना आवडतो ते वाट बघत असतात, कधी मिळतोय चिबूड याची! या कोशिंबीरीला साखरेची पुढे चव चांगली वाटते. फोडणी नको असेल तर मिरच्या वाटून घालाव्या.
chibud

विलायती फणसाची भाजी

साहित्यः



  दोन मध्यम आकाराचे विलायती फणस(हे नेहमीच्या फणसासारखेच काटेरी आणि आतून गरे असलेले फणस असतात) अर्धी वाटी तेल, चार पाच आमसुले, दोन चमचे गूळ, चवीनुसार मीठ, सात आठ सांडग्या मिरच्या, दोन तीन सुक्या मिरच्या, दहा बारा मेथी दाणे, फोडणीचे साहित्य, एक वाटी ओले खोबरे.
 कृती:
 फणसाची साल आणि मधला कडक भाग काढून चिरून घ्यावा. चिरलेला फणस आमसुले घालून कुकरला वाफवून घ्यावा.  तेल गरम करून सांडग्या मिरच्या तळून घ्याव्या. उरलेल्या तेलाची मोहोरी, हिंग, मेथीदाणे, हस्ळद, सुक्या मिरच्या घालून फोडणी करावी. चिरलेल्या फणसातली आमसुले काढून फणस फोडणीत घालावा. त्यात गूळ, मीठ, ओले खोबरे घालावे. लागल्यास थोडे लाल तिखट घालावे. तळलेल्या मिरच्या चुरून त्यातला थोडा चुरा भाजीत घालावा, छान एकत्र करून पाच मिनिटे वाफ काढावी. भाजी वाढताना वरून फोडणी आणि चुरलेली मिरची घालून खावी.
y

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

आंबा मोदक




.
साहित्यः
आटवलेला आंब्याचा रस एक वाटी,
साखर दीड वाटी
वेलची पावडर,
पाणी,
मोदकाचा साचा
.

.
कृती:
दीड वाटी साखर कढईत घ्या. त्यात एक वाटी पाणी घाला. मध्यम गॅसवर ठेवून ढवळत रहा. साखरेचा गोळीबंद पाक करायचा आहे. एका वाटीत अर्धी वाटी पाणी घ्या. पाकाचा थेंब पाण्यात टाकून पाहा. पाकाची घट्ट गोळी झाली की गॅस बंद करा.
आता या पाकात चिमूटभर वेलची पावडर घाला आणि लगेच रसाचा गोळा मिसळा. खाली उतरून घोटत राहा.
चांगला गोळा झाला की मोदकाच्या साच्यात घालून मोदक करा. याच्या वड्या करायच्या असतील तर गोळा झाल्यावर ताटाला तूप लावून त्यात गोळा थापा आणि वड्या पाडा.
आमरसाचा सुंदर स्वाद आणि रंग येतो या मोदकांना!
.
1

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

अळूची चिंचगुळातली मसाला देठी

तसा मला रेसिपी द्यायला उशीर झालाय, श्रावणात शाकाहार असल्याने अनेकांना भाज्या काय करायच्या हा प्रश्न पडतो. त्यासाठी ही वेगळी कृती!
साहित्यः
अळूची नुसती देठी २५/३० नग, चिंचेचा कोळ तीन चमचे, गूळ तीन चमचे, लाल तिखट एक चमचा, गोडा मसाला दोन चमचे, शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी, ओले खोबरे अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, तेल फोडणीसाठी,फोडणीचे साहित्य, कोथिंबीर.

कृती:
अळूची पाने आपण अळूवडीसाठी वापरतो. पण इथे नुसती देठी वापरायची आहे. अळूची देठी सोलून घ्यावी. छोटे गोल तुकडे करून घ्यावे. तुकड्यामध्ये थोडे पाणी घालून वाफवून घ्यावे. वाफवताना एक काळजी घ्या, तुकडे जास्त शिजू देऊ नका. शिजलेले तुकडे चाळणीवर काढून त्यातले पाणी काढून टाका. पाणी काढल्याने देठीला खाज असेल तर निघून जाईल. गॅसवर कढई तापत ठेवा. तेलाची हिंग, मोहोरी, जीरे, हळद घालून फोडणी करा.गॅस बारीक करून फोडणीत लाल तिखट घाला. आता शिजलेली देठी घाला. तुम्हाला पातळ हवी असेल त्यानुसार पाणी घाला. दाण्याचे कूट, खोबरे, गोडामसाला घाला. चिंचेचा कोळ आणि गूळ घाला, चवीनुसार मीठ घालून उकळी येऊ द्या. गरजेनुसार तिखट, मीठ गूळ आणि चिंच याचे प्रमाण कमी जास्त करा. ही भाजी सणसणीत चांगली लागते.
कोथिंबीरीने सजवून वाढा.