कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

उपमा/ तिखट मिठाचा शिरा:

 तशी बऱ्याच जणांच्या नावडीची डिश, पण नेहमीच्या उपम्यापेक्षा हा ताक घालून केलेला उपमा छान लागतो!

साहित्य:
 एक वाटी मध्यम रवा, तीन ओल्या मिरच्या, पाव चमचा किसलेलं आलं, कढिलिंबाची चार पाच पाने, एक वाटी ताक, अडीच वाट्या पाणी, मीठ, साखर एक चमचा(ऐच्छिक), सात आठ काजूगर(ऐच्छिक), चार चमचे तेल, पाव चमचा मोहोरी, पाव चमचा जीरं, खोबरं, कोथिंबीर, दोन छोटे कांदे, पाव चमचा हळद, चिमुटभर हिंग.

कृती:

 कांदे नेहमीप्रमाणे चौकोनी बारीक चिरावे. मिरच्या धुवून तुकडे करावे. काजूगर घालणार असाल तर गरम पाण्यात भिजवावे. कढई तापत ठेवावी. रवा तांबूस रंगावर भाजून घ्यावा. भाजलेला रवा ताटात काढून घ्यावा. कढईत तेल तापत ठेवावे. तेल तापले की मोहोरी, जीरं घालावं. मोहोरी तडतडली की मिरच्यांचे तुकडे घालावे. ते तळले की कांदा घालून मंद गॅसवर परतावा. एका बाजूला पातेल्यात पाणी मोजून गरम करण्यास ठेवावे. कांदा परतला की त्यात हिंग, हळद घालून परतावे. गरम केलेले पाणी तयार फोडणीत घालावे. पाण्यात, मीठ, साखर, आलं, भिजवलेले काजूगर, ताक घालून उकळी येऊ द्यावी. पाण्याची चव बघून काही हवे असल्यास घालावे. कढिलिंबाची पाने घालावी. पाणी उकळू लागले की त्यात भाजलेला रवा घालावा. रवा घालताना गॅस मंद ठेवावा. नीट मिक्स करून पाच मिनिटं छान वाफ काढावी. गरमागरम उपमा कोथिंबीर आणि खोबरं घालून सर्व्ह करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा