कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, १४ मार्च, २०१८

काजूच्या बोंडांचं भरीत:

उन्हाळ्यात येणारं फळ म्हणजे काजू... काजूगर सगळेच खातात पण काजूबी च्या वर असणारं फळ मात्र आम्ही कोकणी मंडळी आवडीने खातो... नुसतं किंवा तोंडीलावणं करून! होतं काय की काजूबिया निघाल्या की त्यातल्या जून बिया सोलून वाळवून मुंबईत नातेवाईकांना पाठवायच्या आणि कोवळे गर आम्हाला आमटीत मिळायचे! सुकलेल्या बिया गोळा करण्यात दोन दोन तास जायचे... मग ही फळं खायचो आम्ही! त्यात काही फळं घशात खवखवतात तर काही मस्त असतात. उन्हात तहान पण भागायची आणि बिया गोळा व्हायच्या. एकाने झाडावर चढून झाड हलवलं की खाली सडा पडायचा! बिया गोळा करायला गेलो की आम्ही त्या झाडाला खाच मारून यायचो, म्हणजे चार दिवसांत गोंद तयार व्हायची जी पुढच्या वर्षी पुस्तकांची कव्हर चिकटवायला उपयोगी यायची! अशा या काजूच्या फळांची  रेसीपी!

काजूच्या बोंडांचं भरीत:
साहित्य:

 पाच सहा पिकलेली काजूची बोंडं/ जाम, दीड वाटी दही, दोन मिरच्या, दोन चमचे तूप, पाव चमचा जीरं, एक चमचा मेतकूट, दोन चमचे साखर, मीठ, कोथिंबीर, चिमुटभर हिंग

कृती:

 पिवळी बोंडं घेऊन स्वच्छ धुवावी. फोडी करून त्यात थोडे पाणी घालून शिजवावी. शिजलेल्या फोडी चाळणीवर काढाव्यात. तूपाची जीरं, मिरच्यांचे तुकडे, हिंग घालून फोडणी करावी. फोडी एका बाऊलमध्ये घेऊन त्यात मीठ, साखर, मेतकूट, फोडणी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भरीत सारखं करावं.पाणी काढून टाकल्याने घशात खवखव होत नाही.

गुढीपाडवा स्पेशल साखरेची माळ

गुढीपाडवा स्पेशल साखरेची माळ

साहित्य: एक वाटी साखर, अर्धी पेक्षा थोडं कमी पाणी, दोन थेंब खाण्याचा रंग, चिमुटभर सोडा किंवा बेकिंग पावडर
कृती: ताटाला तुपाचा हात लावा. त्यावर दोरा ठेवा. त्यावर अंतरावर नान कटाई चे मोल्ड ठेवा.
पातेल्यात साखर, पाणी आणि कलर एकत्र करा. उकळा, पक्का पाक करा. तयार झाल्यावर सोडा किंवा बेकिंग पावडर मिक्स करा. बाजूला साखर दिसू लागली की लगेच पाक मोल्डमध्ये ओता, किंवा नुसता दोऱ्यावर गोल गोल घाला. दहा मिनिटं गार होऊ द्या. कदाचित सोडा किंवा बेकिंग पावडरने खुसखुशीत होत असावी. मलाही त्याचं कारण कळलं नाही, पण whatsapp आणि fb वर बरीच पोस्ट फिरतेय म्हणून करून पाहिलं..छान झाली, मोल्ड वापरायचे हा माझा प्रयोग!

बुधवार, ७ मार्च, २०१८

आंब्याचे रायते: शिजवून

आंब्याचे रायते:
 साहित्य: दोन मोठया कैऱ्या, दोन वाट्या गूळ, लाल तिखट दोन चमचे, मीठ, तेल तीन चमचे, मोहोरी अर्धा चमचा, मेथी पाव चमचा, हळद पाव चमचा
कृती: कैऱ्या स्वच्छ धुवाव्यात. देठ काढून चीक जाऊ द्यावा. पातेल्यात कैऱ्या बुडतील इतपत पाणी घेऊन दहा मिनिटं झाकण ठेवून कैऱ्या वाफवाव्यात. पाण्यातून काढून गार होऊ द्याव्यात. सोलून गर काढावा. जेवढा गर असेल तेवढा गूळ गरात मिक्स करावा. मीठ, तिखट मिक्स करून तासभर ठेवावे. एक कढईत तेल तापत ठेवावे. त्यात मोहोरी, मेथी, हिंग हळद घालून फोडणी करावी. कैरीचा गर फोडणीत घालावा. परतून थोडावेळ आटवावे. सॉस इतपत झाला की गॅस बंद करावा. गार झाल्यावर आणखी घट्ट होतो. काचेच्या बाटलीत भरून ठेवावे. पंधरा दिवस सहज टिकते.
टीप: कैऱ्या आंबट असतील तर गूळ जास्त लागू शकतो, टेस्ट अप्रतिम!!

एगलेस पौष्टिक केक

 
साहित्य

  • कणिक 100 ग्रॅम
  • नाचणी पीठ 100 ग्रॅम
  • 10 खजूर
  • अर्धी वाटी सीडलेस काळ्या मनुका
  • 300 मिली दूध
  • एक चमचा खायचा सोडा
  • दीड चमचा बेकिंग पावडर
  • पिठीसाखर 150 ग्रॅम
  • रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल 100 मिली
  • दीड चमचा लिंबू रस
  • एक टेबलस्पून कोको पावडर
  • एक टीस्पून कॉफी पावडर
  • एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • केक बेकिंग साठी: मीठ दीड वाटी
  • कुकर किंवा मोठं पातेलं
  • झाकण
  • केक पॉट
  • डेकोरेशन साठी: whipped क्रीम 100 ग्रॅम
  • डार्क चॉकलेट 100 ग्रॅम
  • एक टीस्पून लोणी
  • एगलेस पौष्टिक केक

    1. नाचणी, कणिक, बेकिंग पावडर, सोडा, कोको पावडर एकत्र करून तीन वेळा चाळून घ्या.
    2. खजुराच्या बिया काढा.
    3. मनुका 150 मिली दुधात दहा मिनिटं भिजवा.
    4. खजूर, मनुका दुधासह फिरवून घ्या.
    5. फिरवलेल्या मनुकेच्या मिश्रणात तेल, पिठीसाखर, कॉफी पावडर, दूध, व्हॅनिला इसेन्स घालून फेटा.
    6. कुकरमध्ये किंवा पातेल्यात मीठ पसरून, झाकण लावून फुल फ्लेमवर पाच मिनिटं प्रिहिट करा. कुकरची शिट्टी आणि रिंग काढून ठेवा
    7. फेटलेल्या मिश्रणात लिंबू रस मिसळा
    8. आता चाळलेलं पीठ फेटलेल्या मिश्रणात घालून फेटा.
    9. केक पॉट ला तुपाचा हात लावा.
    10. मिश्रण पॉट मध्ये ओता.
    11. मिठावर कुकरमधली जाळी ठेवा.
    12. त्यावर केकपॉट ठेवा.
    13. पातेल्यावर, किंवा कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर 30 मिनीटं बेक करा.
    14. त्यानंतर झाकण उघडून सुरूचे टोक घालून बेक झाला का पहा, नसेल तर परत 10 मिनीटं ठेवा.
    15. ओव्हन ला बेक करणार असाल तर 180 डिग्रीवर पाच मिनिटं प्रिहिट आणि 180 वर 30 मिनीटं केक पॉट ठेवून बेक करा.
    16. केक गार होऊ द्या.
    17. तयार केक
    18. केक बेक होईपर्यंत क्रीम गरम करा.
    19. डार्क चॉकलेटचे तुकडे करा.
    20. त्यात लोणी घाला
    21. गरम केलेले क्रीम चॉकलेटवर ओता.
    22. नीट ढवळा.
    23. गार झाले की तयार केकवर ओता.
    24. गनाश केक
    My Tip:
    तुम्हाला नको असेल तर वर चॉकलेट गनाश न घालता देऊ शकता, नाचणीचा आहे हे पण कळत नाही मुलांना!
     

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०१८

आंबा पुराण:

आंबा पुराण: आला आंब्याचा सिझन आला!! आंब्याचा सिझन सुरू झाला की आम्हा कोकणातील लोकांची तोंडीलावण्याची चिंता मिटते. आंबा तिखट आणि गोड दोन्ही चवींशी अगदी प्रेमाने मिसळून जातो... अगदी कोकणी माणसासारखा! कैऱ्या यायला लागल्या की लोणचं, कांदा कैरीची चटणी, टक्कु, रायते, कोयाडे, मुरांबा, आंबे डाळ, उकडांबा: .... https://minalmangesh.blogspot.in/2017/11/blog-post_93.html (कोयाडे)
काय करू आणि काय नाही असं होऊन जातं अगदी!
https://minalmangesh.blogspot.in/2017/11/blog-post_41.html (उकडांबा) उन्हाळ्यात येणाऱ्या पाहुण्यांना स्वागतासाठी पन्ह तयार होऊ लागते, तोवर हळूहळू आंबा केशरी रंग धारण करायला लागतो. मग तर रोज शाही थाट अर्थात आमरस पोळी! पायरी आंब्याचा रस म्हणजे अहाहा! हापूस आंबा तर राजाच, गार दुधात थोड्या फोडी आणि रस मिसळला की वेगळं पक्वान्न झालं! https://minalmangesh.blogspot.in/2017/04/blog-post_30.html आईस्क्रीम चा तर प्रोग्रॅम असती आमच्याकडे, आईस्क्रीम पॉट वर घरच्याघरी प्रत्येकाने फिरवून फिरवून, बाजूला खडे मीठ आणि बर्फ टाकून तयार झालेलं आईस्क्रीम जीभ जड होईपर्यंत खायचं, अगदी डिश मोजत मोजत! आणि आंब्याला पुडिंग, केक याचंही वावडं नाही... उगाच म्हणाल हा गावठी आंबा याला काय कळतंय यातलं? पण इथेही कोकणी माणसासारखा कुठेही चपखल बसतो आंबा! https://minalmangesh.blogspot.in/2017/05/blog-post_19.html आम्हा सुगरणींना तर पर्वणीच असते या दिवसात! आंब्याचे साट, आटवलेला रस, आंबोशी, आमचूर अशी साठवणीची कामं ही सुरू असतात. तरी कोणी पाहुणे आले तर की सांदण, आंब्याची कढी, आंब्याचा शिरा, केला जातोच! अगदी परसातील नारळ काढले तरी चटणी जरा कैरी टाक गं.. हे सहज होतं!
जाती तरी किती.. हापुस, पायरी, भोपळी, आंबी, तोतापुरी, मालगीस, रायवळ, पावशी... नुसत्या रायवळचे किती प्रकार... एखादा विचित्र वासाचा रायवळ बाजारात सहज खपतो... पण आमच्याकडची गुरं सुद्धा त्याला तोंड नाही लावत!
बाकी कैरीचं लोणचं कितीही करा पण बेगमीच्या लोणच्याला उतरवून काढलेला हापुसच हवा!... किती बोलू पण आता वेळ नाहीय... पन्ह्या साठी कैऱ्या शिजवल्यात

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

पहिला प्रयत्न होममेड केक:





कोथिंबीर वडी:

कोथिंबीर वडी:


कोथिंबीर जुड्या तीन, दोन वाट्या बेसन, अर्धी वाटी तांदूळ पीठ, एक चमचा ओवा, एक चमचा धने पावडर, एक चमचा जीरे पावडर, दोन चमचे लाल तिखट, एक चमचा हळद, दोन चमचे तेल, मीठ

कृती:

 कोथिंबीर निवडून धुवा, चाळणीवर निथळत ठेवा. बारीक चिरा. वाटीने मोजून घ्या. माझी अगदी चेपून भरून चार वाट्या कोथिंबीर झाली. कढईत दोन चमचे तेल तापवा. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून परता आणि दोन मिनिट झाकण ठेवा. एका पातेल्यात दोन वाट्या बेसन, अर्धी वाटी तांदूळ पीठ, तिखट, मीठ, धने, जीरे पावडर, ओवा, हळद सगळं एकत्र करा. त्यात भज्यांच्या पिठाइतपत होईल असे पाणी घाला. गुठळी राहू देऊ नका. आता परतलेल्या कोथिंबिरीत हे तयार पीठ घालून ढवळा. मंद गॅसवर वाफ येऊ द्या. थाळ्याला तेलाचा हात लावा. मिश्रण मधेच ढवळा. दहा मिनिटात मिश्रण घट्ट होईल आणि हाताला चिकटणार नाही. आता ते मिश्रण थाळ्यात थापा.

 वड्या पाडा. गार झाल्यावर तळा किंवा तव्यावर लावा.