कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

बुधवार, १४ मार्च, २०१८

काजूच्या बोंडांचं भरीत:

उन्हाळ्यात येणारं फळ म्हणजे काजू... काजूगर सगळेच खातात पण काजूबी च्या वर असणारं फळ मात्र आम्ही कोकणी मंडळी आवडीने खातो... नुसतं किंवा तोंडीलावणं करून! होतं काय की काजूबिया निघाल्या की त्यातल्या जून बिया सोलून वाळवून मुंबईत नातेवाईकांना पाठवायच्या आणि कोवळे गर आम्हाला आमटीत मिळायचे! सुकलेल्या बिया गोळा करण्यात दोन दोन तास जायचे... मग ही फळं खायचो आम्ही! त्यात काही फळं घशात खवखवतात तर काही मस्त असतात. उन्हात तहान पण भागायची आणि बिया गोळा व्हायच्या. एकाने झाडावर चढून झाड हलवलं की खाली सडा पडायचा! बिया गोळा करायला गेलो की आम्ही त्या झाडाला खाच मारून यायचो, म्हणजे चार दिवसांत गोंद तयार व्हायची जी पुढच्या वर्षी पुस्तकांची कव्हर चिकटवायला उपयोगी यायची! अशा या काजूच्या फळांची  रेसीपी!

काजूच्या बोंडांचं भरीत:
साहित्य:

 पाच सहा पिकलेली काजूची बोंडं/ जाम, दीड वाटी दही, दोन मिरच्या, दोन चमचे तूप, पाव चमचा जीरं, एक चमचा मेतकूट, दोन चमचे साखर, मीठ, कोथिंबीर, चिमुटभर हिंग

कृती:

 पिवळी बोंडं घेऊन स्वच्छ धुवावी. फोडी करून त्यात थोडे पाणी घालून शिजवावी. शिजलेल्या फोडी चाळणीवर काढाव्यात. तूपाची जीरं, मिरच्यांचे तुकडे, हिंग घालून फोडणी करावी. फोडी एका बाऊलमध्ये घेऊन त्यात मीठ, साखर, मेतकूट, फोडणी, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भरीत सारखं करावं.पाणी काढून टाकल्याने घशात खवखव होत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा