कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

रताळ्याचा कीस

साहित्य:
 अर्धा की रताळी, एक वाटी किंवा आवडीनुसार शेंगदाण्याचे कूट, दोन चमचे साखर, पाव वाटी तूप, चार ओल्या मिरच्या, मीठ, अर्धा चमचा जीरे, पाव वाटी ओलं खोबरं ऐच्छिक

कृती:
 रताळी स्वच्छ धुऊन घ्यावीत. सालं काढून घ्यावीत. स्वच्छ असेल तर सालं ठेवली तरी चालतील. पातेल्यात अर्धी पातेली पाणी घ्यावे.रताळी किसून कीस पाण्यात टाकावा. मिरच्यांचे तुकडे करून घ्यावे. कीस पाण्यातून काढून घट्ट पिळून घ्यावा. त्यात दाण्याचे कूट, साखर, मीठ घालून नीट मिक्स करावे. कीस परतल्यावर आळतो, त्या अंदाजाने मीठ घालावे. कढईत तूप तापत ठेवावे. तापलं की जीरं, जीरं तडतडलं की मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरच्या परतल्या की तयार मिश्रण घालून ढवळावे. झाकण ठेवून छान वाफ काढावी. दहा पंधरा मिनिटात कीस तयार होतो, त्याचा रंग बदलतो. ओलं खोबरं वरून घालू शकता किंवा आधीच मिक्स करू शकता. चव बघून लागल्यास मीठ घालावे.

भेंडी मसाला

साहित्य:
 भेंडी पाव की, दोन छोटे कांदे, दोन छोटे टॉमेटो, सात आठ लसूण पाकळ्या, सात आठ काजू, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ, दोन चमचे मलई, तेल, एक चमचा साखर.

कृती:
 भेंडी धुवून स्वच्छ पुसून घ्यावी. एक इंचाचे तुकडे करावे. कांदा चार तुकडे करून घ्यावा. कुकरला पाणी न घालता वाफवून घ्यावा. कढईत तेल तापवून भेंडी नरम होईपर्यंत तळून घ्यावी. पेपरवर काढावी. तळलेल्या भेंडीला थोडं मीठ लावून ठेवावं. लसूण, काजूगर, टोमॅटो, कांदा हे सर्व मिक्सरला फिरवून पेस्ट करावी. कढईत चार चमचे तेल घ्यावं. त्यात केलेली पेस्ट घालून परतावे. लाल तिखट, गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे. ग्रेव्हीत मीठ, एक चमचा साखर, मलई घालावी. थोडं पाणी घालून ग्रेव्ही उकळू द्यावी. आता भेंडी मिक्स करावी . गॅस बंद करावा. गरमागरम रोटी किंवा पोळी सोबत सर्व्ह करावी.

साबुदाणा वडा:

साहित्य:
 साबुदाणा 200 ग्रॅम, दोन मध्यम बटाटे, चार ओल्या मिरच्या, अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट, अर्धी वाटी उपास भाजणी, मीठ, तेल, लागल्यास लाल तिखट

कृती:
 आदल्यादिवशी रात्री स्वच्छ धुवून साबुदाणा खिचडी साठी भिजवतो तसा साबुदाणा भिजवावा. सकाळी मिरच्या वाटून घ्याव्या. बटाटे शिजवून घ्यावेत. शिजलेला बटाटा सालं काढून कुस्करून घ्यावा. बटाटा, साबुदाणा, दाण्याचे कूट, भाजणी,मिरची पेस्ट चवीनुसार मीठ घालून पीठ मळावे. चव बघून लागल्यास लाल तिखट घालावे. कढईत तेल तापत ठेवावे. पिठाची गोळी घेऊन वड्यासारखं थापावे. तेल चांगलं तापलं की वडे कुरकुरीत तळावे. गरमागरम वडे चटणीसोबत खावे.
हे वडे पॅटिस सारखे थोडे जाडसर गोल ठेवून तळतात पण त्यापेक्षाही असे थापून केलेले जास्त कुरकुरीत होतात.

उपमा/ तिखट मिठाचा शिरा:

 तशी बऱ्याच जणांच्या नावडीची डिश, पण नेहमीच्या उपम्यापेक्षा हा ताक घालून केलेला उपमा छान लागतो!

साहित्य:
 एक वाटी मध्यम रवा, तीन ओल्या मिरच्या, पाव चमचा किसलेलं आलं, कढिलिंबाची चार पाच पाने, एक वाटी ताक, अडीच वाट्या पाणी, मीठ, साखर एक चमचा(ऐच्छिक), सात आठ काजूगर(ऐच्छिक), चार चमचे तेल, पाव चमचा मोहोरी, पाव चमचा जीरं, खोबरं, कोथिंबीर, दोन छोटे कांदे, पाव चमचा हळद, चिमुटभर हिंग.

कृती:

 कांदे नेहमीप्रमाणे चौकोनी बारीक चिरावे. मिरच्या धुवून तुकडे करावे. काजूगर घालणार असाल तर गरम पाण्यात भिजवावे. कढई तापत ठेवावी. रवा तांबूस रंगावर भाजून घ्यावा. भाजलेला रवा ताटात काढून घ्यावा. कढईत तेल तापत ठेवावे. तेल तापले की मोहोरी, जीरं घालावं. मोहोरी तडतडली की मिरच्यांचे तुकडे घालावे. ते तळले की कांदा घालून मंद गॅसवर परतावा. एका बाजूला पातेल्यात पाणी मोजून गरम करण्यास ठेवावे. कांदा परतला की त्यात हिंग, हळद घालून परतावे. गरम केलेले पाणी तयार फोडणीत घालावे. पाण्यात, मीठ, साखर, आलं, भिजवलेले काजूगर, ताक घालून उकळी येऊ द्यावी. पाण्याची चव बघून काही हवे असल्यास घालावे. कढिलिंबाची पाने घालावी. पाणी उकळू लागले की त्यात भाजलेला रवा घालावा. रवा घालताना गॅस मंद ठेवावा. नीट मिक्स करून पाच मिनिटं छान वाफ काढावी. गरमागरम उपमा कोथिंबीर आणि खोबरं घालून सर्व्ह करावा.

सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

बाप्पाचा नैवेद्यः मावा चॉकलेट रोल




1
साहित्यः
दोन वाट्या खवा,
एक वाटी पिठी साखर,
एक टेबल स्पून कोको पावडर,
दोन तीन थेंब व्हॅनिला इसेन्स.
कृती:
एक वाटी खवा आणि अर्धी वाटी पिठी साखर कढईत एकत्र करावे. व्हॅनिला इसेन्स घालून मंद गॅसवर ढवळत रहावे. बटर पेपरला तूप लावून घ्यावे. खव्याचा गोळा झाला की बटर पेपरवर थापावे.
1
.
आता कढईत परत एक वाटी खवा, अर्धी वाटी पिठीसाखर, एक चमचा कोको पावडर घ्यावी. एकत्र करून मंद गॅसवर ढवळत रहावे. त्याचा गोळा झाल्यावर पहिल्या थापलेल्या खव्यावर थापावे.
1
.
दहा मिनीटे गार होऊ द्यावे. आता बटर पेपरसह रोल करण्यास घ्यावा. गुंडाळी करून बटर पेपर सोडवत जावे.
1
.
रोल तयार झाल्यावर हाताने अलगद फिरवून घट्ट वळावा.
गार झाल्यावर कापावा. माझा पहिला थर थोडा पातळ थापला गेला. पण चवीला एकदम मस्त!
आणि बाहेरच्या मिठाईपेक्षा तर बाप्पाला नक्कीच आवडेल. याचा रोल नसेल जमत तर फक्त दोन थर देऊन बर्फी करा.
1

सोमवार, ३१ जुलै, २०१७

साबुदाणा लाडू

साहित्य:
 साबुदाणा पीठ दोन वाट्या, पिठीसाखर एक वाटी, साजूक तूप अर्धी वाटी, खसखस पाव वाटी, वेलची पावडर
कृती: 
मंद आचेवर तडतड होईपर्यंत साबुदाणा भाजून घ्या. पीठ करून घ्या. पिठीसाखर आणि तूप एकत्र करून फेसून घ्या. त्या आधी खसखस भाजून बारिक करा. पिठीसाखर आणि तूप ,वेलचीपावडर फेसून घ्या. आता त्यात साबुदाणापीठ, खसखस घालून नीट मिक्स करा. लाडू वळा. तूप बरोबर होतेच पण जास्त वाटले तर थोडे पीठ वाढवा. चव घेऊन लागल्यास पिठीसाखर वाढवा.

ताकातले वरी तांदूळ/ ताकातली भगर:

उपासाला चालणारी झटपट सोपी रेसिपी
साहित्य:
अर्धी वाटी वरी तांदूळ, दोन वाट्या पाणी दोन वाट्या ताक, चार ओल्या मिरच्या, दोन चमचे तूप, चार चमचे शेंगदाण्याचे कूट, पाव चमचा जीरे, मीठ.
कृती: वरी तांदूळ स्वच्छ धुवा. पाणी निथळत ठेवा. कढई तापत ठेवा. मिरच्या धुवा आणि तुकडे करून घ्या. कढईत तूप घाला. तापले की जीरे, मिरच्यांचे तुकडे घालून मंद गॅसवर परता. आता त्यात वरी तांदूळ घालून परता. त्यात पाणी घालून मंद गॅसवर शिजू द्या. वरी शिजली की त्यात दाण्याचे कूट, ताक, मीठ घालून ढवळा. हे थोडे सैलसर असते. गरमागरम छान लागते. उपासाला खात असाल तर कोंथिबीर घाला.