कोकण मेवा हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

तमळी( कढीचा एक प्रकार):



तमळी( कढीचा एक प्रकार): 

माझ्या माहेरच्या शेजारी एक प्रभाकाकू आहे. ती काही काही पदार्थ खूप सुंदर करायची. ही तिचीच रेसीपी! तमळी केली की ती हमखास माझ्यासाठी ठेवत असे. सुंठ आणि मेथी याचं मस्त कॉम्बिनेशन आहे तमळी!

साहित्य: पाऊण ली ताक, पाव ली पाणी, एक टेबलस्पून डाळीचं पीठ, चार टीस्पून सुंठ पावडर, दीड चमचा मेथी, दोन चमचे तूप, पाव चमचा जीरं, पाव चमचा हिंग, पाच सुक्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, मीठ, साखर चार टीस्पून, कढीलिंब पानं.

कृती: या तमळीचं वैशिष्ट्य म्हणजे याची फोडणी ती मातीच्या खापरात करायची. मातीचं भांडं गरम करा. त्यात तूप घाला. मेथी दाण्यांपैकी एक चमचा दाणे तळून बाजूला ठेवा. तळलेल्या मेथीची पावडर करून घ्या.गॅस बंद करा. पाण्यात डाळीचं पीठ आणि सुंठ पावडर आणि मेथी पावडर नीट कालवून घ्या. आता त्यात ताक मिसळा. मीठ, साखर घाला. कढीलिंब पानं घाला. सगळ्यात वर लाल तिखट पसरून घालून ठेवा, ढवळू नका. आता खापरात उरलेल्या तुपात जीरं, मेथी दाणे, सुक्या मिरच्या, हिंग अशी फोडणी करा. ही फोडणी त्या लाल तिखटावर घाला. ती ते खापर पण तमळीत बुडवायची. चर चर आवाज यायचा. तिखटावर अशी फोडणी घातली की तिखट जळत नाही. आता आपली तमळी तयार आहे. जेवताना गरम करा. या दिवसांत तमळी प्यायला मस्त वाटते. मेथी आणि सुंठ याचा वास मस्त येतो. सुंठ उगाळून घातली तर अजून छान लागते!

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

अनार कढी/ डाळिंबाचे सार:

अनार कढी/ डाळिंबाचे सार:



  दोन किलो डाळिंब आणलेली घरी, कोणी फारसं खात नव्हतं..मी वाटच बघत होते, कधी एकदा करून बघायला मिळतंय याची..मग काय आज मुहूर्त लागला!

साहित्य: चार डाळिंब सोलून दाणे, एक नारळाचं खोबरं, मीठ, दोन तीन ओल्या मिरच्या, चार चमचे साखर, दोन चमचे आरारूट, दोन चमचे तूप, पाव चमचा जीरं, चिमूटभर हिंग, कढीलिंब पाच सहा पानं.

कृती:
 डाळिंब सोलून दाणे काढून घ्या. ज्युसर जार ला पाणी घालून फिरवा. एका पातेल्यात गाळून घ्या. खोबऱ्यात दोन वेळा पाणी घालून फिरवा, त्याच पातेल्यात गाळा. मीठ, साखर, मिरची वाटून घाला. आता छान ढवळा. तुम्हाला जर गार सोलकढी सारखं प्यायचं असेल तर तयार कढी/ सार गार करून सर्व्ह करा.
आमच्याकडे सार थोडं गरम आवडतं. म्हणून मी त्यात कढीलिंब पानं घातली. वरून तुपाची हिंग, जीरं घालून फोडणी दिली. दोन चमचे आरारूट थोड्या पाण्यात कालवून साराला लावलं. आणि जेवताना फक्त गरम करून घेतलं!
—

सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

खोबऱ्याची वडी/ नारळी पाक:

खोबऱ्याची वडी/ नारळी पाक:

साहित्य:
ओलं खोबरं दोन वाट्या, दूध एक वाटी, साखर दीड वाटी, वेलची पावडर पाव चमचा, तूप दोन चमचे


कृती:

ओलं खोबरं आणि दूध एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. कढईत एक चमचा तूप घालून वाटलेलं खोबरं आणि साखर एकत्र करून मंद गॅसवर ढवळत रहावे. घट्ट होऊ लागले की उरलेलं एक चमचा तूप आणि वेलची पावडर घालून परतत रहावे. ताटाला तुपाचा हात लावावा. गोळा  झाला की खाली उतरून घोटत रहावे. घट्ट झाला की ताटावर थापून आपल्या आवडीप्रमाणे वड्या कापाव्यात.
मी सजावटीसाठी केशर काड्या वापरल्यात.

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

उपासाची खांडवी:

उपासाची खांडवी:
साहित्य: वरी तांदूळ एक वाटी, ओलं खोबरं अर्धी वाटी, गूळ एक वाटी, पाणी तीन वाट्या, केशर सिरप एक चमचा, वेलची पावडर पाव चमचा, तूप तीन चमचे, आलं किसून एक चमचा, मीठ
कृती: वरी तांदूळ मिक्सरमध्ये थोडे फिरवून रवा करून घ्या. कढईत दोन चमचे तूप घ्या. त्यात वरीचा रवा तांबूस भाजून घ्या. एका पातेलीत गूळ, पाणी, मीठ चवीला, ओलं खोबरं, आल्याचा कीस एकत्र करा. त्यात केशर सिरप आणि वेलची वावडर घालून गूळ विरघळेपर्यंत उकळा. उकळलेले मिश्रण भाजलेल्या रव्यात घालून ढवळा. मंद गॅसवर दहा मिनिटं वाफ येऊ द्या. थाळ्याला तूप लावून घ्या. दहा मिनिटांनी मिश्रण ढवळून परत झाकण ठेवा. रवा पूर्ण शिजला आणि मिश्रण घट्ट झाले की थाळ्यात थापून घ्या. ओलं खोबरं थापताना वर पसरून सजवा.

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

प्रसादाचा शिरा:

प्रसादाचा शिरा: 

          काही काही पदार्थ पाहिले तरी ते करणारं माणूस आधी समोर येतं... तसा हा प्रसादाचा शिरा! लग्नाआधी पूजेसाठी करताना आमच्या घरी सोवळ्यात करायचा आणि तोही नऊवारी नेसून त्यामुळे मी त्या प्रांतात गेलेच नाही.
       लग्न झाल्यावर पूजेचा प्रसाद करणं हा एक सोहळा असतो हे मी सासुबाईंची तयारी पाहून अनुभवलं. त्याची तयारी त्या आदल्या दिवशीच करतात. सव्वा किलो रवा मोजून घ्यायचा, तो मंद आचेवर तांबूस भाजायचा. बेदाणे काड्या काढून ठेवायचे. काजूगर सोलून पाकळ्या करून ठेवायच्या. बदाम काप करून ठेवायचे. सव्वा की साखर, सव्वा की साजूक तूप वेगवेगळ्या डब्यात मोजून तयार ठेवायचं. सकाळी आंघोळ करून आल्यावर खाली शेगडी घेऊन त्यावर भली मोठी कढई ठेवायची... बसायला तसाच ऐसपैस चौरंग! रव्याच्या तिप्पट दूध पाणी घ्यायचं. दूध तापवून झालं की दोन भाग साय न काढता दूध आणि एक भाग पाणी एका बाजूला गरम करायचं. दुसऱ्या बाजूला कढईत सगळं तूप घेऊन त्यात भाजलेला रवा परत परतायला ठेवायचा. सव्वा केळं काप करून या रव्यावर तुपात तळायचे. बेदाणे पाण्यात धुवून तेही तुपात घालायचे. काजूगर, बदाम काप सगळेच पाठोपाठ तुपात पोहायला लागायचे. आता त्यात चिमूटभर मीठ घालायचं. आणि गॅस मंद ठेवून तयार दूध पाणी सावकाश ओतायचं.. हे करताना रवा फसफसू लागतो... अंगावर उडू शकतो. आता साखर मिसळायची. वेलची पावडर सढळहस्ते मिसळून नीट खालपासून हलवायचा, दुधात खलून केशर काड्या शिऱ्यात मिसळायच्या. आता झाकण ठेवून एक वाफ काढायची आणि झाकण काढून तूप सुटेपर्यंत मंद गॅसवर परतत रहायचं! 
       असा काही मस्त सुगंध पसरतो घरभर...अहाहा! हे सगळं त्या इतकं तन्मयतेने करत असतात की ती गोडी शिऱ्यात उतरतेच!
अजूनही मी कितीही पदार्थ बनवत असले तरीही प्रसादाचा शिरा मी केलेला नाही. वयाच्या ७४व्या वर्षीही तितक्याच उत्साहाने त्या प्रसाद करतात. आज नवरात्रातल्या नैवेद्यासाठी त्यांची कॉपी करायचा मी केलेला छोटासा प्रयत्न... तूप जरा कमीच झालंय माझं... कोकणस्थीपणा आडवा येतो दुसरं काय?😊

शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

आमरस भात

आजचा नैवेद्य: आमरस भात
साहित्य: एक वाटी तांदूळ, एक वाटी आमरस( मी टीन मधला वापरला), पाऊण वाटी साखर, पाव चमचा वेलची पावडर, काजूगर , बेदाणे, पाणी , मीठ, अर्धं लिंबू, लवंगा पाच सहा, तूप  चार चमचे, केशर सिरप एक चमचा
कृती: 1) तांदूळ धुवून चाळणीवर निथळत ठेवावेत.
2) कढईत तीन चमचे तूप तापत ठेवावे.
3) तूप तापलं की मंद गॅसवर लवंगा टाकाव्यात.
4) त्यावर तांदूळ घालून छान परतावेत.
5) परतलेल्या तांदळात दोन वाट्या पाणी, चवीला मीठ आणि एक चमचा केशर सिरप घालून भात शिजवून घ्यावा.
6) शिजलेला भात परातीत मोकळा करून ठेवावा.
7) पाणी गरम करून त्यात काजूगर भिजत घालावेत.
8) कढईत साखर, रस एकत्र करून  मंद गॅसवर ढवळत रहावे.
9) साखर विरघळली की तयार भात, बेदाणे, काजूगर, वेलची पावडर, लिंबूरस हे सर्व मिक्स करावे.
10) मंद गॅसवर पाच मिनिटं झाकण ठेवून वाफ काढावी.
11) वाफ आली की उरलेलं एक चमचा तूप बाजूने सोडावे आणि पाच मिनिटं ठेवावे.
12) भात मोकळा दिसू लागला की गॅस बंद करावा.
13) भाताला आंब्याचा स्वाद आणि रंग मस्त येतो.
बघा करून!

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८

आजचा प्रसाद: लाल भोपळ्याचा हलवा

साहित्य: अर्धा की भोपळा, 200 ग्रॅम खवा, पाऊण वाटी साखर, वेलची पावडर अर्धा चमचा, केशर काड्या, बदाम काप, बेदाणे, तूप तीन चमचे.

कृती:
 भोपळा किसून घ्या. कढईत तूप तापत ठेवा. त्यात भोपळ्याचा कीस परता. पाच मिनिटं परतून झाल्यावर साखर मिक्स करा. खवा घाला. वेलची पावडर, बेदाणे घाला. दहा मिनिटं मंद गॅसवर परतत रहा. तूप सुटू लागलं की गॅस बंद करा. बदाम कापांनी सजवा. भोपळ्याचा हलवा उपासाला चालतो.
आजच्या रंगाचा पण झाला प्रसाद! भोपळ्याचा वास मात्र कळतो हलव्यात... बघा करून आवडतोय का!

😊